मराठी मनोरंजनविश्वासाठी २७ मे हा दिवस ऐतिहासिक आणि सोबतच अभिमानाचा देखील ठरला. याच दिवशी मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे बेताज बादशहा असलेल्या अशोक सराफ यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जानेवारी २०२५ रोजी अशोक सराफ यांना पदमश्री मिळाल्याची घोषणा झाली होती त्यानंतर २७ मे रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Ashok Saraf)
२७ मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वत्र फक्त अशोक सराफ यांचीच चर्चा आहे. अभिनय सम्राट अशोक सराफ यांच्या बहारदार अभिनय कारकिर्दीला पद्मश्री पुरस्कारामुळे एक नवी झळाळी आली आहे. कला क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अशोक सराफ यांना हा मोठा पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत प्रसिद्धी मिळवली. (Marathi News)
अशोक सराफ यांनी त्यांना हा पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली. एक कलाकार म्हणून कायमच अशोक सराफ आपल्या सर्वच प्रेक्षकांसाठी सर्वोच्च होते. मात्र ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अशोक सराफ हे एक उत्तम माणूस म्हणून देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये सर्वोच्च स्थानावर विराजमान झाले आहेत. अतिशय मोठे, संपूर्ण जगामध्ये नावाजलेले, कलाकार असूनही अतिशय नम्रता त्यांच्या प्रतिक्रियेतून सर्वांनाच जाणवली. (Top Stories)
अशोक सराफ यांनी पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले, “अशा प्रकारे सन्मान होणे ही माझ्यासाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बाब आहे. सोबतच हा एक खूपच आनंदाचा क्षण आहे. हा पुरस्कार भारत सरकारचा उच्चस्तरीय सन्मान आहे. त्यामुळे मला आनंद आहे की, या पुरस्कारासाठी मला पात्र समजण्यात आले. आयुष्यात नक्कीच मी या पुरस्काराला साजेसे काम केले आहे.” या पुढे त्यांना विचारण्यात आले की, ‘पुरस्कार मिळण्यास उशीर झाला, असे तुम्हाला वाटते का?’ (Latest Marathi News)
यावर उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, “उशीर झाला असे मला अजिबातच वाटत नाही. मला हा पुरस्कार मिळाला हिच माझ्यासाठी फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. मला आणि माझ्या कामाला विसरले तर नाही ना? विसरले असते तर मी काही बोललो असतो. मला पुरस्कार देण्याचा त्यांनी विचार केला. मला माहिती नाही त्यांच्या कसे काय लक्षात आले. पण हा मोठा पुरस्कार मला मिळाला ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. पद्म पुरस्काराचे एक वेगळं महत्त्व आणि स्थान आहे. त्याचा मान राखायला हवा. आता माझी जबाबदारी अधिकच वाढली आहे , म्हणून आता थांबून चालणार नाही. लोकांना आवडणार नाही असे काम न करणे फार महत्त्वाचे आहे. ज्यांनी या पुरस्कारासाठी मला पात्र ठरवले त्यांचा मी शतशः आभारी आहे.” असे अशोक सराफ म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वांप्रतीच कृतज्ञता व्यक्त केली. (Top Marathi Headlines)
यासोबतच अशोक सराफ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. मामांनी पदमश्री प्रदान करण्यात येत असलेला एक व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार — तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या.” (Celebrity News)
पद्म पुरस्कार मिळालेले दिग्गज
गायक पंकज उधास (मरणोत्तर)-पद्म भूषण, अभिनेते नंदमुरी बालकृष्ण- पद्मभूषण, अभिनेते अजित कुमार-पद्मभूषण, फिल्म निर्माता – दिग्दर्शक शेखर कपूर – पद्मभूषण, अभिनेता अनंत नाग- पद्माभूषण, अभिनेते अशोक लक्ष्मण सराफ- पद्मश्री, गायक अरिजीत सिंह- पद्मश्री, अभिनय प्रशिक्षक, थिएटर दिग्दर्शक बैरी गॉडफ्रे जॉन-पद्मश्री, गायिका जसपिंदर नरूला- पद्मश्री, गायक अश्विनी भिडे-देशपांडे- पद्मश्री, संगीतकार रिकी ज्ञान केज-पद्मश्री, लोकगायक भेरू सिंह चौहान- पद्मश्री, भक्ति गायक हरजिंदर सिंह श्रीनगर वाले- पद्मश्री, लोक संगीतकार जोयनाचरण बाथरी- पद्मश्री, शास्त्रीय गायिका के ओमानकुट्टी अम्मा- पद्मश्री, गायक महाबीर नायक – पद्मश्री, अभिनेत्री ममता शंकर -पद्मश्री, स्टंट दिग्दर्शक हसन रघू- पद्मश्री. (Social News / Updates)