Home » ही नवरात्र ९ दिवस नाही तर १० दिवस साजरी होणार

ही नवरात्र ९ दिवस नाही तर १० दिवस साजरी होणार

by Team Gajawaja
0 comment
Navratri 2024
Share

हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकूण चार महिन्यात नवरात्र साजरी केली जाते. माघ, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यात नवरात्र साजरी करण्यात येते. यापैकी माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र म्हणतात. या गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची उपासना केल्यास १० महाविद्यांमध्ये यश मिळते, असे धार्मिक ग्रंथात सांगण्यात आले आहे. यातही आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र तांत्रिक सिद्धीसाठी सर्वोत्तम मानली जाते. गुप्त नवरात्री दरम्यान, दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि 9 दिवस उपवास केला जातो. यावर्षी ही गुप्त नवरात्री ९ दिवस नसून १० दिवस साजरी होणार आहे. आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र शनिवार ६ जुलैपासून सुरू होणार असून सोमवार, १५ जुलै रोजी समाप्त होणार आहे. आषाढ महिन्यातील चतुर्थी तिथी वाढल्याने नवरात्र १० दिवस चालणार आहे. (Navratri 2024)

या नवरात्रीमध्ये देवीचे वाहन कुठले असते, हेही महत्त्वाचे असते. या आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये देवी घोड्यावर बसून येणार आहे. त्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. कारण देवी घोड्यावर बसून येणार म्हणजे हे वर्ष नैसर्गिक संकटांचे असेल असे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. हिंदू वैदिक दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी गुप्त नवरात्रोत्सव आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सुरू होतो. या सणाला आषाढ नवरात्री (Navratri 2024) असेही म्हणतात.

आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीमध्ये माता दुर्गेची उपासना होतेच, पण या गुप्त नवरात्रीमध्ये त्या कालीची अधिक उपासना करण्यात येते. ६ जुलैपासून सुरु होणा-या या नवरात्रीमध्ये देवी घोड्यावर स्वार होऊन येत आहे. माता दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येणे शुभ मानले जात नाही. माता राणीचे घोड्यावर स्वार होणे हे नैसर्गिक आपत्तीचे संकेत असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. अशावेळी पाऊस, वादळ, किंवा भुकंपाची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. देवी घोड्यावर बसून आल्यास या नैसर्गिक आपत्तींसह शेतीलाही फटका बसण्याची शक्यता असते. तसेच पाऊसाची विभागणी विषण प्रमाणात होत असल्याचे जाणकार सांगतात. म्हणजेच, एखाद्या भागात ढगफुटीसारखा पाऊस पडतो, तर दुस-या ठिकाणी पाऊसाची प्रतीक्षा लागून राहते असेही सांगण्यात आले आहे.

या नवरात्रीलाही (Navratri 2024) घटस्थापना करण्यात येते. देवीच्या नावानं घटाची स्थापना करण्यात येते. या घटस्थापनेसाठी सकाळी ७.३७ ते ९,१९ हा शुभमुहूर्त सांगण्यात आला आहे. याशिवाय ६ जुलैरोजी घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्तही आहे. हा मुहूर्त दुपारी १२.१५ ते १.१० पर्यंत आहे. हिंदूधर्मात या गुप्त नवरात्रीला महत्त्व आहे. या काळात दुर्गा देवीच्या १० महाविद्यांची पूजा करण्यात येते. ज्यांना मातृदेवतेचा आशीर्वाद मिळवायचा आहे किंवा कोणतेही इच्छित फळ मिळवायचे आहे, त्यांनी गुप्त नवरात्रीचे व्रत अवश्य पाळावे, असेही सांगण्यात आले आहे.या गुप्त नवरात्रीसाठी उत्तरखंडामधील देवीच्या स्थानांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. गुप्त नवरात्री हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होते.

==================

हे देखील वाचा: ट्रॅव्हल करण्याचे जबरदस्त फायदे, ऐकून व्हाल हैराण

==================

या राज्यातील माता काली, तारादेवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी माता, छिन्नमा माता, त्रिपूर भैरवी माता, धुमावती माता, माता बगलामुखी, माता मातंगी, माता कमलादेवी या प्रसिद्ध मंदिरात ही गुप्त नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी होते. या दहा देवता शक्तीच्या देवता म्हणून ओळखल्या जातात. त्यांची या गुप्त नवरात्रीमध्ये आराधना केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते, असा भक्तांचा विश्वास आहे. मोठ्या संख्येनं या देवींच्या मंदिरात भक्तांची गर्दी असते .यासाठी येथील मंदिरांवर सजावटही कऱण्यात आली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये सध्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मंदिरात येणा-या भक्तांना सूचना संबंधित मंदिर ट्रस्टतर्फे देण्यात आल्या आहेत.गुप्त नवरात्रीच्या अष्टमीला कन्यापूजनाला महत्त्व आहे. अनेक राज्यात आपापल्या परंपरेनुसार देवीची आराधना केली जाते. काही राज्यात गुप्त नवरात्रीपासूनच श्रावण महिन्याची सुरुवात होते.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.