Home » Chhaava : थिएटरमध्ये गारद देऊन आपण शिवरायांचा अनादर करतोय का ?

Chhaava : थिएटरमध्ये गारद देऊन आपण शिवरायांचा अनादर करतोय का ?

by Team Gajawaja
0 comment
Chhaava
Share

सध्या छावा चित्रपटासोबत थिएटरमध्ये दोन गोष्टी सर्वात जास्त पहायला मिळत आहेत. ते म्हणजे अनेक प्रेक्षकांचं रडण आणि दुसरं म्हणजे चित्रपट संपल्यावर गारद देण ! शिवरायांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास हा आपल्या मराठी लोकांचा जिव्हाळ्याचा विषय… त्यामुळे काही लोकं इमोशनच्या प्रवाहात वाहूनच जातात. त्यामुळे अनेक प्रेक्षक छावाच्या climax ला रडत होते. आता रडण स्वाभाविक आहेच, कारण शंभू राजेंचं बलिदान कोणाच्याही डोळ्यात पाणी आणू शकतं. पण त्या रडण्याचा व्हिडिओ करण आणि तो सोशल मिडियावर पोस्ट करण कितपत योग्य आहे ? त्यातच काही अतिउत्साही लोक थिएटरमध्येच गारद देत सुटले आहेत. चित्रपट संपला की अनेक जण शिवरायांची घोषणा देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण ही गारद नेमकी आहे तरी काय ? ती कुठे आणि केव्हा दिली जाते ? हेच आपण जाणून घेऊ. (Chhaava)

============== हे देखील वाचा : Shivjayanti : शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिमांची संख्या ऐकून हैराण व्हाल 

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १५९६, इंग्रजी दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला. यावेळी महाराजांची स्वारी हत्तीवरून दरबाराकडे आली. नगरखाण्याजवळ पोहोचताच द्वारपालांनी एकमेकांना इशारा दिला. यानंतर गारदी किंवा चोपदार पुढे आले आणि त्यांनी महाराजांची गारद दिली. एकंदरीत तुम्हाला कळलच असेल की, महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती, तिला मराठीत “गारद” असे म्हटले जातं. संस्कृतमध्ये याला “बिरुद” किंवा बिरुदावली म्हणतात तर ऊर्दु भाषेत याला “अल्काब “असे म्हणतात. प्राचीन काळापासून राजा जेव्हा आपल्या सिंहासनावर आसनस्थ व्हायला येतात, तेव्हा ही गारद दिली जाते. (Garad History)

सहसा ही गारद शिवजयंती किंवा शिवरायांची संबंधित एखाद्या कार्यक्रमात, व्याख्यानातही दिली जाते. त्यावेळी शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर असते. त्या प्रतिमेला नमन करून ही गारद देण्यात येते. त्यामुळे शिवरायांची गारद आपण ठराविक ठिकाणीच देऊ शकतो. पण सध्या भावनेच्या भरात ही गारद कशीही आणि कुठेही देण्याचे प्रकार वाढले आहेत. थिएटर, मॉल्स, लग्न, इतर कार्यक्रम अशा ठिकाणी सर्रास गारद दिली जाते. त्यात गारद देताना पायताण काढावी लागते. आजही शिवरायांच्या आणि शंभू राजेंच्या राज्याभिषेकाला महाराजांची पालखी सिंहासनाकडे येताच, पायताण काढण्याचे सूचना दिली जाते, यानंतर ही गारद सुरु होते.(Chhaava)

मुळात प्रत्येकाला शिवरायांबद्दल आदर आहेच, पण त्यांचा अनादर होईल, अशी घटना आपल्याकडून कोणत्याही ठिकाणी गारद देताना घडते. आता आपण या गारदेमध्ये शिवरायांचा गौरव करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या जाणून घेऊ… याची सुरुवात गडपती पासून होते, गडपती म्हणजेच दक्खनेतल्या गडकोटांचे अधिपती ! यानंतर गजअश्वपती… याचा अर्थ ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. भूपती प्रजापती म्हणजेच स्वराज्यातील भुमीचे व प्रजेचे रक्षणकर्ते… सुवर्णरत्नश्रीपती म्हणजेच राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सोने यावर ज्यांची मालकी आहे असे महाराज.. अष्टावधानजागृत म्हणजेच आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज… अष्टप्रधानवेष्टीत म्हणजेच ज्यांच्याकडे आठ शास्त्रांमध्ये निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज…(Chhaava)

==============

हे देखील वाचा : Shivjayanti : शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिमांची संख्या ऐकून हैराण व्हाल 

==============

न्यायालंकारमंडीत म्हणजेच न्यायकठोर राहुन सत्याच्या आणि न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज… शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत म्हणजेच सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रांमध्ये पारंगत असलेले महाराज… राजनितीधुरंधर म्हणजेच राजकारणामध्ये तरबेज असलेले महाराज… प्रौढप्रतापपुरंदर म्हणजेच मोठा पराक्रम गाजवुन सर्वत्र आपल्या शौर्याचा ठसा उमटवणारे महाराज… क्षत्रियकुलावतंस म्हणजेच क्षत्रिय कुळात जन्म घेऊन मोठा पराक्रम गाजवलेले महाराज…सिंहासनाधिश्वर म्हणजेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर विराजमान असणारे महाराज. महाराजाधिराज म्हणजेच विद्यमान साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकाराले आहे असे महाराज… राजाशिवछत्रपती म्हणजेच प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले असे छत्रपती शिवाजी महाराज…! आपण सर्वच शिवरायांचा आदर करतो, पण त्यांचा अनादर न व्हावा, यासाठी ही गारद कुठे द्यावी, याचं भान आपल्या सर्वच शिवप्रेमींना असावं इतकच !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.