Home » Apollo 13 : ३ लाख २२ हजार किमी लांब ते अंतराळात हरवले होते पण…

Apollo 13 : ३ लाख २२ हजार किमी लांब ते अंतराळात हरवले होते पण…

by Team Gajawaja
0 comment
Apollo 13
Share

११ एप्रिल १९७०, फ्लोरिडा येथील जॉन एफ. केनेडी स्पेस सेंटरमधून अपोलो १३ मिशनसाठी सॅटर्न – 5 नावाचं रॉकेट आकाशात झेपावलं. हे मिशन चंद्रावर मानवाचं तिसरं पाऊल होतं. याआधी १९६९ मध्ये अपोलो ११ मध्ये नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं, आणि अपोलो १२ चं मिशनही यशस्वी झालं होतं. पण अपोलो १३ चं मिशन खास होतं! यावेळी यानाला चंद्रावरच्या एका खास भागात जायचं होतं, ज्या भागाचं नाव होतं फ्रा मॉरो, जिथे एका उल्का आदळल्यामुळे खूप मोठा खड्डा तयार झाला होता. या मिशनमध्ये तीन अंतराळवीर, जेम्स लव्हेल, जॉन स्विगर्ट आणि फ्रेड हेज चंद्राच्या दिशेने झेप घेत होते. पण पृथ्वीपासून ३ लाख २२ हजार किलोमीटर दूर असताना, त्यांच्या यानातील ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त १५ मिनिटांचं ऑक्सिजन शिल्लक होतं! त्या स्फोटामुळे ते अंतराळात हरवले असते पण.. अपोलो १३ मिशनची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊ. (Apollo 13)

तर आधी सांगितल्याप्रमाणे अपोलो १३ या मिशनचे कमांडर होते जेम्स लव्हेल, आणि त्यांच्यासोबत होते कमांड मॉड्यूल पायलट जॉन स्विगर्ट आणि लूनर मॉड्यूल पायलट फ्रेड हेज. हे तिघं आपल्या कुटुंबाला मागे सोडून, अंतराळातील या धोकादायक प्रवासाला निघाले होते.

अपोलो १३ च्या स्पेसक्राफ्टमध्ये तीन भाग होते. कमांड मॉड्यूल, जिथे अंतराळवीर बसले होते आणि तिथून संपूर्ण स्पेसक्राफ्ट नियंत्रित करत होते. लूनर मॉड्यूल, ज्याने चंद्रावर उतरायचं होतं आणि त्यातूनच परत यायचं होतं. आणि शेवटचा भाग म्हणजे सर्व्हिस मॉड्यूल, ज्याला स्पेसक्राफ्टचं ‘हृदय’ बोललं जातं होतं, कारण त्यात इंजिन आणि ऑक्सिजन टँक होते.

प्लॅन असा होता, की स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, आणि मग लूनर मॉड्यूल दोन अंतराळवीरांना घेऊन चंद्रावर उतरेल. सॅम्पल्स गोळा केल्यानंतर ते परत स्पेसक्राफ्टला जोडलं जाईल आणि मग सगळे पृथ्वीवर परत येतील. पण हा प्लॅन कधीच पूर्ण होऊ शकला नाही! (Apollo 13)

Apollo 13

पृथ्वीपासून निघून ५५ तास झाले होते. स्पेसक्राफ्ट चंद्राच्या दिशेने वेगाने जात होतं. अंतराळवीर रुटीन चेक करत होते. तेव्हा जॉन स्विगर्टने ऑक्सिजन टँकची लेव्हल तपासण्यासाठी बटण दाबलं आणि… अचानक एक जोरदार स्फोट झाला! स्पेसक्राफ्टला इतका जोरात धक्का बसला की, कमांड मॉड्यूलमधले तिन्ही अंतराळवीर हादरले. सुरुवातीला त्यांना वाटलं, फ्रेड हेजने कदाचित मस्करी केली असेल, कारण त्याला मस्करी करायची सवय होती. पण यावेळी फ्रेडही तितकाच गंभीर दिसत होता.

स्पेसक्राफ्ट हादरलं होतं, मास्टर अलार्म आणि इलेक्ट्रिकल पॉवर फेल्युअरच्या लाइट्स लुकलुकू लागल्या. स्पेसक्राफ्टमधल्या दोन इलेक्ट्रिकल वायर्स एकमेकांना जाइंट झाल्याने एक ऑक्सिजन टँक फुटला होता! आणि दुसरा टँकही झपाट्याने रिकामा होत होता. जेम्स लव्हेलने खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा त्याला सर्व्हिस मॉड्यूलमधून गॅस लीक होताना दिसला. ते ऑक्सिजन होतं, जो त्यांच्यासाठी अत्यावश्यक होता! आता चंद्रावर जाणं तर सोडा, पण या अंतराळविरांचं जिवंत परत येणंही कठीण. (Apollo 13)

नासाच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये ही बातमी पोहोचताच एकच खळबळ उडाली. इंजिनियर्सना माहित होतं, की ऑक्सिजन टँक फुटणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. कारण स्पेसक्राफ्टमध्ये ३ लाख २२ हजार किलोमीटर दूर स्पेसक्राफ्टमधल्या कमांड मॉड्यूलमध्ये फक्त १५ मिनिटांचं ऑक्सिजन शिल्लक होतं.. पॉवर सप्लाय बंद पडला होता, पिण्याचं पाणी नव्हतं, आणि स्पेसक्राफ्टची दिशाही बदलली होती. जर दिशा बदलली नाही, तर स्पेसक्राफ्ट अंतराळात कायमचं हरवेल आणि त्यासोबतच ते तिघ सुद्धा!

दुसरीकडे, ही बातमी जगभर पसरली. यामिशनमुळे माणूस तिसऱ्यांदा चंद्रावर जाणारा होता. त्यामुळे चंद्रावर जाणं आता लोकांसाठी नवं राहिलं नव्हतं आणि म्हणूनच कदाचित सुरवातीला टीव्ही नेटवर्क्सनी या मिशनकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता ते अपोलो १३ च्या या आपघताची बातमी सतत दाखवत होते. अंतराळवीरांच्या कुटुंबियांमध्ये आणि जगभरात भीती पसरली होती. (Apollo 13)

नासाच्या इंजिनियर्सनी तातडीने निर्णय घेतला. नासाने इंजिनियर्स, Scientist, Experts यांची एक टीम बनवली… apollo १३ मिशन आता बदल होतं. आता मिशन होतं तीन अंतराळवीरांना पृथ्वीवर पुन्हा जीवंत आणणं. या टीमने दोन पर्यायांचा विचार केला. पहिला पर्याय मेन इंजिन वापरून स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या दिशेने वळवणं. पण यात धोका होता, कारण इंजिन फक्त शिल्लक इंधनावर चालत होतं. दुसरा पर्याय होता चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती वापरून स्पेसक्राफ्टला पृथ्वीच्या दिशेने ढकलणं. हा पर्याय कमी जोखमीचा होता, पण यासाठी लूनर मॉड्यूलच्या इंजिनचा वापर करावा लागणार होता, जे फक्त चंद्रावर उतरल्यानंतर टेकऑफसाठी बनवलं होतं.

नासाने दुसरा पर्याय निवडला. इंजिनियर्सनी अचूक कॅल्क्युलेशन्स केली आणि अंतराळवीरांना सूचना दिल्या. चंद्राच्या कक्षेत पुढे जा, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती वापरुन स्लिंगशॉट इफेक्ट वापरून पृथ्वीकडे या. हा प्रवास लांबचा होता पण पर्याय नव्हता. यासाठी अंतराळवीरांना कमांड मॉड्यूलमधून लूनर मॉड्यूलमध्ये हलवण्यात आलं, कारण लूनर मॉड्यूलमध्ये स्वतंत्र ऑक्सिजन सप्लाय होता. पण मूळ समस्या कायम होती: लूनर मॉड्यूल फक्त दोन अंतराळवीरांसाठी डिझाइन केलं होतं, आणि आता तिथे तिघं होते! शिवाय, या भागातील ऑक्सिजन फक्त ४५ तासांसाठी डिझाइन केला होता. पण आता त्यात अंतराळवीरांना कमीत कमी ९० तास राहायचं होतं. नेव्हिगेशन सिस्टीम ही कमांड मॉड्यूलमध्ये होती – पण ते बंद केलं होतं. म्हणजे आता दिशा ठरवणंही शक्य नव्हतं. मग अंतराळवीरांनी मॅन्युअली दिशा सेट केली. लूनर मॉड्यूलच इंजिन वापरून स्पेसक्राफ्ट चंद्राच्या दिशेनं वळवलं.

त्यांनी चंद्राच्या कक्षेत एक चक्कर मारल्यानंतर, चंद्राच्या मागच्या बाजूने म्हणजे ‘डार्क साइड’ वरून फिरत हे स्पेसक्राफ्ट तब्बल ४ लाख किलोमीटर दूर गेलं. हे अंतर अंतराळवीरांनी गाठलेलं आजवरचं सगळ्यात जास्त अंतर होतं. मग एका खास पॉइंटवर लूनर मॉड्यूलचं इंजिन ३५ सेकंद चालवलं गेलं. यामुळे स्पेसक्राफ्टची दिशा पृथ्वीच्या दिशेने वळली. (Apollo 13)

पण पृथ्वीच्या दिशेने येताना पण त्या तीन अंतराळवीरांसमोर अडचणींचा डोंगर उभा होता. वीज कमी असल्यामुळे अनावश्यक सिस्टीम्स बंद कराव्या लागल्या, स्पेसक्राफ्टमध्ये इतकी थंडी पडली की अन्न गोठू लागलं. आणि सगळ्यात मोठी समस्या होती लूनर मॉड्यूलमध्ये वाढतं कार्बन डायऑक्साइड. या भागात CO₂ फिल्टर फक्त दोन जणांसाठी, दोन दिवसांसाठी होता. पण आत होते तीन जण आणि चार दिवस प्रवास. त्यामुळे CO₂ वेगानं वाढत होता आणि श्वास घेणं अवघड होत होतं. NASA ने तातडीनं उपाय शोधला. त्यांनी अंतराळवीरांना सांगितलं, “तुमच्याकडे जे आहे त्यातून काहीतरी बनवा – प्लास्टिक बॅग, पाईप्स, duct tape वापरा आणि नवीन फिल्टर तयार करा. या तिघांनी एकदम जुगाड पद्धतीनं नवीन CO₂ फिल्टर तयार केलं आणि ते यशस्वीपणे काम करत होतं!

==============

हे देखील वाचा : Panar Leopard : ४०० मनुष्यबळी भारतातल्या सर्वात डेंजर बिबट्याचा दरारा!

==============

दोन दिवसानंतर, यान ३,२०० किलोमीटर प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या जवळ येत होतं. आता सर्वात मोठा टास्क होता. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी अंतराळवीरांना लूनर मॉड्यूल सोडून कमांड मॉड्यूलमध्ये परत जावं लागणार होतं. पण कमांड मॉड्यूलमधली सगळी कॉम्प्युटर्स बंद पडली होती, आणि तिथलं तापमान Freezing Point पेक्षा खाली गेलं होतं.

अंतराळवीरांनी स्पेससूट घालून कमांड मॉड्यूलमध्ये प्रवेश केला. लूनर आणि सर्व्हिस मॉड्यूल स्पेसक्राफ्टपासूंन वेगळं केलं गेलं. स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात शिरलं.त्या वेळी घर्षणामुळे प्रचंड उष्णता तयार झाली आणि स्पेसक्राफ्टशी संपर्क तुटला. तीन मिनिटं कोणताही संदेश न आल्याने, सगळ्यांना वाटलं की कदाचित heat shield नीट काम केलं नसेल आणि या तीन अंतराळवीरांचा दुर्दैवी अंत झाला असेल. पण… अचानक रेडिओवर त्यांचा आवाज आला! “We’re okay!” सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. (Apollo 13)

त्यांनी पॅराशूट उघडलं, आणि पॅसिफिक महासागरात apollo १३ चं स्पेसक्राफ्ट तीनही अंतराळवीरांना Jim Lovell, Jack Swigert, आणि Fred Haise यांना घेऊन सुखरूप उतरलं. १७ एप्रिल १९७० पाच दिवसांच्या थरारक प्रवासानंतर, तिन्ही अंतराळवीरांना रेस्क्यू करण्यात आलं. जगभरात आनंदाची लाट पसरली. अंतराळवीरांच्या कुटुंबांनी आणि नासाच्या इंजिनियर्सनी सुटकेचा निश्वास सोडला. आता काही दिवसांपूर्वीच ७ ऑगस्ट २०२५ ला या मिशनचे कमांडर Jim Lovell यांचा मृत्यू झाला. Apollo १३ खरंतर एक fail मिशन होतं. पण नासासाठी ते एक successful failure होतं.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.