Home » राजस्थानमधील पुष्कर मेळ्यात करोडो रुपयांचे प्राणी…

राजस्थानमधील पुष्कर मेळ्यात करोडो रुपयांचे प्राणी…

by Team Gajawaja
0 comment
Rajasthan
Share

राजस्थानचा पुष्कर मेळा हा जगप्रसिद्ध आहे. या पुष्कर मेळ्याला सर्वाधिक परदेशी पर्यटक भेट देतात. करोडो रुपयांची उलाढाल या मेळाव्यात होते आणि स्थानिक कलाकारांच्या कलेचा गौरव होतो. परदेशी पर्यटकांसाठी येथे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. पुष्कर मेळ्यात होणारी मिशीची स्पर्धाही उत्सुकतेची असते. याबरोबरच या पुष्कर मेळ्याला पशु मेळाही म्हटले जाते.  कारण या पुष्कर मेळ्यामध्ये कोट्यवधी रुपयांची किंमत असलेले घोडे येतात. यावेळच्या पुष्कर मेळ्यातही 7,11 आणि 51 कोटी रुपयांचे घोडे दाखल झाले आहेत. हा आकडा अचंबित करणारा असला तरी ही किंमत खरी आहे.  (Rajasthan)

शिवाय आपल्या किंमतीप्रमाणेच या घोड्याचे जीवन असते. अगदी त्यांची ने-आण करण्यासाठी एसी गाड्याही तैनातीला असतात. त्यांचा खुराकही तसाच फाईव्हस्टार असतो. या घोड्यांसोबत पुष्करमध्ये कोट्यवधी रुपये किंमत असलेली म्हैसही दाखल झाली आहे. दरवर्षी पंधरा दिवस भरणारा हा पुष्कर मेळा यावर्षी राजस्थानमधील निवडणुकीमुळे आठवड्याभराचा आहे.  त्यामुळेच पुष्कर मेळ्याचे रंगीबेरंगी वातावरण अनुभवण्यासाठी आणि करोडो रुपयांचे प्राणी बघण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.  (Rajasthan)

राजस्थानमधील पुष्कर मेळा हा पशु मेळा म्हणूनही ओळखला जातो. राजस्थान विधानसभा निवडणुकीमुळे हा मेळा यावर्षी अवघ्या आठवड्याचा आहे. तरीही पुष्कर मेळ्यात नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यात परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. पुष्कर मेळ्यात मुख्य आकर्षण असते ते घोडे, उंट, गाय, बैल आणि म्हशींचे. कारण या मेळ्यातील हे प्राणी कोट्यवधी रुपयांचे असते. यावर्षीच्या पुष्कर मेळ्यात 11 कोटी रुपयांची म्हैस आली आहे.  ही म्हैस पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरली आहे. या म्हशीचे वजन 1570 किलो आहे.

मुख्य म्हणजे, या म्हशीच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र असा ट्रक बनवण्यात आला आहे.  याबरोबरच पुष्कर मेळ्यातील 7 कोटींचा मारवाड जातीचा घोडाही पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. या घोड्यासाठी यापेक्षाही अधिक करोडची बोलीही लागली आहे.  मात्र या घोड्याच्या मालकाला घोडा विकायचा नाही. या घोड्याचा आहारही राजेशाही थाटाचा आहे. हा घोडा 15 लिटर दूध आणि पाच किलो हरभरा आणि डाळी खातो. या घोड्याचे वय चार वर्षे असून हायटेक लक्झरी लाइफ जगतो. घोड्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वैद्यकीय रुग्णवाहिका आहे. या घोड्यावर दर महिन्याला एक लाख रुपये खर्च केले जातात. (Rajasthan)

दरवर्षी कार्तिक महिन्यात भरणा-या या पुष्कर मेळ्याची ओळख ‘कार्तिक मेळा’ अशीही आहे. याच मेळ्यात पंजाबवरुन दोन 11 कोटींचे घोडे दाखल झाले आहेत. मारवाड जातीचे हे घोडे सर्वात उंच घोडे म्हणून प्रसिद्ध आहेत. या घोड्यांचा ब्रीडसाठी वापर करण्यात येतो. या घोड्यांवर दिवसाला हजार रुपये खर्च होतात. त्यांच्या वाहतुकीसाठी एसी गाडी आहे. या घोड्यांना बघण्यासाठीही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.  विशेष म्हणजे, पुष्कर मेळ्यात जे करोडो रुपयांचे घोडे दाखल झाले आहेत, त्यांचा सर्व इतिहास तिथे मांडला गेला आहे.  या घोड्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा, बहिण-भाऊ आदी कोण होते, याचीही माहिती स्वतंत्र बोर्डावर लावण्यात आली आहे. या किंमती घोड्यापैकी अनेक घोड्याच्या नातेवाईक राजांची सेवा केली आहे.  युद्ध गाजवली आहेत. या घोड्यांच्या इतिहासावरुनही त्यांची किंमत ठरत असते.  हे सर्व बघण्यासाठी आणि वाचण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे.  (Rajasthan)

याशिवाय पुष्कर मेळ्यात सर्वात आकर्षण असते, ते उंटांच्या शर्यतीचे. राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठ्या प्रमाणात असलेल्या उंटांची शर्यत पुष्कर मेळ्यात होते. त्यासोबत कोणाचा उंट किती सजवला आहे, याचीही स्पर्धा होते. उंटांना पारंपारिक कपडे घालून सजवले जाते. एवढेच नाही तर उंटांसोबत नृत्य आणि वेटलिफ्टिंगही केले जाते. याशिवाय पुष्कर मेळ्यात रात्री बोनफायर लावून नृत्य केले जाते.  राजस्थानी कलाकार मोठ्याप्रमाणात येतात.  ते आपल कला सादर करतात.

===========

हे देखील वाचा : चीनमध्ये रहस्यमयी न्युमोनियामुळे रुग्णालये फुल्ल

===========

नयररम्य अशा पुष्कर तलावाच्या काठी होणा-या या मेळ्यासाठी संपूर्ण परिसर सजवण्यात आला आहे. राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी असली तरी पुष्कर मेळ्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. 27 नोव्हेंबर रोजी हा पुष्कर मेळा संपणार आहे. मेळ्याला आलेले भाविक पुष्कर तलावात स्नान करुन ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घेऊन घराकडे परत जातात.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.