गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोना या महामारीच्या संकटाला जगानं मात दिल्याचे जाहीर केले. ही बातमी ऐकल्यावर अनेकांनी हुश्श केलं. कोरोनामुळे अवघ्या जगात उलथापालथ झाली होती. अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला. किती जणांनी या महामारीमध्ये जीव गमवला, याचा अद्यापही खरा आकडा समोर आलेला नाही. जगभरातील करोडो कुटुंब या कोरोनाच्या साथीत उध्वस्त झाली. दोन वर्षात जणू सर्व जग कोंडलं गेलं होतं. आता या महामारीचं सावट दूर झालं. दोन वर्षाच्या काळ्या सावलीतून बाहेर आलेलं जग पुन्हा हसू खेळू लागलं असतानाच आता नव्या महामारीचं सावट जगावर येऊ पाहत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोनापेक्षाही हा रोग भयंकर असून यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असू शकते, अशी भीतीही जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. जागतिक संघटनेच्या या इशा-यानं पुन्हा एकदा धडकी भरली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी हा इशारा दिला आहे. कोरोनापेक्षाही महाभयंकर अशी महामारी जगावर येण्याची शक्यता असून त्यामुळे तब्बल 20 दशलक्ष नागरिकांचा जीव जाऊ शकतो अशी भीतीही डॉ. गेब्रेयसस यांनी व्यक्त केली आहे. हा रोग कोरोनापेक्षाही कित्तेक पटीनं प्राणघातक असू शकतो, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख असेलेले डॉ. टेड्रोस अॅडनोम गेब्रेयसस यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात, जगाने कोविडपेक्षाही घातक असलेल्या विषाणूसाठी तयार राहिले पाहिजे, असे सांगितले आहे. या विषाणूमुळे किमान 20 दशलक्ष लोकांचा मृत्यू होईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्यास आम्ही बांधील आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. कोरोनाची महामारी जगभर पसरली तेव्हा या घटनेसाठी जागतिक आरोग्य संघटना तयार नव्हती अशी प्रांजळ कबूलीही देण्यात आली आहे. मात्र कोरोनानंतर सर्वच चित्र पलटले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आता भविष्यात येणा-या महामारीसंदर्भात अधिक जागरुक झाली आहे. जागतिक संघटननं आता दावा केला आहे की, भविष्यात येणारे नऊ आजार आत्ताच ओळखले गेले आहेत. या आजारांच्या साथी सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारांच्यासाठी सर्व उपाययोजना करण्यापासून त्याबाबत जागरुक करण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटना काम करीत आहे. जगावर अशा नऊ संभाव्य साथींचे संकट असून त्यातील काही रोग हे इतके भयंकर आहेत की त्यामुळे मृत्यूचा दर सर्वाधिक रहाणार आहे. या सर्वांमुळे जागतिक आरोग्य संघटना संबंधित रोगांवर औषध आणि लस आणण्याबाबत संशोधन करत आहे.
कोरोनाच्या साथीमुळे तीन सुमारे 70 लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वास्तविक ही संख्या यापेक्षाही अधिक आहे. मात्र संभाव्य आजाराच्या साथीत 20 दशलक्ष नागरिकांचा मृत्यू होईल, हे सांगून जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा चिंतेत भर टाकली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आता जगाला या नव्या आजाराला तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होण्याचे आवाहन करत आहे.
========
हे देखील वाचा : धारावीतील मलीशाचे एका झटक्यात पालटले नशीब, बनली ‘या’ ब्रँन्डची अॅम्बेसेडर
========
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) डॉ. टेड्रोस यांनी कोरोनाची साथ संपल्याचे काही दिवसापूर्वी जाहीर केले होते. पण कोरोनाची साथ संपली म्हणजे कोरोना नावाचा रोग संपला असे नाही, हेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते फक्त कोरोनाचा वेग मंदावला आहे. पण त्या कोरोनापेक्षाही भयंकर विषाणू सध्या तयार झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. डॉ. टेड्रोस यांच्या या इशा-यानंतर सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे. काहींनी डॉ. टेड्रोस यांना ट्रोलही केले आहे. तर कोरोनासारख्या आजारात जागतिक आरोग्य संघटनेची काय भूमिका होती, याचा जाबही अनेकांनी विचारला आहे. असे असले तरी डॉ. टेड्रोस यांची भूमिका लक्षात घ्यायला हवी. त्यांनी कोरोना रोग संपला आहे, असे जाहीर केले नाही, तर कोरोनाची साथसंपली आहे, हे स्पष्ट केले आहे.
सई बने