अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सई ताम्हणकरचा कोणीतरी पाठलाग करतंय आणि त्यापासून आपला बचाव करण्यासाठी जीव मुठीत घेऊन सई पळताना दिसतेय. रिकामे रस्ते, अनोळखी जागा आणि घाबरुन सुसाट पळणारी सई असं चित्र या व्हिडीओत पाहाययला मिळतंय. सईला नक्की झालं तरी काय? सईचा पाठलाग कोण करतंय? सई का पळतेय? सईला कशाची भिती वाटतेय? आणि अमृताने सईचा हा व्हिडीओ का शेअर केला? असे प्रश्न हा व्हिडीओ पाहून मनात येतात.
तर त्यामागची गंमत अशी की.. हा व्हिडीओ आहे सई ताम्हणकर, अमृता खानविलकर आणि वैभव तत्त्ववादी यांच्या आगामी पाँडीचेरी या सिनेमातला. लवकरच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार, असं म्हणत सई ताम्हणकरचा हा व्हिडीओ अमृता खानविलकरनं शेअर केलाय. पाँडीचेरी सिनेमाच्या प्रदर्शित होण्याऱ्या ट्रेलरचं प्रमोशन करण्यासाठी अमृतानं हा अनोखा फंडा वापरला आहे.
२५ फेब्रुवारी २०२२ रोजी अमृता, सई, वैभव यांचा पाँडीचेरी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं पोस्टर आणि सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या दोन्हीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाचं शूटिंग चक्क मोबाईलवर करण्यात आलंय.
पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची आगळीवेगळी गोष्ट सांगणारा, नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
====
हे देखील वाचा: सोयरीक चित्रपटाच्या शानदार प्रिमियरला नामवंत कलाकारांची हजेरी.
====
टिझरवरून हा चित्रपट लव्ह ट्रायंगल वाटत असला तरी चित्रपटाचा हा विषय अजिबात नाही. हा एक भावनिक प्रवास असून या तिघांच्या नात्याचा शेवट कुठे होतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे या सिनेमाच्या निमित्ताने अमृता खानविलकर, सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादी हे तिघं पहिल्यांदाच एकत्र एका सिनेमात झळकताना दिसणार आहेत.
अमृता, सई आणि वैभव या तिघांनीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यामुळे हे तिघं एकत्र एका सिनेमात दिसणार म्हंटल्यावर त्यांच्या फॅन्समध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता पाहायला मिळतेय. शिवाय हा सिनेमा स्मार्ट फोनवर चित्रित झाला आहे आणि मराठीतील पहिला वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या प्लॅनेट मराठीनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.
====
हे देखील वाचा: हरीश दुधाडेची नवी इनिंग…
====
सचिन कुंडलकर ज्यांनी यापूर्वी ‘गुलाबजाम’ सारख्या सुपरहीट सिनेमाचं दिग्दर्शन केलंय, त्यांनी पाँडीचेरीचंही दिग्दर्शन केलंय. त्यामुळे या सिनेमात काहीतरी नक्कीच खास असणार असं दिसतंय. त्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात किती यशस्वी ठरतो ते पाहाणं औस्त्युकाचं ठरेल.
– वेदश्री ताम्हणे