प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या नवीन चित्रपटात महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याची म्हणजेच नथुराम गोडसे यांची भूमिका केली आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. श्री अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे खासदारही आहेत. त्यामुळे या वादाला साहजिकच ‘राजकीय वळण’ही मिळाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘सोशल मीडिया’ नावाचे प्रभावशाली परंतु, भस्मासुरासारखे माध्यम निर्माण झाले आहे. या भस्मासुराची झळ आतापर्यंत अनेकांनी अनुभवली आहे. अमोल कोल्हे यांनाही त्याची तीव्र झळ सोसावी लागतेय. सोशल मीडियाने बहुसंख्येने त्यांना ‘खलनायक’ ठरविले आहे.
वास्तविक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला असता कोणत्याही अभिनेत्याला कोणतीही भूमिका करण्याचा हक्क/अधिकार आहे. परंतु अनेकदा अभिनेत्याने केलेल्या आधीच्या लोकप्रिय भूमिकांवरच त्याची जनमानसातील प्रतिमा पक्की तयार झालेली असते. त्यामुळे नंतर अभिनेत्याने जर त्या जनमानसातील प्रतिमेच्या विरोधात जाऊन कोणतीही भूमिका स्वीकारली की, तो टीकेचा धनी होतो आणि जनमानसाचा रोष त्याला सहन करावा लागतो. अमोल कोल्हे यांच्याबाबतीत नेमके तसेच झाले आहे.

श्री अमोल कोल्हे हे तरुणपणीच चित्रपटसृष्टीत आले आणि सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराज यांच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. त्या दोन्ही भूमिकांमध्ये ते इतके ‘फिट्ट’ बसले की, अल्पावधीतच ते अतिशय लोकप्रिय झाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असल्यामुळे आणि हल्ली महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या नावाचा फार सुनियोजित पद्धतीने वापर होत असल्याने साहजिकच त्यांची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हे यांना ‘प्रतिशिवाजी’चे महत्व यायला वेळ लागला नाही. (शिवाजी महाराजांची भूमिका करीत असतानाच्या काळात अनेक ठिकाणी तरुणांकडून अमोल कोल्हे यांचे ‘मुजरे’ देऊन स्वागत व्हायचे.) त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीयदृष्ट्या चांगलाच करून घेतला. त्यांना शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात आले आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना जुन्नर मतदारसंघातून तिकीटही देण्यात दिले.
शिवाजी-संभाजीच्या लोकप्रिय भूमिकांमुळे अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणूक जिंकणेही सहजसोपे गेले आणि ते खासदारही झाले. योगायोगाची गोष्ट अशी की, श्री कोल्हे यांनी या निवडणुकीत एका ‘शिवाजी’चाच (आढळराव पाटील ) पराभव केला. अमोल कोल्हे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत त्या पक्षाची राजकीय भूमिका मात्र नेमकी नथुराम गोडसे यांच्या विरोधात आहे.

महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेचा महाराष्ट्राच्या राजकारणात फार पूर्वीपासूनच काँग्रेसने पद्धतशीरपणे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतलेला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तरी कसा अपवाद असेल. सध्या केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील जे भाजप सरकार आहे ते ‘गोडसेवादी’ आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे. असे असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी अमोल कोल्हे करीत असलेल्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांनी कोल्हे यांचे समर्थन केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही याच मुद्यावरून कोल्हे यांची री ओढली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेचा निषेध केला आहे आणि आपण यापुढेही त्यांचा निषेधच करणार असे त्यांनी जाहीर केले आहे.
सोशल मीडियामध्येही या विषयावर बरीच राळ उडविण्यात येत आहे. काहीजण अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत आहेत, तर काहीजण त्यांचे समर्थनही करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका करणारा (आणि त्यामुळे प्रसिद्ध पावलेला) एक अभिनेता नथुराम गोडसे यांच्यासारख्या मारेकऱ्याची भूमिका कशी काय करू शकतो? असा त्यापैकी बहुतेकांचा सवाल आहे.
नथुराम गोडसेची भूमिका अमोल कोल्हे यांना शोभून दिसली असेल काय? असेही काहीजणांना वाटणे साहजिक आहे. कारण असंख्य रसिक श्रोत्यांचा मनात अभिनेते शरद पोंक्षे यांचीच प्रतिमा नथुराम गोडसेंच्या रूपात घट्ट करून बसली आहे. एरव्हीही शरद पोंक्षे नथूरामची भूमिका अक्षरशः जगत आहेत. नथुरामच्या भूमिकेचे ते राजरोसपणे समर्थन करीत फिरत असतात. त्यामुळे ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटातील नथुराम गोडसे यांची भूमिका जर शरद पोंक्षे यांच्या वाट्याला आली असती तर कोणताही गदारोळ उडाला नसता.

आपली भूमिका अमोल कोल्हे यांच्या वाट्याला गेली याचे वैषम्य एक कलाकार म्हणून शरद पोंक्षे यांना वाटणे साहजिकच आहे. तरीही त्यांनी कोल्हे यांच्या नथुरामच्या भूमिकेचे स्वागतच केले आहे.
“व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटातील नथुराम गोडसे यांची भूमिका मी जेव्हा २०१७ साली केली, त्यावेळी मी राजकीय लोकप्रतिनिधी नव्हतो’,’ असा खुलासा अभिनेते अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यावेळी ते खासदार नसतीलही मात्र ते त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी होते हे मात्र नक्की.
शिवाय तोपर्यंत ते शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चांगलेच रूळले होते आणि ‘शिवाजी महाराज’ म्हणून त्यांची जनमानसातील प्रतिमा वेगाने स्थान घेत होती. त्यामुळे समाजमाध्यमातील असंख्यांना शिवाजी महाराजांची भूमिका करणारा एक कलावंत नथूराम गोडसे यांची भूमिका कशी काय करू शकतो असा प्रश्न पडला असेल. त्यामुळेच अमोल कोल्हे ‘ट्रोल’ होत असून त्यांच्या गोडसे यांच्या भूमिकेला विरोध होत आहे.
कोणताही कलावंत आणि त्याची जनमानसात बिंबलेली प्रतिमा यांच्या संदर्भात अनेक गाजलेली उदाहरणे देता येतील. त्यापैकी एक ठळक उदाहरण म्हणजे फार वर्षापूर्वी ‘प्रभात’ कंपनीच्या ‘संत तुकाराम’ या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामाची भूमिका केली होती. त्यांची ती भूमिका एवढी गाजली होती की त्याकाळात विष्णुपंत पागनीस कोठेही गेले तरी त्यांना भेटायला प्रचंड गर्दी होत असे आणि लोक अतिशय श्रद्धेने त्यांना ‘संत तुकाराम’ समजूनच त्यांच्या पायावर डोके टेकवीत असत.

त्याच्या अगदी विरूद्ध उदाहरण ‘तुकाराम’ या अलीकडील काळातील चित्रपटाच्या बाबतीत देता येईल. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘तुकाराम’ या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी संत तुकारामाची भूमिका केली होती. जितेंद्र जोशी यांनी भूमिका चांगली करूनही रसिक श्रोत्यांच्या मनात ती फार ठसली नाही कारण एक कलावंत म्हणून जितेंद्र जोशी यांनी जनमानसातील प्रतिमा खूपच वेगळी होती. त्याचा त्यांना फटका बसला त्यामुळे तो चित्रपटही फारसा गाजला नाही.
=====
हे देखील वाचा : आघाडी सरकारच्या नावाखाली राष्ट्रवादीकडून शिवसेनेची फरफट?
=====
कोणत्याही अभिनेत्याच्या विशिष्ट भूमिकेमुळे त्याची जनमानसात एकदा का विशिष्ट प्रतिमा निर्माण झाली की ती पुसून जायला वेळ लागतोच हे मात्र खरे. अमोल कोल्हे यांच्याबाबतीत नेमके तेच झाले आहे. अर्थात छत्रपती शिवाजी / संभाजी महाराजांची भूमिका केल्यामुळे अमोल कोल्हे यांना जी ‘पुण्याई’ मिळाली ती नथुराम गोडसे यांच्या भूमिकेमुळे धुळीला मिळण्याचीच दाट शक्यता आहे. जनमानसातील प्रतिमेचा असाही उलट परिणाम होऊ शकतो. कलाकारांनी त्याचा सारासार विचार करण्याची गरज असते.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.