राजस्थानमधील अजमेर येथील बलात्कार-ब्लॅकमेलिंग प्रकरणात पहिला निकाल तब्बल ३२ वर्षांनी आला आहे. यात न्यायालयाने ६ आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी ५ लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. देशभर गाजलेल्या या बलात्कार प्रकरणात जवळपास १०० हिंदू मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. यातील बहुतांश मुली या शाळेत जाणा-या होत्या. अजमेरच्या एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थिनींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. मे १९९२ मध्ये सुरु झालेल्या या घृणास्पद प्रकारानं देशाला हादरवलं होतं. अजमेरचे तत्कालीन डीवायएसपी हरिप्रसाद शर्मा यांनी याप्रकरणी पहिला एफआयआर दाखल केला. (Ajmer Rape Blackmailing Case)
आज तब्बल ३२ वर्षांनी यातील गुन्हेगारांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. मात्र ही शिक्षा पुरेशी आहे का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. कारण या बलात्कार प्रकरणातील अनेक मुलींचे पालक बदनामीच्या भीतीपोटी गुन्हे नोंदवण्यास पुढे आले नाहीत. अनेक कुटुंबानी अजमेर सोडून अन्यत्र आश्रय घेतला. तर यात अडकलेल्या मुलींचे शिक्षणही थांबले. कायम समाजातील बदनामीच्या भीतीनं त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. यासर्वाची शिक्षा जन्मठेप कशी असा सवाल विचारण्यात येत आहे. अर्थात या प्रकरणातील आरोपी अजून वरच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या १०० मुलींना खरा न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे. (Ajmer Rape Blackmailing Case)
अजमेरमध्ये ३० वर्षापूर्वी शालेय मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यात अजमेर युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष फारुख चिश्ती, नफीस चिश्ती आणि अन्वर चिश्ती हे या बलात्कार चक्राचे सूत्रधार होते. त्याच्यासोबत नंतर अनेक तरुण या घृणास्पद प्रकरणात जोडले गेले आणि त्यांनी मुलींचे शोषण केले. या सर्वांनी प्रथम एका शालेय विद्यार्थिनीबरोबर ओळख करुन तिला आपल्या फार्म हाऊसवर बोलवले होते. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या सर्वाचे फोटो काढले गेले. मुलीचे नग्न फोटोही काढले गेले. हे फोटे समाजासमोर आणण्याची धमकी तिला देण्यात आली. यातून सुटका हवी असेल तर तुझ्या दुस-या मैत्रिणीला सोबत घेऊन ये, अशी त्या मुलीला धमकी देण्यात आली. यातून सुटका होण्यासाठी या मुली आपल्या मैत्रिणींना घेऊन यायला लागल्या. हे चक्र सुरु झाले. यात एक-दोन नाही तर जवळपास १०० विद्यार्थिंनींचा बळी गेला. (Ajmer Rape Blackmailing Case)
एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलींचे फोटो झाले की, या फोटोंची माहिती अजमेर शहरभर झाली. ज्या लॅबमधून या आरोपींनी या मुलींचे फोटो तयार केले होते, त्या लॅबमधून ही छायाचित्रे शहरातील इतर लोकांच्या हाती लागली. त्यांनी या छायाचित्रांच्या मदतीने त्या मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर बलात्कार केला. त्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्या ७ मुलींनी आत्महत्या केली. या सर्व मुलींचे वय १७ ते २० दरम्यानचे होते. ज्या शाळेतली मुलींचे हे फोटो होते, ती शाळा अजमेरमधील प्रतिष्ठित शाळा होती. यात मान्यवर अधिकारी आणि अजमेरच्या प्रतिष्ठित कुटुंबातील मुली शिकत होत्या. त्यांचे फोटे नग्न फोटो शहरभर दिसू लागल्यानं खळबळ उडाली. त्यामुळे या काही मुलींच्या कुटुंबानी रातोरात शहर सोडलं. हेच फोटो छायाचित्र दैनिक नवज्योती वृत्तपत्राचे पत्रकार संतोष गुप्ता यांच्यापर्यंत पोहोचले. (Ajmer Rape Blackmailing Case)
============
हे देखील वाचा : एका ट्रेनी डॉक्टरची हत्या !
============
गुप्ता यांनी या प्रकरणाचा सचोटीनं तपास केला आणि भयंकर सत्य समोर आलं. यासाठी गुप्ता यांनाही ब-याचवेळा धमकी मिळाली. कारण या गुन्ह्यातील चिश्ती हे अजमेरमधील प्रतिष्ठित समजले जात होते. गुप्ता आणि पोलीसांच्या पाठपुराव्यानंतर १०० मुलींवर झालेला गॅंगरेप उघड झाला. हे प्रकरण जेव्हा उघड झाले, तेव्हा राजस्थानमध्ये भाजपचे सरकार होते आणि भैरोसिंग शेखावत मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं पोलिस कारवाई करण्याच्या सूचना केल्या. मात्र यासंदर्भात बातमी छापून १५ दिवस उलटून गेल्यावरही आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. यातील सर्व मुली या हिंदू कुटुंबातील होत्या. राजस्थानच्या इतिहासाला त्यामुळे धक्का लागला. यामुळे देशभर हिंदू संघटांनी आंदोलनही केले. आता तब्बल ३२ वर्षानंतर या मुलींना आणि त्यांच्यासोबत फरफट झालेल्या सर्व कुटुंबाला न्याय मिळाला आहे. मात्र या सर्व कुटुंबांची कहाणी दुर्दैवी आहे. या सर्व काळात त्यांना अनेक धमक्या आणि मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागले आहे. ज्या १०० मुली या सर्वात भरडल्या गेल्या त्यांचे आयुष्य उधवस्त झाले आहे. म्हणूनच या सर्वांची शिक्षा फक्त जन्मठेप कशी हा सवाल विचारण्यात येत आहे. (Ajmer Rape Blackmailing Case)
सई बने