Home » पुन्हा चीनचा अवघ्या जगाला होणार ताप….

पुन्हा चीनचा अवघ्या जगाला होणार ताप….

by Team Gajawaja
0 comment
Viral Fever
Share

चीनमधील वुहानमध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या अनेक पटीत वाढत आहे. चिंतेची गोष्ट अशी की, त्यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. तापानं (Viral Fever) आजारी असलेल्या मुलांच्या रांगाच रांगा हॉस्पिटलमध्ये लागल्याचे दृष्य आता वुहानमध्ये सर्वत्रच पाहावयास मिळत आहे. पण यात भयावह स्थिती म्हणजे, या हॉस्पिटलमध्ये पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात भर म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचीही कमतरता जाणवत आहे. चीनमध्ये वाढणारी ही भायवह स्थिती पाहता, चीनमधील अनेक विद्यापिठांनी मुलांना घरातून अभ्यास करण्याची परवानगी दिली आहे. चीनमध्ये शून्य कोविड पॉलिसीविरोधात जनतेनं केलेल्या उठावामुळे सरकारनं नमत घेत आपलं धोरण शिथिल केलं आहे.  पण त्यापाठोपाठ कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येनं वाढ झाली आहे. आता ही वाढ चीनच्या बाहेर पसरणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा पुन्हा एकदा कोरोना या संकटाबरोबर लढा द्यावा लागणार आहे.  

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार असल्यासारखी परिस्थिती आहे.  तापावर (Viral Fever) असणारी औषधे संपली असून औषधाच्या दुकानात लांबच लांब रांगा लागल्याचे दृष्य आता सर्वत्र दिसू लागले आहे. चीनमध्ये सर्वात भयावह परिस्थिती वुहान शहरात आहे. वुहान शहरात शेकडो मुले तापाने आजारी पडल्याचे वृत्त आहे. एकाच दिवशी साधारण 700 हून अधिक मुले डॉक्टरांसाठी रांगेत उभे असल्याची नोंद झाली आहे. मात्र रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्याही कमी असल्याने या लांबच लांब रांगा वाढत आहेत. चीनमध्ये झिरो कोविड धोरणाचे कठोर नियम आंदोलनानंतर शिथिल केले. त्यानंतर कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. वुहान शहरात शेकडो मुले तापाने आजारी पडल्याचे वृत्त आहे. चीनच्या वृत्तपत्रानुसार वुहानमध्ये उभारण्यात आलेल्या तापाच्या क्लिनिकमध्ये लांबच लांब रांगा आहेत.  डॉक्टरांनी कोविड पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांना घरगुती उपचार घेण्यास सुचवले आहेत.  तरीही हे रुग्ण औषधांसाठी रुग्णालयात गर्दी करीत आहेत. कोविड पॉझिटीव्ह आढळलेले लोक अजूनही कोरोना व्हायरसमुळे खूप घाबरले आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणं असलेले रुग्णही रुग्णालयात येत आहेत. आता वुहान शहरातील तापाच्या (Viral Fever) क्लिनिक समोरील लांबलचक रांगांचे फोटो चिनी सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. डॉक्टरांच्या क्लिनिकपासून ते पार पार्कींग बाहेर पडलेल्या या रांगा चिनमधील कोरोनाची भयावह स्थिती दर्शवित आहेत.  ही परिस्थिती पाहता, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात कोविड रुग्णांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनमधील काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना घरून अभ्यास करण्याची परवानगी दिली आहे. शांघाय मधील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना लवकर घरी परत जा किंवा कॅम्पसमध्येच रहा आणि दर 48 तासांनी कोरोनाची चाचणी करा अशा सक्त सूचना दिल्या आहेत.  

या सर्वात चिनमधील औषधांच्या दुकानात औषधे संपत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.  बीजिंग सारख्या शहरातही या तक्रारी आहेत.  बीजिंगमधील औषधांच्या दुकानासमोरही औषधांसाठी लांब रांगा लागल्याचे दृश्य आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानंही देशातील कोविड बाधित लोकांची खरी आकडेवारी निश्चित करणे शक्य नसल्याचे जाहीर केल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. चिनच्या वृत्तवाहिन्यांनुसार चिनमध्ये ताप कमी करणाऱ्या औषधांचा साठा केला जात आहे. औषध खरेदी करण्यासाठी नागरिक थेट घाऊक विक्रेत्यांकडेही जात असून त्यांच्याकडून मोठ्या संख्येनं औषधं घेत आहेत. अशा परिस्थितीत तापाने (Viral Fever) त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता उपचारासाठी घरगुती उपायांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातून असे घरगुती उपाय शेअर केले जात आहेत.  इतर नागरिकांनाही त्याचा फायदा होईल, हा उद्देश ठेऊन नागरिक स्वतः घरगुती औषधं बनवित असून त्यातील घटक आणि त्यांचे प्रमाण यांची माहिती इतरांनाही देत आहेत. चीनमधील लाखो वृद्ध नागरिकांचे अद्याप पूर्णपणे लसीकरण झालेले नाही. कोविड बाधित रुग्णांच्या येणाऱ्या संख्येला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांमध्ये संसाधनांची कमतरता जाणवत आहे.  त्यामुळेच लहानमुलांमधील तापाचे प्रमाण वृद्धांपर्यंत पोहचले तर मोठा धोका निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

=========

हे देखील वाचा : अरुणाचल प्रदेशात चीनसोबत काय आहे सीमा वाद?

=========

चीनमध्ये शून्य कोविड धोरण रद्द केल्यानंतर चीनच्या सर्वोच्च आरोग्य संघटनेने बीजिंगमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होण्याचा इशारा दिला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात चीनने गेल्या आठवड्यातच जवळपास ३ वर्षांसाठी मास टेस्टिंग आणि क्वारंटाइनचे निर्बंध सैल केले आहेत. त्यामुळे आता वास्तविक रुग्ण किती आहेत, हे सांगणे आता शक्य नसल्याचे चिनमधील आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे.  

चीनमध्ये 22 जानेवारी रोजी चंद्र नववर्ष येत आहे.  हे चंद्रनववर्ष चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते.  त्यावेळी गर्दी होऊन कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहेत.  त्यातच विद्यापीठे आणि शांळांची मोठी अडचण निर्माण झाली आह.  गेल्या तीन वर्षांत चीनमधील विद्यापीठांमध्ये अनेकवेळा विद्यांर्थ्यांवर लॉकडाउन लादण्यात आला.  याचा कंटाळा येऊन कॅम्पसमधील विद्यार्थी तेथील असुविधांमुळे अधिकाऱ्यांबरोबर वाद घालत आहेत.  प्रमुख शहरात रेस्टॉरंट्स बंद आहेत.   कारण बर्‍याच व्यवसायांना संक्रमित न झालेले कर्मचारी शोधण्यात अडचण येत आहे.  चीनमध्ये कोरोनाचा हा वाढता संसर्ग जगासाठी पुन्हा त्रासदायक ठरणार नाही ना याचीच चिंता जागतिक आरोग्य संघटनांना सतावत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.