कोरोना हा रोग येण्यापूर्वी कोणी कुठल्या महामारीचा दावा केला तरी त्याची मस्करी केली जायची. मात्र कोरोनानं सगळंच चित्र बदलून टाकलं. कधी कोणताही रोग येऊ शकतो आणि त्याचा मानवी जीवनावर अमुलाग्र फरक पडू शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळेच की काय, कुठल्याही नव्या रोगाची किंवा विषाणुंची चाहूल जरी लागली तरी आता प्रचंड काळजी घेण्यात येत आहे. अशाच एका विषाणुची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. हा विषाणु म्हणजे एक अमिबा (Amoeba) असून तो मानवी शरीरात नाकावाटे प्रवेश करतो. अमिबाचा आकार किती असतो, हे आपण प्रत्येकानंच शालेय अभ्यासक्रमात जाणले आहे. अगदी डोळ्यांनाही न दिसणारा हा अमिबा नाकावाटे थेट मेंदुत जातो आणि मग तो मेंदू खायला सुरुवात करतो. एकूण दहा दिवसात हा अमिबा पूर्ण मानवी मेंदूला व्यापून टाकतो आणि त्यात त्या माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. अशीच एक घटना दक्षिण कोरीयातील नागरिकाबाबत झाली आहे. त्यामुळे आरोग्य संघटना सतर्क झाल्या असून या अमिबाबाबत (Amoeba) अधिक शोध करण्याचे काम आरोग्य यंत्रणांतर्फे करण्यात येत आहे.
गेल्या वर्षातील म्हणजेच 10 डिसेंबर 2022 रोजी या अमिबाबाबत(Amoeba) आरोग्य संघटनांपुढे एक घटना आली. चार महिने थायलंडमध्ये राहिल्यानंतर एक 50 वर्षीय व्यक्ती आपल्या देशात दक्षिण कोरियाला परत आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याला खूप ताप, उलट्या आणि मान जड होण्याचा त्रास जाणवू लागला. शिवाय डोकेदुखी, शरीरात जडपणा आणि बोलण्यात अडचण यांसारखी लक्षणे दिसू लागली. यामुळे त्या व्यक्तीनं लगेच डॉक्टरांकडे तपासणी केली. डॉक्टरांना ही लक्षणे गंभीर वाटली. त्यांनी त्या व्यक्तींची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर ही व्यक्ती ‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस’ म्हणजेच पीएएम आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच या आजारात मेंदू खाणारा अमिबा शरीरात प्रवेश करुन मानवी मेंदूला संक्रमित करतो आणि मेंदूचे मांस खातो. त्यामुळेच व्यक्ती काही दिवसांतच विकलांग होते, व्यक्तीचे हातपाय आणि शरीरच अचेतन होऊन त्याचा मृत्यू होतो. ही घटना उघड झाल्यावर अमेरिकन हेल्थ एजन्सी सीडीसीनेही एक सूचना जाहीर करुन यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी विशेष गटाची स्थापना केली आहे.
आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हे सामान्य अमीबा (Amoeba) नाहीत. हे अमिबा इतके जीवघेणे आहेत की जर त्याचे संक्रमण वेळीच शरीरातून बाहेर काढून थांबवले नाही तर सरासरी 5 ते 10 दिवसात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. दक्षिण कोरियाच्या ‘कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन एजन्सी’ने सांगितले की, मेंदू खाणाऱ्या या अमिबाचे नाव ‘नाएग्लेरिया फॉवलेरी’ आहे. हा अमिबा हळूहळू मेंदूला व्यापून टाकतो. अमिबातून (Amoeba) संसर्ग पसरल्यामुळे मेंदूला सूज येऊ लागते आणि त्याचे कार्य स्थिरावते. मेंदू खाणारा अमिबा नाकातून मानवी शरीरात प्रवेश करतो आणि नंतर मेंदूकडे जातो. जेव्हा कोणी पाण्यात पोहायला किंवा डुबकी मारायला जातो तेव्हा हा अमिबा सामान्यत: माणसांना आपला शिकार बनवतो. याशिवाय अनेक वेळा घाणेरडे किंवा गोठलेले पाणी वापरल्याने हा संसर्ग पसरण्याची शक्यता असते. मेंदू खाणारा अमिबा मानवी शरीरात प्रवेश करताच संसर्ग पसरवण्यास सुरुवात करतो. त्याची लक्षणे 1 दिवस ते 12 दिवसात दिसू लागतात. डोकेदुखी, उलट्या आणि ताप यानंतर व्यक्तीच्या मानेमध्ये वेदना होऊ लागतात. या संसर्गामुळे अनेक जण कोमातही जाऊ शकतात.
=======
हे देखील वाचा : लाखो रुपये खर्च करुन व्यक्ती बनला लांडगा
=======
आजपर्यंत 56 वर्षांत ‘नागेल्रिया फ्लॉवरी’ म्हणजेच मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची 381 प्रकरणे जगात नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 154 प्रकरणे एकट्या अमेरिकेत आढळून आली आहेत. 2022 मध्ये प्रथमच दक्षिण कोरियामध्ये याशी संबंधित एक प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेत 154 लोकांना याची लागण झाली होती, त्यापैकी फक्त चार लोक वाचले. अमेरिकेशिवाय भारत, पाकिस्तान आणि थायलंडमध्येही यासंबंधीची प्रकरणे समोर आली आहेत. मेंदू खाणारा अमिबा निरोगी माणसाचा वेदनादायक मृत्यू होऊ शकतो. त्यामुळेच आता या अमिबाबाबत (Amoeba) आरोग्य संघटना सतर्क झाल्या आहेत आणि त्याच्या संशोधनासाठी विशेष मोहीम चालू करण्यात आली आहे.
सई बने…