शेअर ब्रोकर हर्षद मेहता याच्या जीवनावर आलेला द बिग बुल ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे. यात अभिषेक बच्चन हेमंत शाहच्या भूमिकेत आहे. सामान्य घरातला हा तरुण शेअरच्या माध्यमातून करोडोंची उलाढला करु लागतो. त्याचा हा सामान्य ते करोडपती होण्याचा प्रवास. शेअर बाजारातील डाव, उद्योपती आणि राजकारणी यांची एकमेकांवर कुरघोडी आणि या सर्वांवर मात करुन स्वतःला प्रस्थापित करणारा हेमंत शाह… नंतर आपल्याच वर्चस्वाचा गर्व झाल्यावर त्याचे होणारे अधःपतन आणि वाटेला आलेले एकाकीपण… हे सगळे पैलू ‘द बिग बुल’ चित्रपटात पहाता येतील. शेअर ब्रोकर हर्षद मेहताच्या जीवनावर आधारीत द बिग बुल चित्रपटात सबकुछ अभिषेक बच्चन आहे. गुरु चित्रपटानंतर अभिषेकच्या अभिनयाची छाप पाडणारा द बिग बुल चित्रपट आहे.
एका साध्या चाळीत रहाणाऱ्या हेमंत शाहपासून चित्रपटाची कथा सुरु होते. अमिताभ बच्चनबरोबर या हेमंत शाहची तुलना होते. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर चित्रपटसृष्टीत कोणीही स्पर्धा करु शकत नाही… ते शहेनशाह आहेत आणि कायम रहाणार… तसाच हा हेमंत शाह शहेनशाह होतो, तो शेअर बाजाराचा… त्याच्या आसपास वावरणारे अनेकजण त्याच्याकडून फक्त शेअरच्या टिप घेऊन लखपती झाले. स्वतःच्याच गुर्मीत जगणा-या या हेमंत शाहची कथाच न्यारी आहे. ही सगळी गुर्मी अभिषेक बच्चननं आपल्या खास ढंगात साकारली आहे.
डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या द बिग बुलचे (The Big Bull) दिग्दर्शक कूकी गुलाटी आहेत. त्यांच्यासमोर मुख्य चॅलेंज होतं ते स्कॅम १९९२ या वेबसिरीजचे. हंसल मेहता यांची ही वेबसिरीज नंबर वन ठरली आहे. त्याचवेळी त्याच विषयावर चित्रपट आणणं एक चॅलेंज होतं. पण कूकी गुलाटी आणि अभिषेक बच्चन यांनी हे चॅलेंज योग्य पद्धतीनं हाताळलं आहे. हर्षद मेहता हे नाव एकेकाळी सर्वश्रुत होतं. अगदी लहान मुलांनाही त्यानं केलेल्या घोटाळ्याची माहिती होती. त्यामुळेच द बिग बुल साकारतांना अधिक सतर्क राहिल्याचे गुलाटी सांगतात. यासाठी त्यांनी अभिषेकच्या संवादावर अधिक लक्ष दिले आहे.
अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) अभिनयाची कमालही इथूनच सुरु होते. एका चाळीत रहाणारा हेमंत शाह सर्वसामान्यांप्रमाणे असतो. कुटुंबाचा भार आणि त्यासाठी कराव्या लागणा-या नोकरीमध्ये त्याचा दिवस जात होता. पण यातही त्याची काही स्वप्न होती… एक प्रेमिका होती… तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी घरी आर्थिक सुबत्ता हवी होती. या सर्वांसाठी नोकरी पुरेशी नव्हती. काहीतरी वेगळा विचार करायची गरज होती. त्याचवेळी हेमंत शाह शेअर बाजाराची माहिती घेतो. एका साध्या युवकाला शेअरमध्ये गुंतण्यासाठी पैसे कोण देणार? हा प्रश्न आल्यावर हेमंत शाह मग बॅंकेमधून वेगळ्या मार्गांनी पैसा उपलब्ध करतो. शेअरमध्ये गुतवतो आणि तिथला राजा होतो. नंतर या राजाच्या भोवती शेअर बाजार फिरु लागतो. मोठे मोठे उद्योजक त्यांच्या कंपनीचे शेअर वाढवण्यासाठी हेमंत शाहला विनंती करु लागतात, यात मग राजकारणीही येतात. एक साधा हेमंत मग हेमंतभाई होतो आणि इथून त्याच्या यशाला नजर लागायला सुरुवात होते.
हेमंतही या सर्वांकडे दुर्लक्ष करतो. त्याचा लहान भाऊ विरेन त्याला वेळीच धोक्याची जाणीव करुन देतो. पण एव्हाना हेमंतभाई ऐशोआरामी जीवनाकडे झुकलेला असतो. तो भावाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि नकळत अडकला जातो, आरोपी होतो. या सर्वाचा शेवट म्हणजे त्याचा मृत्यू. द बिग बुलची ही कथा आणि पटकथा कुकी गुलाटी आणि अर्जुन धवन यांनी लिहिली आहे. यात अभिषेक बच्चनसह इलियाना डिक्रूज आणि निकीता दत्ता यांच्या भूमिका आहेत. इलियाना डिक्रूज, मीरा राव या पत्रकाराच्या भूमिकेत आहे. याच मीरा रावनं हेमंत शाहचा घोटाळा उघड केला. त्यामुळे इलियानाची भूमिका मह्त्त्वाची आहे. तर निकीता दत्ता हेमंत शाहची प्रेयसी आणि मग पत्नी या भूमिकेत आहे. याशिवाय हेमंत शाहचा छोटा भाऊ विरेन शाह म्हणून सोहम शाह आहे. तर सुप्रिया पाठक या शाह बंधुच्या आईच्या भूमिकेत आहे. याशिवाय महेश मांजरेकर, सौरभ शुक्ला, राम कपूर हे मान्यवर कलाकार छोट्या भूमिकेत असले तरी आपली छाप पाडत आहेत.
द बिग बुलची निर्मिती अजय देवगण आणि आनंद पंडित यांनी केली आहे. अभिषेक बच्चनचा अभिनय आणि उत्तम संवाद यांच्यासाठी द बिग बुल पहावा असाच आहे.
– सई बने