मध्यप्रदेशचा एक भाग असलेल्या छत्तीसगडची 2000 साली स्वतंत्र जिल्हा अशी ओळख झाली. या छत्तीसगडचा इतिहास अतिशय जुना असला तरी या भागाची ओळख येथील नक्षलवादी कारवायांनी अधिक झाली आहे. या छत्तीसगडचा बस्तर भाग नक्षलवाद्यांच्या हल्लानं अनेकवेळा चर्चेत आला आहे. बस्तरला नक्षलवाद्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. (Bastar Movie)
गेल्या 23 वर्षात बस्तरमध्ये 6 हून अधिक मोठे नक्षलवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्याची दाहकता येवढी होती की, अवघा देश स्तब्ध झाला. या हल्ल्यात 1237 जवानांनी हौतात्म्य पत्करले आहे आणि यापेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत. जवानांची ही संख्या मोठी असली तरी बस्तरमधील परिस्थिती जैसे थे अशीच आहे. बस्तर नक्षलवाद्यांपासून अद्यापही मुक्त झाले नाही. या सर्वांमागे काय आहे? बस्तरच्या नक्षलवाद्यांना येवढे बळ कुठून मिळाले, या मागचे कारण काय याची चर्चा सुरु झाली. यावरच प्रकाश टाकणारा एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव आहे, बस्तर. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असून त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे हा चित्रपट द केरळ स्टोरी या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन हे करीत आहेत. द केरळ स्टोरीनं देशभरात एक वादळच उभं केलं आहे. अद्यापही हा चित्रपट चर्चेत आहे. याच चित्रपटाचे निर्माते आता बस्तरवर नवा चित्रपट करीत आहेत. त्यामुळे या चित्रपटानंही असंच वादळ येणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (Bastar Movie)
या चित्रपटाची घोषणा विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केलीच, पण चित्रपटात काय असेल याचीही चुणूक दाखवली आहे. बस्तर चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले असून त्यामध्ये सूंपूर्ण चित्रपटाची कथा कशी राहिल याची माहिती मिळत आहे. बस्तर चित्रपटाच्या पोस्टरवर ‘देशात वादळ आणणारं छुपं सत्य.’ त्याखाली बस्तर (Bastar Movie) असं लिहिलं आहे. त्यावरुनच बस्तर येथील नक्षलवादी चळवळ आणि त्यामागे असलेली राजकीय शक्ती याबाबतही या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आले आहे. बस्तर चित्रपटाचा काही भाग छत्तीसगडच्या बस्तरमध्ये शूट करण्यात येणार आहे. चित्रपटात कोण कलाकार आहेत, याची मात्र अद्यापही माहिती नाही. द केरल स्टोरी मधील कलाकारच बस्तरमध्ये असतील का याबाबत विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पण चित्रपटात स्थानिक कलाकारांनाही घेण्यात येणार असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले आहे. बस्तर हा चित्रपट द केरल स्टोरी चित्रपटापेक्षा वेगळा असेल असे स्पष्ट केले आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
विपुल शाह यांचा द केरळ स्टोरी हा चित्रपट आला तेव्हा कर्नाटकात विधानसभा निवडणुका सुरू होत्या. आता बस्तर चित्रपट येईल तेव्हा देशात लोकसभा निवडणुकीचे वारे असणार आहेत. त्यामुळे या बस्तर चित्रपटाचा निवडणुकीवर काय परिणाम होईल का? हे पाहणेही उत्सुकतेचे असेल. याआधीही बस्तर येथील नक्षलवादावर चित्रपट आले आहेत. प्रकाश झा यांनीही नक्षलवादावर चित्रपट केला असून त्यामध्ये नक्षल कमांडर म्हणून अभिनेता मनोज बाजपेयी दिसला होता. काश्मीर फाईल चित्रपट करणा-या विवेक अग्निहोत्री यांनीही बस्तरच्या नक्षल समस्येवर चित्रपट केला आहे. (Bastar Movie)
========
हे देखील वाचा : तमन्ना भाटियाने विराट कोहलीला डेट केले होते?
========
मध्य प्रदेशपासून वेगळे होऊन छत्तीसगड राज्याच्या निर्मितीला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 23 वर्षात बस्तरमध्ये अनेक बदल झाले असले तरी नक्षलवाद संपलेला नाही. नक्षली कारवायांमुळे येथील अनेक भाग दुर्गम आहे. बस्तरमध्ये अलिकडच्या काही वर्षात रस्ते, वीज, पाणी या सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र बस्तरमध्ये नक्षलवाद्यांची दहशत अजूनही कायम आहे. बस्तरमधील काही भागात सायंकाळी प्रवेश करण्यासही मज्जाव आहे, इतपत नक्षलवादी चळवळीची दहशत या भागात आहे. येथील जगदलपूर ते तेलंगणाला जोडणारा सुकमा कोंटाचा राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्यावर या भागाचे चित्रपट बदलले आहे. पण या महामार्गासाठी अनेक जवानांना त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले आहे. आता कुठे येथील गावकऱ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत सुविधा आणि मोफत रेशनचा लाभ मिळत आहे. पण असे असले तरी बस्तरमध्ये कधी नक्षलवादी हल्ला होईल, हे सांगता येत नाही. याच बस्तरमधील नक्षलवाद आणि हा नक्षलवाद येवढी वर्ष संपूष्ठात का आणता आला नाही, या प्रश्नावर आता विपुल शाह आपल्या बस्तर या आगामी चित्रपटात (Bastar Movie) काय भूमिका मांडतात हे 5 एप्रिल 2024 रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र द काश्मिर फाईल प्रमाणे हा चित्रपटही मोठं वादळ घेऊन येणार हे नक्की.
सई बने