कॅलिफोर्निया (California), युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे घटक राज्य सध्या पाण्याखाली गेल्यासारखे झाले आहे. 26 डिसेंबरपासून ते आतापर्यंत 6 वादळांनी अमेरिकेच्या या राज्याला उद्धस्त केल्यासारखे असून यात जवळपास 17 नागरिकांचा जीव गेला आहे. नागरिकांची करोडोंची मालमत्ता पाण्याखाली गेली आहे. सध्या कॅलिफोर्नियातील (California) 3.4 दशलक्ष लोकांना पुराचा धोका आहे. या राज्यातील अनेक घरांमध्ये वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. जगातील सर्वात ताकदवान देश म्हणून ज्या अमेरिकेचा उल्लेख केला जातो, त्या अमेरिकेच्या एका घटक राज्याची निसर्गानं दाणादाण उडवली आहे. सध्या कॅलिफोर्नियामध्ये सर्वत्र पाण्याचे राज्य आहे. अशी परिस्थिती असताना येत्या दहा दिवसात आणखी चार वादळे या भागावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (California) गेल्या दोन आठवड्यांपासून जोरदार येणा-या वादळांनी अक्षरशः कहर केला आहे. ख्रिसमस सर्वत्र साजरा होत असतांना कॅलिफोर्नियामध्ये एकापाठोपाठ एक वादळांचा मारा होत आहे. सर्वत्र जोरदार पाऊस आणि वादळीवारा सुरु आहे. आतापर्यंत येथे 6 वादळं झाली असून त्यात काही नागरिकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. कॅलिफोर्नियाची जवळपास 90 टक्के लोकसंख्या पाण्याखाली आहे. या वादळांमुळे 2 लाख 20 हजारांहून अधिक घरे आणि दुकानेही पाण्याखाली आहेत. परिणामी येथील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. या भागातील 35 हजार नागरिकांना घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान खात्यानुसार येणा-या आठवड्यात अजूनही मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे.
सध्या कॅलिफोर्नियातील (California) रस्त्यांना नद्यांसारखे स्वरुप आले असून रस्त्यांवर पाणी वाहत आहे. लॉस एंजेलिस शहरात रस्ता खचल्याने काही वाहने खड्ड्यात पडली. कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर अचानक भूस्खलन झाल्यामुळे लोकांना वाहने चालवणेही कठीण झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी कॅलिफोर्नियातील परिस्थिती पाहता राज्यात आणीबाणी लागू केली आहे. कॅलिफोर्नियाच्या स्कॉट्स व्हॅलीमधील सांताक्रूझ पर्वतांमध्ये वादळे आणि मुसळधार पावसानंतर रस्ताच खचला आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याशिवाय पावसाबरोबर असलेल्या जोरदार वा-यामुळे रस्त्यांवर अनेक झाडेही पडली आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. मालिबू येथील पॅसिफिक कोस्ट हायवेवर जोरदार पाऊस आणि वा-यामुळे झालेल्या भूस्खलनात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. आता कॅलिफोर्नियामध्ये (California) वादळानंतर विस्कळीत झालेली वीज व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी काम करण्यात येत आहेत. कॅलिफोर्नियातील अनेक भागात पुरामुळे वाहने पाण्याखाली गेली, त्यांनाही पाण्याबाहेर काढण्यात येत आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसाची संततधार यांनी या सर्व कामावर परिणाम होत आहे. तरीही पुढच्या काही दिवसांत यापेक्षाही मोठी वादळे कॅलिफोर्नियात धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.
=====
हे देखील वाचा : जगातील सर्वात लांब जलमार्गे ‘गंगा विलास क्रूझ होणार
=====
जोरदार झालेल्या पुरामुळे, अनेक रस्ते आणि प्रमुख महामार्ग नद्यांमध्ये बदलले आहेत. रस्ते बंद झाले असून घरे आणि इतर इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. हा धोका येवढ्यापूरता मर्यादीत नसून सीएनएन वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार 20 दशलक्षाहून अधिक कॅलिफोर्नियातील नागरिक अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत. लॉस एंजेलिस आणि सॅन दिएगो क्षेत्रांमध्ये सर्वत्र चिखल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही दिवसांनी येथे रोगराई पसरण्याचा धोकाही वाढला आहे. कॅलिफोर्नियातील (California) अनेक शाळा या वादळामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. एकूण जगातील सर्वात शक्तीमान देश असा बिरुद मिळवलेले अमेरिकेलाही सध्या निसर्गाच्या क्रोधापुढे झुकते घ्यावे लागले आहे.
सई बने