Home » कसा झाला कोल्हापूरच्या ऐश्वर्याचा विम्बल्डनपर्यंतचा प्रवास 

कसा झाला कोल्हापूरच्या ऐश्वर्याचा विम्बल्डनपर्यंतचा प्रवास 

by Team Gajawaja
0 comment
Aishwarya Jadhav
Share

भारतासारख्या आत्तापर्यंत खेळाप्रती फारशा सहिष्णू नसणाऱ्या देशात खेळाडू म्हणून करियर करताना अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. पण ऐश्वर्या जाधवसारख्या (Aishwarya Jadhav) खेळाडूला त्या डोंगरापेक्षा पलीकडची स्वप्नपूर्ती खुणावत असते. म्हणूनच अतिशय साध्या परिस्थितीतून आणि इतक्या लहान वयात विंबल्डनसारख्या जागतिक स्पर्धेत तिचं पोहोचणं खास आणि वेगळं ठरतं.

“बाबांना टेनिस खूप आवडतं. ते स्वतः कधीच हा खेळ खेळले नाहीत, पण ते कायम विंबल्डन पाहायचे आणि आपल्या मुलीनं हा खेळ खेळावा असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी मला टेनिस शिकायला पाठवलं…” विंबल्डनमध्ये अंडर- १४ गटात खेळत असलेली पहिली भारतीय खेळाडू ऐश्वर्या जाधवनं एका क्रीडा चॅनेलच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं ऐकताना तिचा उत्साह, निरागसपणा आणि साधेपणा सहज लक्षात येतो. मुख्य म्हणजे, तिला विंबल्डनमध्ये खेळताना पाहाताना अभिमान वाटतोच, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जाणून घेतल्यावर तिच्याबद्दलच्या अभिमानानं ऊर भरून येतो. (Success Journey of Aishwarya Jadhav)

 अशी घडली ऐश्वर्या

कोल्हापूरजवळ युवलुज नावाच्या छोट्याशा गावात राहाणाऱ्या अंजली आणि दयानंद जाधव या जोडप्यानं ऐश्वर्या नावाच्या आपल्या लेकीला पाचव्या वर्षीच टेनिसच्या क्लासला पाठवायला सुरुवात केली. ऐश्वर्याला या खेळात चांगली गती आहे असं लक्षात आल्यावर तिचे आई- वडील कोल्हापूरला स्थलांतरित झाले. 

टेनिससारख्या काहीशा महागड्या खेळाचा खर्च भागवण्यासाठी आई- वडिलांनी बरेच कष्ट केले आणि ऐश्वर्याही त्यांच्या कष्टांचं चीज करत राहिली. वयाच्या फक्त नवव्या वर्षापासून ती व्यावसायिक पातळीवर टेनिस खेळायला लागली. दरम्यान प्रशिक्षक अर्शद देसाई यांच्या प्रशिक्षणाखाली विंबल्डनमध्ये खेळण्याच्या स्वप्नाच्या दिशेने तिची वाटचाल सुरू झाली होती. अर्थात ते सोपं नव्हतं. 

घरची परिस्थिती बेताची होती. त्यात २०१९ मध्ये आलेल्या पुरात तिच्या टेनिसच्या साहित्यासह घरातलं बरंचसं सामान अक्षरशः वाहून गेलं. त्यातून सावरत असतानाच कोरोनामुळे एकंदरीतच प्रशिक्षण आणि सरावावर परिणाम झाला, मात्र ऐश्वर्याची जिद्द या सगळ्यापेक्षा मोठी होती. सगळ्या अडचणीतून वाट काढत ती खेळत राहिली. (Success Journey of Aishwarya Jadhav)

नवी दिशा

भारतीय संघात प्रवेश केल्यानंतर तिच्या खेळाला नवं परिमाण मिळालं. ती रोज आठ तास कोर्टवर असते आणि त्यापैकी तीन तास ती फक्त फिटनेससाठी देते. संघाच्या प्रशिक्षक अमृता मुखर्जी यांच्या प्रशिक्षणाखाली तिच्या खेळाला नवी धार मिळाली आणि तिथूनच तिनं अंडर- १४ गटात भारतात पहिलं स्थान मिळवलं. मुखर्जी सांगतात की, ऐश्वर्यामध्ये गुणवत्ता तर आहेच, पण तिच्या खेळात सातत्य आहे. शिवाय, वय तिच्या बाजूनं आहे. खेळ उंचावण्यासाठी तिच्याकडे वेळ आहे. येत्या काही वर्षांत ऐश्वर्या आपल्याला टेनिसमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसेल. 

============

हे देखील वाचा –

थेट विंबल्डन

दोन महिन्यांपूर्वी १४ वर्षांखालील मुलींच्या जागतिक टेनिस स्पर्धेत ऐश्वर्यानं ४ सामने जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याच कामगिरीच्या जोरावर तिला विंबल्डनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. ऐश्वर्या विंबल्डनच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाली असली, तरी पहिल्यांदाच ग्रासकोर्टवर खेळताना त्याचा अंदाज घेऊन सराव होईपर्यंत वेळ लागणं स्वाभाविक होतं, “पण त्यानिमित्ताने मला खूप चांगला अनुभव मिळाला. इतर देशांतल्या मुलींबरोबर खेळताना नव्या गोष्टी मी शिकले. मुख्य म्हणजे, मला माझी बलस्थानं आणि कमकुवत बाजू समजल्या,” असं ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्याला विंबल्डनमध्ये अजून दोन सामने खेळायचे आहेत. ती हे सामने जिंकेल की नाही माहीत नाही, पण एक दिवस ती विंबल्डन गाजवणार हे नक्की. 

– कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.