Home » एक पत्र डॉक्टर बहिणीला ….

एक पत्र डॉक्टर बहिणीला ….

by Correspondent
0 comment
Share

पत्रास कारण की……

फुलों का तारों का, सबका केहना हे, एक हजारों मे मेरी बेहना हे.. चिंके.. तुझ्यासाठी म्हणून, खास पत्र लिहायला घेतलंय… तू मेडिकलला
अॅडमिशन घेऊन मुंबईला निघून गेलीस, आपल्या गावात तेव्हा रेंजचा खूप प्रॉब्लेम असायचा; म्हणून वारंवार आपलं पत्रातून बोलणं व्हायचं.. पण त्यालाही आता वीस-एक वर्ष होऊन गेली.. आज इतक्या वर्षांनी तुला पत्र लिहिताना तीच भावना आहे मनात.. तुझी काळजी, खूप प्रेम आणि तेव्हा होता त्यापेक्षा खूप जास्त अभिमान..

मला आठवतंय, लहानपणी तू आईजवळ बसून माझ्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची राखी बनवायचीस, कधी मोत्याची, कधी लोकरीची.. कधी शाळेतून घरी येतेय, आणि कधी एकदा दादाला राखी बांधतेय असं व्हायचं तुला.. आई दरवर्षी तुला सांगायची, “दादा तुझं रक्षण करेल.. ओवाळून झाल्यावर नमस्कार कर त्याला..” पण छे.. एकदा ती गिफ्टची पिशवी तुझ्या हातात पडायचाच अवकाश.. गावभर धिंडोरा पिटत तुझी स्वारी घराबाहेर पडलेली असायची, ती थेट जेवायला घरात.. मग गिफ्ट आवडतीचं असेल तर दादाला अगदी लाडाने भरवलं जायचं
गोडा-धोडाच; नाहीतर मग एखाद्या भाजीपोळीच्या घासावरच समाधान मानावं लागायचं.. मोठ्या तोऱ्यात सांगून जायचीस आईला, “हुssह.., हा कुठलं माझं रक्षण करतोय, मीच याची रक्षा करेन..!!” पण दुसऱ्याच क्षणी, ताई-आत्त्याच्या ओरड्यापासून वाचण्यासाठी माझ्या नावाचा अगदी जयघोष करत सुटायचीस…

अशा अनेक आठवणी आज आठवतायत.. मुंबईसारख्या शहरात गेलीस, स्वतःची प्रॅक्टिस सुरू केलीस, पण एवढ्या वर्षात कधीच रक्षाबंधनच्या दिवशी न भेटता राहिली नाहीस.. यावर्षी मात्र तुला इथे यायला जमणार नाही, आणि मी तर म्हणतोय तू येऊ सुद्धा नकोस कारण तुझी तिथे जास्त गरज आहे.. डॉक्टर झालीस तेव्हा शपथ घेतली होतीस लोकांचे प्राण वाचवेन.. आणि आज तू तेच काम करण्यात इतकी गुंतली आहेस की, मला खात्री आहे तुझं बाकी कशातच लक्ष लागत नसेल.. म्हणूनच या रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुला हे पत्र लिहिलं आहे.. खास तुझे आभार मानायला.. तुझी काळजी घे सांगायला.. चिंके, खरंच गं, पूर्ण देशाची रक्षा तर तू एकटी नाही करू शकत पण माझ्याच सारख्या अनेक भावांच्या बहिणी, अन् अनेक बहिणींचे भाऊ देशाचे रक्षण करत आहेत.. म्हणून या पत्रासोबत ही राखी पाठवत आहे.. तू बांधून घे..

चिंके, मला आणि आपल्या घरात, गावात सगळ्यांनाच तुझा आणि तुझ्या कामाचा प्रचंड आदर आणि अभिमान आहे.. गावातून शहरात जाऊन सुद्धा आपल्या गावाकडे तुझं अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही.. सतत व्हिडीओ सेशन्स मधून तू दिलेले सल्ले, उपाय इथे सगळेच मोठ्या कौतुकाने फॉलो करतायत..

पण सगळ्यांसोबतच तू स्वतःची काळजी घे.. आणि सगळी परिस्थिती पूर्ववत झाल्यावर लवकर घरी ये.. आपला आंब्याचा पार, ओढ्यावरचा झुला, सुलू आणि तिची मुलगी, आम्ही सगळंच तुझी वाट बघतोय..

तुझाच,
दादा.

( पत्रलेखन – कांचन नानल )


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.