तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला हॉलिवूड पॉपस्टार जस्टीन बीबर (Justin Bieber) आजारी असल्याची बातमी आली आणि त्याच्या चाहत्यांच्या हदयाचा ठोका चुकला. जस्टीन त्याच्या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगभर दौरा करणार होता, त्यात तो भारतातही येणार होता. मात्र स्वतः जस्टीनने एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या आजारपणाची बातमी चाहत्यांना दिली आहे. या बातमीमुळे साहजिकच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
व्हिडिओमध्ये जस्टिनने सांगितलं त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. हा ‘रामसे हंट’ सिंड्रोम आहे. याबाबत आपल्या चाहत्यांना सांगताना जस्टिन व्हिडीओमध्ये म्हणाला, “तुम्ही बघू शकता, माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूने, मी हसूही शकत नाही. त्या बाजूच्या डोळ्याची हालचालही होत नाहीत. शो रद्द करण्यामागचं हेच कारण आहे. यामुळे तुम्ही नाराज झाला आहात. पण मी सध्या शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आराम करणार आहे. आणि लवकरच ज्याच्यासाठी माझा जन्म झाला आहे, त्या माझ्या गाण्यासाठी मी पुन्हा सज्ज होणार आहे. (Justin Bieber suffering from Ramsay Hunt syndrome)
याच वर्षी जस्टिनरची पत्नी हेली हिला मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हाही जस्टीनने आपले दौरे पुढे ढकलले होते. आता त्याच्या आजारपणामुळे त्याला त्याचा दौरा रद्द करावा लागत आहे.
जस्टीनला झालेला रामसे हंट सिंड्रोम (RHS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर पुरळ येते. व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो तेव्हा हा दुर्मिळ आजार होतो. यामुळे चेहरा अर्धांगवायू झाल्यासारखा होतो. जस्टीनने टोरंटो आणि वॉशिंगटन डी सी मध्ये होणारे त्याचे शो रद्द केल्यामुळे प्रथमतः त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्यामागचे कारण पुढे आल्याने जस्टीनच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आपल्या जादुई आवाजानं जगाला वेड लावणारा गायक जस्टिन बीबर याने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षांपासून‘पॉपस्टार म्हणून लोकप्रिय आहे. त्याच्या बेबी आणि बिलीव या गाण्याच्या अल्बमने तुफान यश संपादन केले. या गाण्यामुळे जस्टिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या गाण्यानंतर जगभरात तरुणांचा तरुण गायक अशी त्याची ओळख झाली.
तरुण वयात ग्रॅमी सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी 22 नॉमिनेशनसह दोन ग्रॅमी पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच पॉपस्टार ठरला आहे. अलिकडेच जस्टीनने त्याच्या ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगभरात दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्याने काही दिवसांसाठी आपला दौरा पुढे ढकलला आहे.
1 मार्च 1994 रोजी लंडनमध्ये जन्म झालेल्या जस्टीनच्या बालपणाच्या आठवणी गुंतागुंतीच्या नात्यामध्ये अडकलेल्या आहेत. त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला गाण्याची मदत झाली. शाळेत असताना जस्टीन पियानो, ड्रम, गिटार आणि ट्रम्पेट वाजवायला शिकला. वयाच्या 12 व्या वर्षी जस्टीनने स्ट्रॅटफोर्डमधील स्थानिक गायन स्पर्धेसाठी ‘सो सिक’ हे गाणे गायले आणि त्याला दुसरे स्थान मिळाले. हा व्हिडीओ त्याच्या आईनं त्याच्या मित्रमंडळींना पाठवला आणि तिथूनच जस्टीन बीबर या पॉपस्टारचा प्रवास सुरू झाला.
===========
हे देखील वाचा – ऋतिक रोशनची धाकटी बहीण पश्मीना लवकरच मोठ्या पडद्यावर
===========
जगभरातील 150 दशलक्ष रेकॉर्ड्सच्या विक्रीसह जस्टीन हा आतापर्यंतचा सर्वाधिक प्रसिद्ध गायक आहे. त्याला दोन ग्रॅमी पुरस्कार, एक लॅटिन ग्रॅमी पुरस्कार, आठ जुनो पुरस्कार, दोन ब्रिट पुरस्कार, एक बांबी पुरस्कार, 26 बिलबोर्ड संगीत पुरस्कार, 18 अमेरिकन संगीत पुरस्कार, 21 एमटीव्ही युरोप संगीत पुरस्कार मिळाले आहेत.
एकूण जस्टीन बीबर हा पॉपसंगीतातील स्टार आहे. तो पुन्हा आपल्या गीटारसह स्टेजवर यावा आणि त्याचा जादुई आवाजाची जादू सर्वदूर पसरावी यासाठी त्याचे चाहते सध्या प्रार्थना करत आहेत.
– सई बने