“आपण ठरल्याप्रमाणे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर गेलो असतो, पण मला आणि माझ्या मनसे कार्यकर्त्यांना विविध गुन्ह्यात अडकविण्याचा ‘सापळा’ रचण्यात आला होता. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला ते परवडणारे नव्हते. म्हणून मी नियोजित अयोध्या दौरा स्थगित केला”, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी रविवारी पुण्याच्या सभेत सांगितले. त्यांचा ५ जूनचा बहुचर्चित अयोध्या दौरा स्थगित का करण्यात आला त्याचे त्यांनी अशा प्रकारे समर्थन केले. (Raj Thackeray’s Pune rally)
हा ‘सापळा’ कोणी रचला हे मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. ते ‘राझ’ त्यांनी कायमच ठेवले आहे. परंतु हा सापळा रचण्यासाठी मुंबई आणि दिल्लीतून ‘रसद’ पुरविण्यात आली, असे सांगून त्यांनी तर्क-वितर्कांना जागा ठेवली. त्याप्रमाणे मनसे विरोधकांकडून लगेच तर्क-वितर्क सुरूही झाले.
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, भाजपनेच हा ‘सापळा’ रचला होता असे स्पष्टपणे सांगून भाजपनेच राज ठाकरे यांना याप्रकरणात तोंडघशी पाडल्याचे सांगितले, तर काही जणांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला सातत्याने विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार यांची ‘घट्ट मैत्री कारणीभूत असल्याचा असल्याचा साक्षात्कार झाला. (Raj Thackeray’s Pune rally)

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केल्यामुळे राज ठाकरे पुण्याच्या सभेत त्यांचा आपल्या खास ‘ठाकरी भाषेतील शैलीत’ समाचार घेणार असे बऱ्याच जणांना वाटलं होतं. मात्र त्यांनी बृजभूषण सिंह यांचं नावही घेणं टाळलं. ‘एक खासदार’ एवढाच त्यांनी त्यांचा उल्लेख केला. यावरून, बोलतांना त्यांनी किती सावधगिरी बाळगली होती याची कल्पना येते.
याशिवाय भाजपकडे ते अधिक झुकल्याचे यामुळे प्रत्यंतर आले. राज्यातील अन्य प्रश्नांचा उल्लेख करीत राज ठाकरे यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते श्री शरद पवार यांच्यावर केलेली टीका देखील नेहमीची आणि गुळगुळीत स्वरूपाची होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह अनेकांची निराशा झाली हे नक्कीच. नाही म्हणायला स्वतःच्या प्रकृतीबाबत बोलताना त्यांनी शस्त्रक्रियेचे कारण सांगून पुढील काळात विश्रांती घ्यावी लागेल असेही स्पष्ट केले. (Raj Thackeray’s Pune rally)
नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्याची वेळ आल्यामुळे झालेली मानहानी भरून काढण्यासाठी सहानुभूती मिळविण्याचा हा उतारा निश्चितच चांगला म्हणावा लागेल.
पुण्याच्या या सभेचा समारोप करताना राज ठाकरे यांनी भोंग्याविषयीचे आंदोलन यापुढेही चालूच राहील, असे स्पष्टपणे सांगितले. वास्तविक राज ठाकरे यांच्या आदेशानंतर भोंग्यांच्या प्रश्नांबाबत मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभर केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी राज्यात सर्वत्र कायद्याची कडक अंमलबजावणी केल्यानंतर भोंग्याच्या प्रश्नातील हवा तशी केंव्हाच निघून गेली आहे. त्यामुळे आता पुन्हा हे आंदोलन सुरू करायला लावून राज ठाकरे यांना काय मिळणार आहे ? हा प्रश्नच आहे.

उलट या भोंग्याच्या आंदोलनामुळे पक्षातील बरेच कार्यकर्ते, विशेषतः पुण्यातील कार्यकर्ते नाराज असल्याची त्यांना जाणीव करून आल्यानंतर देखील त्यांनी हेच आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेऊन काय साध्य केलं, हे कळायला मार्ग नाही. (Raj Thackeray’s Pune rally)
एकीकडे पक्षवाढीसाठी कसलेही प्रयत्न केले जात नसताना घेतलेल्या काही निर्णयामुळे पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी वाढत असेल, तर पक्षगळती होऊ शकते एवढी साधी कल्पना पक्ष नेतृत्वाला येत नसेल, तर त्याला काय म्हणावे? पुणे शहरातील वसंत मोरे यांच्यासारखे निष्ठावंत आणि लढवय्ये कार्यकर्ते पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहेत, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या नाराजीत भर घालण्याचेच काम केले जात आहे. अशाने पक्ष बळकट होणार कसा?
====
हे देखील वाचा – संजय राऊत म्हणाले- 15 जूनला शेकडो शिवसैनिक जाणार अयोध्येला
====
पक्ष नेतृत्वाच्या वैचारिक गोंधळामुळे पुन्हा एकदा पक्षाची हानी होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांचा वेळीच ‘मनसे’ विचार करण्याची गरज आहे. नाही तर नजिकच्या काळात’ पक्षाला पुन्हा एकदा मर्यादित स्वरूप प्राप्त होऊ शकते.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)