Home » सौदी अरेबियातील महिला होतायत मुक्त! आता मिळणार चक्क बॉर्डर गार्ड्स म्हणून काम करण्याची संधी!

सौदी अरेबियातील महिला होतायत मुक्त! आता मिळणार चक्क बॉर्डर गार्ड्स म्हणून काम करण्याची संधी!

by Team Gajawaja
0 comment
Saudi Arabia Border Guards
Share

जगभरात महिला विविध क्षेत्रात भरारी घेत असल्या तरी सौदी अरेबियामधील महिलांना मात्र अनेक कडक नियमांमध्ये रहावे लागत होते.  मात्र अलिकडील काही वर्षात ही परिस्थिती बदलू लागली आहे. आता सौदी अरेबियामध्ये महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. 

सौदी अरेबियातील महिलांना आता सौदी अरेबियाच्या ‘बॉर्डर गार्ड्स’मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी नुकतीच एक जाहीरात प्रसिद्ध झाली असून, महिलांनी बॉर्डर गार्ड्स म्हणून भरती होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सरकारनं केलेल्या या नव्या घोषणेचे सौदी अरेबियामधील तमाम महिला संघटनांनी स्वागत केले असून, नव्या सुधारीत धोरणांसाठी आभारही व्यक्त केले आहेत. 

सौदी अरेबियाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलांना एवढी मोठी संधी मिळत आहे. सौदी अरेबियाच्या मंत्रालयानेच ही घोषणा केल्याने सरकारी आणि खासगी विभागातही काम करण्याची संधी महिलांना मिळणार आहे. (Saudi Arabia Border Guards)

यापूर्वी मक्का येथे महिला गार्डची नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णयही घेण्यात आला. त्याद्वारे हज यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरुंच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात आली. तसेच कुवैतमधील सैन्यातही महिलांना प्रवेश मिळाला आहे. कट्टर मुस्लिम देशांनी महिलांना दिलेल्या या बरोबरीच्या संधींमुळे जगभरातून त्याचे स्वागत होत आहे.

सौदी अरेबियामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून महिलांसाठी सुरक्षादलात सामिल होण्याची संधी उपलब्ध करण्यात आली. त्यासाठी 25 ते 35 वयोगटातील इच्छुक महिलांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. (Saudi Arabia Border Guards)

हे अर्ज भरताना मात्र काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात, सदर महिलेची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, ही प्रमुख अट आहे. याद्वारे महिला आता सुरक्षा दल, शाही वायुदल, नौसेना, शाही सौदी सामरीक मिसाईल दल, सशस्त्र बल आणि चिकित्सा सेवा दल यामध्ये सहभागी होऊ शकतात.  

सौदी अरेबियामध्ये महिलांबाबत सुधारणावादी धोरण स्विकारण्यात आले आहे. त्या प्रक्रीयेला विजन 2030 असे नाव देण्यात आले आहे. गेल्या महिन्यात याच धोरणाअंतर्गत महिलांना प्रथमच उंटाच्या सौदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. (Saudi Arabia Border Guards)

रेगिस्तानचे जहाज या नावानं होणाऱ्या या स्पर्धेत आत्तापर्यंत फक्त पुरुष स्पर्धक आपल्या उंटांसह सहभागी होत असत. मात्र यंदा पहिल्यांदाच ही संधी महिलांनाही देण्यात आली. तसेच कुटुंबातही महिलांना निर्णय घेण्याबाबत अधिकार देण्यात आले आहेत. 

सन 2017 मध्ये सौदीमध्ये मोहम्मद बिन सलमान यांना क्राऊन प्रिंस म्हणून नियुक्त करण्यात आले.  त्यांनी पुढाकार घेऊन महिलांना मुख्य प्रवाहात सामिल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या सौदीमध्ये प्रशासनिक आणि सेवा विभागामध्ये जवळपास 200 महिला काम करत आहेत. याशिवाय महिला सैनिकांची नियुक्तीही मक्का मदिनासारख्या पवित्र स्थळी करण्यात आली. (Saudi Arabia Border Guards)

=====

हे देखील वाचा – युक्रेनमध्ये चर्चा आहे या दोन लढवय्या महिलांची… 

=====

खाकी वर्दी घातलेल्या या दिड हजार महिला सैनिक सुरक्षाविभागाची सगळी जबाबदारी सांभाळत आहेत.  जगभरातून या कृतीचे कौतुक करण्यात आले. सौदी अरेबियामध्ये अद्यापही काही जाचक अटी महिलांसाठी आहेत. बॅंका, पासपोर्ट कार्यालय, हॉटेल येथे महिलांना आपल्या घरातील पुरुष मंडळींची परवानगी नसेल, तर जाता येत नाही. मात्र असे असले तरी काही बाबतीत तरी महिला स्वतंत्र होत असल्यामुळे येथील महिला संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.