येत्या १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा होणार आहे. देशभरातील शिवमंदिरात यासाठी सजावट सुरु आहे. या सर्वात बेंगळुरु येथील एका रहस्यमयी शिवमंदिरामधील दक्षिणमुखी नंदीच्या चमत्काराची चर्चा सुरु झाली आहे. बेंगळुरु येथील कडू मल्लेश्वर मंदिर आणि तेथील दक्षिणामुखी नंदी हे श्रद्धा, गूढता आणि आध्यात्मिक उर्जेचे केंद्र मानले जाते. ४०० वर्ष जुन्या असलेल्या या मंदिरातील नंदीच्या मुखातून पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो. हा प्रवाह नेमका कुठून येतो, आणि तो कुठे जातो, हे गुढ शोधण्याचा अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला आहे. पण त्यात त्यांना अपयश आले आहे. शिवरात्रीला या चमत्कारी नंदी महाराजांच्या मुखातील पाणी बघण्यासाठी भारतभरातील शिवभक्त मंदिरात गर्दी करतात. यावेळीही मोठ्या संख्येनं शिवभक्त मंदिरात दाखल होत असून महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी मंदिर प्रशासनातर्फे मोठी तयारी सुरु झाली आहे. ( Kadu Malleshwara Temple )

महाशिवरात्र हा तमाम शिवभक्तांसाठी सर्वात मोठा दिवस असतो. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यावेळी महाशिवरात्र १५ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. यादिवशी देशभरातील सर्वच भगवान शंकराच्या मंदिरामध्ये शिवभक्त महादेवच्या चरणी लीन होतात. यातही कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमधील एका मंदिरामध्ये मोठ्या संख्येनं शिवभक्त जमतात. बंगळुरुचे कडू मल्लेश्वर मंदिर चमत्कार आणि रहस्यासाठी ओळखले जाते. लाखो भक्त महाशिवरात्रीला या मंदिरात हा चमत्कार बघण्यासाठी येतात. येथील शिवलिंगावरून पाण्याचा अखंड प्रवाह वाहत असतो. हा पाण्याचा प्रवाह कुठून येतो, याचा अद्यापही शोध लागलेला नाही.
हे प्राचीन कडू मल्लेश्वर मंदिर, मल्लेश्वरम परिसरात आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे आणि या कडू मल्लेश्वर मंदिरात साम्य असल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील शिवलिंग हे मल्लिकार्जुनचे एक रूप असल्याचे मानले जाते. हे मंदिर १७ व्या शतकात मराठा राजा शिवाजी यांचे भाऊ वेंकाजी यांनी बांधले. संपूर्ण मंदिरात मराठा आणि द्रविड शैलीतील कोरीवकाम आणि स्थापत्यकला दिसते. मंदिराच्या भिंती, खांब आणि शिखरावरील कोरीवकाम त्याची प्राचीन भव्यता दर्शवते. मंदिर अत्यंत सुंदर असून तेथील वास्तूकला पाहण्यासारखी आहे. ( Kadu Malleshwara Temple )
४०० वर्षे जुन्या असलेल्या या मंदिराच्या जवळच श्री दक्षिणामुखी नंदी तीर्थ कल्याणी क्षेत्र आहे. स्थानिक श्रद्धेनुसार, नंदी तीर्थाचे दर्शन घेतल्याशिवाय कडू मल्लेश्वर मंदिरातील पूजा अपूर्ण मानली जाते. ही नंदी महाराजांची मूर्ती एका काळ्या दगडातून कोरलेली आहे. या दगडी मूर्तीच्या मुखातून पाण्याचा सतत प्रवाह वाहत असतो. हे पाणी वर्षाचे बाराही महिने असते, आणि ते अत्यंत थंड असते. हा पाण्याचा प्रवाह थेट शिवलिंगावर पडतो.
शिवलिंगावर येणारे हे थंड पाणी येते कुठून हा प्रश्न अनेक भाविकांना पडतो. या पाण्याचा स्त्रोत नेमका कुठे आहे, याचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. मात्र त्यात यश आलेले नाही. त्यामुळेच नंदी महाराजांच्या मुखातून वाहणारे आणि शिवलिंगावर अभिषेक करणारे हे पाणी भाविक चमत्कारी मानतात. भाविक तिर्थ म्हणून अभिषेक केलेल्या या पाण्याचे सेवन करतात. महाशिवरात्रीला ही नंदीधारा बघणे पवित्र मानले जाते.
=======
हे देखील वाचा : Shiv Jayanti : आत्मविश्वास आणि लढण्याची उमेद देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार
=======
महाशिवरात्रीनिमित्त या कडू मल्लेश्वर मंदिरात १५ दिवसांचा शेंगदाणा मेळा देखील भरतो. यातील प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक या मेळ्यामध्ये सहभागी होतात. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची येथे भव्य अशी रथयात्रा काढली जाते आणि विशेष अभिषेक देखील केला जातो. या रुद्राभिषेकामध्ये सहभागी होण्यासाठी वर्षभर आधीपासून नोंदणी होते. ( Kadu Malleshwara Temple )
महाशिवरात्रीच्या या पंधरा दिवस चालणा-या उत्सवात हे कडू मल्लेश्वर मंदिर फुलांनी सजवले जाते. पंधरा दिवस चालणारा हा मंदिरातील फुलमहोत्सवही देखणा असतो. मंदिराची ही सजावट पाहण्यासाठीही हजारो भाविक गर्दी करतात. या सर्व दिवसात येथे मोठ्या भंडा-याचेही आयोजन केले जाते. त्यासाठीही देशभरातील शिवभक्त मंदिरात येतात.
सई बने
