Home » BMC Election : मुंबईत खरंच अटीतटीची लढत की महायुतीसाठी एकतर्फी विजय ?

BMC Election : मुंबईत खरंच अटीतटीची लढत की महायुतीसाठी एकतर्फी विजय ?

by Team Gajawaja
0 comment
Share

१५ जानेवारीला महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि १६ तारखेला त्यांचे निकाल जाहीर होतील. यातील सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती मुंबईची. मुंबईच्या निवडणुकीला आपण ‘बॅटल रॉयल ‘ म्हणू कारण ही निवडणूक भारताच्या ‘आर्थिक राजधानीतील’ आहे आणि ती न्यूयॉर्क व लंडन इतकीच महत्वाची आहे. यामुळेच मुंबईचे निकाल व त्याचे अंदाज यांना प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. अनेक व्यावसायिक विश्लेषक, सेफोलॉजिस्ट कामाला लागले आहेत आणि आपापल्या तर्काप्रमाणे अंदाज व्यक्त करत आहेत. बहुतेक सर्वजण मुंबईत मराठीचा मुद्दा मध्यवर्ती ठरेल या सूत्राभोवती फिरत आहेत आणि ठाकरे जिंकणार की फडणवीस यावर काथ्याकुट करत आहेत. या सर्व काथ्याकुटात दोन महत्वाच्या मुद्द्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे असे वाटते आणि ते म्हणजे ‘विकास’ हा मुद्दा आणि युती/आघाडी यांच्यातील ‘वोट ट्रान्सफरबीलिटी’ची शक्ती.

भाजप सेना युती ज्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवत आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सर्व प्रचार ‘विकास ‘ या एकाच मुद्द्यावर केंद्रित केला होता. त्यांनी मुंबई बरोबरच इतरही शहरातील भविष्यातील विकासाचा ‘रोडमॅप ‘ मतदारांपुढे ठेवला आहे. आम्ही आत्तापर्यंत काय केले व पुढे काय करणार आहोत याचा आराखडा सादर केला आहे. ही स्पष्टता या निवडणुकीत ‘कळीचा ‘ मुद्दा ठरेल असे मला वाटते. मुंबईपुरते बोलायचे झाल्यास राज ठाकरेंना एक चांगली संधी होती. ते गेले १० वर्षमहाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आपल्याकडे तयार आहे असा साततत्याने दावा करत होते. ती ब्लू प्रिंट सादर करण्याची चांगली संधी त्यांना होती पण त्यांनी ती संधी गमावली. त्याऐवजी त्यांनी १९६०-७० च्या दशकापासून वापरून गुळगुळीत झालेला ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या मुद्द्याची टेप वाजवली. ६०-७० वर्षांपूर्वीचा मुद्दा आता किती परिणामकारक ठरणार? जर तसे खरंच असते तर मुंबई आत्तापर्यंत केव्हाच महाराष्ट्रापासून वेगळी झाली असती पण तसे काही झाले नाही हे मतदारांना जाणवते. ‘मराठी अस्मिता’ हा भावनिक मुद्दा सुद्धा ‘नव मतदारांना’ भुरळ घालेल असे वाटत नाही.

हे देखील वाचा 

Election : प्रत्येक मतदाराला द्यावी लागणार चार मतं; जाणून घ्या संपूर्ण मतदानाची प्रक्रिया

राज ठाकरे यांनी अदानी यांच्या भारतातील वाढत्या प्रोजेक्ट्सचा पाढा वाचला. उद्धव ठाकरे शिंदे फडणवीसना लक्ष्य करत बसले. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर एकदाही उत्तर दिल्याचे वाचनात आले नाही. तसेच २५ वर्षात आपण काय केले व पुढे काय करणार आहोत यावर त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. अदानी यांचा नागरिकांना अपेक्षित असलेल्या नागरी सुविधाशी काय संबंध? आता दुसऱ्या मुद्द्यावर’वोट ट्रान्सफरबीलिटी’वर बोलू. प्रथम दोन महिन्यापूर्वी झालेल्या’बिहार’ निवडणुकीवर थोडी नजर टाकूया. बिहारमध्ये भाजप-जदयू अशी युती होती तर राजद व काँग्रेस अशी विरोधी आघाडी होती. भाजप व जदयू हे तुल्यबल पक्ष होते व दोघांची मते परस्परांना’मोठया प्रमाणात ट्रान्सफर झाली त्यामुळे दोघेही ‘इनक्रेमेंटल’ मतांच्या जोरावर जिंकून आले.याच्या विरुद्ध राजद व काँग्रेस यांची मते एकमेकांना ट्रान्सफर झाली नाहीत. राजदला गेल्या वेळपेक्षा १% मते अधिक मिळाली पण काँग्रेसची मते त्यांना ट्रान्सफर झाली नाहीत कारण काँग्रेसचा स्वतःचा असा वोट बेस अत्यंत कमी होता.

हे देखील वाचा 

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र, भाजपा-शिंदेसेनेसाठी धोक्याची घंटा ?

अशीच काहीशी परिस्थिती मुंबईत आहे. भाजप व शिंदे सेना यांचा वोट बेस तुलनेने अधिक आहे. त्यांची मते एकमेकांना मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफर होतील. उबाठा व मनसे यांच्या आघाडीत उबाठाच्या मानाने मनसेचा वोट बेस अगदीच नगण्य आहे त्यामुळे मनसेकडून उबाठाला फारशी रसद मिळणार नाही. त्यातच दोन्ही पक्षात जागा वाटपावरून / उमेदवारीवरून प्रचंड नाराजी उफाळून आली. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसून ही ‘नाराज मते’ शिंदे सेनेकडे वळणार आहेत हे नक्की. यातच उबाठाचे मागील निवडणुकीत निवडून आलेले ५९ नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत. त्या नगरसेवकांचा प्रभाव त्यांच्या मतदासंघात असणार आहे त्याचा फायदा शिंदे सेनेला होईल. मुंबईत ‘शिंदे’ ब्रँड नव्याने तयार झाला आहे. शिंदे सत्तेत आहेत, त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे त्यामुळे मराठी मतदार मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्याकडे वळेल. लाडक्या ‘बहिणी ‘ हा लाभार्थ्यांचा नवा वर्ग तयार झाला आहे. भाजपचे अमराठी मतदार हे मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान करतीलच पण ते शिंद्याच्या झोळीत सुद्धा भरभरून मते टाकतील. शिंदे हे मुंबईतून ठाकरे ‘ब्रँड’ उध्वस्त करण्याच्या इर्षेने उतरले आहेत. ‘ठाकरे’ म्हणजेच मराठी माणूस नाही हे शिंद्याना सिद्ध करायचे आहे.

devendra-fadnavis-and-raj-thackeray

हे सर्व मुद्दे बहुतेक विश्लेषक दुर्लक्षित करत आहेत. एकूणच’वोट ट्रान्सफरबीलिटी’ मध्ये भाजप-शिवसेना महायुती वरचढ दिसत आहे. थोडक्यात’विकास’ आणि ‘वोट ट्रान्सफरबीलिटी’ हे दोन मुद्दे मुंबई महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरतील असे वाटते.

लेखक – रघुनंदन भागवत


Share

Related Articles