लहानपणी “अरब आणि उंट ‘यांची गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचे सार असे होते की अरबाने उंटाला आपल्या तंबूत घेतले त्यामुळे उंटाने पूर्ण तंबू व्यापून टाकला आणि अरब ‘बेघर ‘ झाला. याच अर्थाची दुसरी एक मराठीतील ‘म्हण’ आठवते. ‘भटाला दिली ओसरी, भट हळूहळू पाय पसरी’. त्याहून गहन अर्थाचे एक ‘बोधवचन ‘ आहे. एकवेळ जेवणाचे ताट दुसऱ्याला द्यावे पण बसण्याचा पाट कधी दुसऱ्याला देऊ नये. वरील सर्व ‘बोधामृताची ‘ आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्यानिमित्ताने उडालेला राजकारणातील पक्षांतराचा धुराळा. या धुराळ्यात सर्वच पक्षातील जे ‘निष्ठावंत ‘ आहेत त्यांना वरील ‘बोधामृताची ‘ वारंवार आठवण येत असेल कारण जी अवस्था अरबाची झाली तशी वेळ आपल्यावर येऊ शकते या भीतीने त्यांचा उद्रेक झालेला आपण पहात आहोत. गंमत म्हणजे हेच निष्ठावंत ‘जास्तीत जास्त पक्षांतरे करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच आपला ‘अरब ‘ होऊ नये म्हणून हे सर्व जण ‘उंटाच्या ‘ भूमिकेत शिरत आहेत. हा सर्व प्रकार पाहून समाजातील विचारवंत/ बुद्धिवादी सुशिक्षित लोक नाके मुरडत आहेत आणि जणू हे सर्व आत्ता पहिल्यांदाच घडत आहे असा समज निर्माण केला जात आहे. असा समज वाढीला लावण्यात माध्यमेही आघाडीवर आहेत. पण वस्तुस्थिती तशी नाही.
हे देखील वाचा
Rane Family : राजकारणात जवळपास संपुष्टात आलेलं राणे कुटुंब आता ब्रँड झालंय
‘वारा येईल तशी पाठ फिरवणे ‘ ही राजकारणातील यशाची गुरुकिल्ली आहे हे अनेक जुन्या जाणत्या नेत्यांनी आपल्या आचरणाने सिद्ध करून दाखवले आहे. १९६७ पर्यंत काँग्रेस हा एकमेव राष्ट्राव्यापी पक्ष होता आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉग्रेसचीच सत्ता होती. आज जशी महाराष्ट्रात विरोधी पक्षांची अवस्था झाली आहे तशीच विरोधकांची अवस्था त्या काळी देश पातळीवर होती. विरोधी पक्ष संख्येनेही कमी होते आणि त्यांचा जनाधार मर्यादित होता. आपण कधी काळी सत्ताधारी होऊ शकतो ही कल्पना त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नसे. पण १९६७ मध्ये हे चित्र बदलायला हळूहळू सुरुवात झाली. १९६७च्या निवडणुकीत काँग्रेसचा उत्तरेकडील काही राज्यात पराभव झाला आणि विरोधकांची सरकारे ‘संयुक्त विधायक दल ‘ या बॅनरखाली अस्तित्वात आली. ही सरकारे फार काळ टिकली नाहीत आणि काँग्रेसच परत सत्तेवर आली पण त्यायोगे विरोधकांना सत्तेची चव चाखायला मिळाली आणि सत्तेचे फायदे त्यांच्या लक्षात आले. याच काळात पक्षांतराच्या रोगाची लागण भारताच्या राजकारणाला झाली तीच आजतागायत कायम आहे.

त्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे म्हणजे जिना न चढता लिफ्टने सत्तेचा सोपान हस्तगत करण्यासारखे होते. १९७१ नंतर काँग्रेसमध्ये म्हणूनच प्रचंड प्रमाणावर ‘इन कमिंग ‘ झाले. १९७७ मध्ये आणीबाणीविरोधातील लाटेमुळे काँग्रेसचा पराभव होऊन जनता पक्ष सत्तेत आला. त्यावेळी निवडणुकीपूर्वी जन मानसाची अचूक जाण असलेले बाबू जगजीवनराम जनता पक्षात येऊन दाखल झाले. जनता पक्षाची सत्ता गेल्यावर ते परत काँग्रेस मध्ये सामील झाले. नंदिनी सतपथी, हेमवती नंदन बहुगुणा यांनी सुद्धा जगजीवनराम यांचे अनुकरण केले. १९७८ मध्ये देशात जनता पक्षाचे सरकार असताना महाराष्ट्रात शरद पवार यांनी काँग्रेसचे म्हणजे आपल्याच पक्षाचे सरकार पाडून जनता पक्षाशी हात मिळवणी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद पटकावले. हेच शरद पवार १९८६ मध्ये परत काँग्रेस पक्षात’विलीन’ झाले.१९८० मध्ये जनता सरकार कोसळून इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्या तेव्हा ‘भजनलाल’ हे हरियाणामध्ये जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते. ते एका रात्रीत हरियाणातील अक्खा जनता पक्ष घेऊन काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांनी आपली सत्ता टिकवली.
हे देखील वाचा
Thackeray Unite : ठाकरे बंधू एकत्र पण खरी गोची पवार आणि काँग्रेसची?
सध्या महाराष्ट्रात जे घडत आहे ते काहीतरी’अघटित’ नाही हे वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल. पूर्वी माहितीचे स्रोत खूप कमी असल्यामुळे वरील घटनांचा फारसा बभ्रा झाला नाही. सध्याच्या काळात ‘मोबाईल मुळे ‘दुनिया मेरी मुट्ठीमें अशी स्थिती असल्याने कुठलीही बातमी लपून राहात नाही आणि समाज माध्यमाद्वारे ती वणव्यासारखी पसरते हाच काय तो फरक आहे. आज देशात काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे आणि गल्लीपासून दिल्ली पर्यंत ‘शत प्रतिशत’ भाजप होण्याच्या दृष्टीने त्यांची घोडदौड चालू आहे. अर्थातच त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची अहमहमिका लागली आहे. क्लास बेस्ड पार्टी असलेल्या जनसंघाचे ‘मास बेस्ड ‘ भाजप मध्ये रूपांतर झाल्यावरच जनसंघाच्या मूळ विचारधारेचा (ideology) प्रचंड प्रमाणात विस्तार झाला हे नाकारून चालणार नाही.भाजपचे निष्ठावंत ‘कॅडर ‘ हे फौंडेशन आहे तर भाजपमध्ये नंतर सामील झालेले लोक त्याचा कळस बनू पाहतात हे खरे तर भाजप मधील निध्ठावंतांचे दुखणे आहे. पण त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की नुसत्या ‘कट्टर विचारधारेच्या आधारावर पक्ष विस्तारत नाही आणि सत्ता मिळत नाही. मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्ष बघा. या पक्षात अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत जे त्यांच्या विचारधारेवर ठाम आहेत, भले ती विचारसरणी कालबाह्य झालेली असली तरी हा पक्ष पक्षांतराच्या रोगापासून पूर्णपणे मुक्त वाटतो पण या पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. त्या पक्षाची वाढच खुंटली आहे.आज कोणीही उठून मार्क्सवादी पक्षात प्रवेश करत नाही.

भाजपच्या निष्ठावंताना प्रमोद महाजन यांच्या काही विधानांची आठवण करून द्यावीशी वाटते. महाजन एकदा म्हणाले होते की गाय भाकड आहे पण पतिव्रता आहे म्हणून कोणी तिला पाळत नाही. गाय दुभती असेल तरच पाळली जाते. एका संघ परिवारातील व्यक्तीने एकदा बोलता बोलता सांगितले की त्यांनी महाजनांना विचारले होते की तुम्ही दुसऱ्या पक्षातील लोकांना आमच्या डोक्यावर आणून का बसवता. त्यांनी उत्तर दिले की एखाद्या कंपनीमध्ये दुसऱ्या कंपनीमधून माणसे आयात केली जातात ती त्यांच्या अनुभवाचा, कौशल्याचा फायदा मिळवण्यासाठी. तसेच पक्षाचे पण धोरण असते. फडणवीस एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होते की आमच्या निष्ठावानाना काही मतदारसंघात लोक मतं देत नाहीत, पण आरोपांनी कलंकित लोकांना मात्र निवडून देतात. शेवटी लोकशाहीत नंबर गेम महत्वाचा असल्याने आम्हाला निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार करावाच लागतो.
हे देखील वाचा
भाजपमधील निष्ठावंतांनी क्षणिक यशाच्या मागे न लागता दुरगामी विचार करून भाजपची साथ अजिबात सोडू नये आणि कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात प्रवेश करू नये.भाजप हा पुढील किमान २५ वर्षें तरी देशाचा गाडा हाकू शकेल तेव्हा या सर्व निष्ठावंताना आज ना उद्या भाजपमध्ये संधी नक्कीच मिळेल. भाजपने सुद्धा पक्षात नव्याने प्रवेश देताना अधिक काटेकोर व ‘सिलेक्टिव्ह ‘ राहिले पाहिजे. येईल त्या प्रत्येकाला प्रवेश दिला तर कॅडरचे मनोबल खचते व ते निष्क्रिय होऊ शकते. ही नवीन मंडळी ‘संधीसाधू’ असतात व स्वार्थासाठी निष्ठा बदलण्यात आघाडीवर असतात. महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने भाजपला हा अनुभव येत आहेच.अर्थात भाजपचे’ विचारी’ नेतृत्व यावर उपाय योजना करत असेलच. शेवटी एकच खरे की ‘चलती का नाम गाडी’ असते. पूर्वी काँग्रेस चलती गाडी होती आता भाजप आहे.प्रत्येक जणाला आपल्या उद्दिष्टा पर्यंत पोहोचण्याची घाई झाली आहे त्यामुळे ‘मोदी’ सुपरफास्ट एक्स्प्रेमध्ये चढण्याची स्पर्धा लागली आहे.
लेखक – रघुनंदन भागवत
