कुंभभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे आता मिनी कुंभमेळा सुरु झाला असून रोज लाखो भाविक पवित्र संगमस्थळावर स्नान करण्यासाठी येत आहेत. प्रयागराजमध्ये जगप्रसिद्ध माघ मेळा सुरू झाला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर हा मेळा पुढील दीड महिना होणार असून यामध्ये देशातीलच नव्हे तर परदेशातील भाविकही दाखल झाले आहेत. सोबतच या माघमेळ्यात महिनाभर होणारा कल्पवास महत्त्वाचा मानला जातो. महिनाभर होणा-या या कल्पवासासाठीही देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. या काळात हे भाविक अत्यंत कडक धार्मिक नियम पाळून पूजा आणि होम हवन करत उपवास पाळणार आहेत.
प्रयागराजमध्ये गेल्यावर्षी झालेला महाकुंभमेळा हा अभूतपूर्व यशस्वी ठरला. त्यानिमित्तानं या संगमतीरावर अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. आता त्याच सुविधांमध्ये आणखी भर टाकत स्थानिक प्रशासनानं माघमेळ्यासाठी येणा-या भाविकांची उत्तम व्यवस्था केली आहे, सोबतच त्यांना राहण्यासाठी तंबूही उभारले आहेत. या सर्वांमुळेच दरवर्षी होणा-या माघमेळ्यापेक्षाही यावर्षी चौपटी भाविक प्रयागराजला येत आहेत. ( Magh Mela 2026 Prayagraj )

Magh Mela 2026 Prayagraj
प्रयागराजमध्ये दरवर्षी माघमेळा आणि कल्पवास यासाठी हजारो भाविक जमतात, यावर्षी या भाविकांची संख्या लाखावर गेली आहे. यावर्षी माघ मेळा ३ जानेवारी २०२६ रोजी सुरु झाला, या पहिल्याच दिवशी दहा लाख भाविकांनी पवित्र संगमस्नान केल्याची माहिती आहे. यामध्ये हजारो कल्पवास करत असलेल्या भाविकांचा समावेश आहे. हे कल्पवासी त्रिवेणी संगमात दिवसातून तीन वेळा स्नान करतात, जप, ध्यान आणि दान करतात. यातील अनेक भाविक १२ वर्षे कल्पवास करण्याचे व्रत करत आहेत.
कल्पवास हा एक महिनाभराचा काळ असतो, त्यात कल्पवासी वेदांचा अभ्यास करतात, ध्यान करतात आणि तपश्चर्या करतात. या काळात ते कठोर नियमांचे देखील पालन करतात. मनुष्य शरीराला शुद्ध करण्यासाठी आणि मोक्ष मिळविण्यासाठी या कल्पवास व्रताचे महत्त्व धार्मिक ग्रंथात सांगण्यात आले आहे. पौष पौर्णिमेपासून ते माघ पौर्णिमेपर्यंत हा कल्पवासाचा कालावधी असतो. मात्र काही कल्पवासी अल्पदिवसांचेही व्रत करतात. त्या सर्वांच्या निवासाची सुविधा संगमतीरावर करण्यात आलेली आहे. ( Magh Mela 2026 Prayagraj )
प्रयागराजमध्ये हा माघमेळा भरतो, तेव्हा थंडीचा प्रचंड कडाका असतो. अशात कल्पवास करणा-या भाविकांची खरी परीक्षा होते. या कल्पवासातील भाविकांना जमिनीवर पसरलेल्या गवताच्या गादीवर झोपावे लागते. रोज सकाळी आणि संध्याकाळी त्रिवेणीत तीनवेळा स्नान करावे लागते. दिवसातून फक्त एकाचवेळी स्वतः तयार केलेले, सात्विक जेवण जेवावे लागते. या सर्वात शक्यतो मौनव्रत घ्यावे लागते.
कल्पवासाच्या शेवटी, कल्पवासी त्यांचे अंथरुण, कपडे, धान्य आणि पैसे दान करतात. हे कल्पवासी मौनी अमावस्येचा कडक उपवास पाळतात आणि दिवसभर मौन रहातात, यातून आत्म्याचे शुद्धीकरण होत असल्याचे सांगण्यात येते. याच कल्पवासींसाठी आता प्रयागराजमध्ये मोठ्याप्रमाणात तंबू उभाऱण्यात आले आहेत. शिवाय मान्यवर कथाकारही येथे आले असून रोज रामायण, भागवत यावर कथा होत आहेत. ( Magh Mela 2026 Prayagraj )
=======
हे देखील वाचा : Kumbh Mela : चला, नाशिक कुंभमेळ्यासाठी तयारी सुरु !
=======
या सर्वांच्या सुविधेसाठी या संगमतीरावर महाकुंभमेळ्यासाठी जसे तात्पुरते शहर बांधले आहे, तसेच शहर उभारण्यात आले आहे. यात अंतर्गत रस्ते, प्रकाशयोजना, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पोलिस चौक्या, वैद्यकीय छावण्या आणि मदत केंद्र सज्ज करण्यात आले आहेत. शिवाय जे कल्पवासी येथे महिनाभर राहणार आहेत, त्यांना विशिष्ट असे ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना माघमेळ्यातील प्रमुख स्नानाच्या दिवशीही मदत होणार आहे.
या माघमेळ्यामध्ये सर्वाधिक भाविक १८ जानेवारीला येणार आहेत. तेव्हा मौनी अमावस्या असून हा या मेळ्यातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो. तसेच २३ जानेवारी रोजी वसंत पंचमीलाही स्नानासाठी भाविक मोठ्या संख्येनं येणार आहेत. १ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा असून या दिवशी कल्पवास समाप्ती होणार असल्यामुळे कल्पवासामध्ये असलेले भाविक भल्यापहाटे स्नान करण्यासाठी गर्दी करतात. सोबतच १५ फेब्रुवारी रोजी येणा-या महाशिवरात्रीलाही येथे मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याची माहिती आहे. सध्या या माघमेळ्यात रोज संध्याकाळी गंगा आरती होत आहे. शिवाय अनेक आश्रमांच्या छावण्या उभारण्यात आल्या असून यात भाविकांना मोफत अन्न मिळत आहे. ( Magh Mela 2026 Prayagraj )
सई बने
