इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या सध्या खुश आहेत. कारण त्यांचे निवासस्थान असलेलं इटलीतील एक छोटं गाव सर्वात जास्चत र्चेत आले आहे. त्याला कारण आहे, नवजात लारा. या लारामुळे जॉर्जिया मेलोनी यांच्या गावात तब्बल ३० वर्षानंतर आनंदाचे वातावरण पसरले आहे. कारण गेल्या ३० वर्षापासून या गावात एकही लहान मूल जन्माला आलेले नव्हते. तीस वर्षानंतर या गावात लाराचा जन्म झाला असून तिला बघण्यासाठी मेलोनीच्या गावातीलच नागरिक नाही तर आसपासच्या गावातील नागरिकही आनंदाने येत असून तिच्या जन्माचा उत्सव साजरा होत आहे. या आनंदाच्या मागे इटलीमधील भयाण वास्तवही आहे. इटलीमध्ये गेल्याकाही वर्षापासून लोकसंख्येच दर कमी होत आहे. त्यातही ग्रामीण भागातील लोक शहरांकडे जात आहेत. त्यामुळे इटलीतील बहुतांश गावे ओसाड झाली आहेत. तसेच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे गाव आहे. इटलीच्या अब्रुझो प्रदेशात असलेल्या या गावाचे नाव पग्लियारा देई मार्सी आहे. डोंगराच्या कपारीत वसलेल्या या गावाची लोकसंख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. परिस्थिती अशी की, येथे माणसांपेक्षा मांजरींची संख्याच अधिक आहे. या गावात आता लारा नावाच्या नव्या परिचा जन्म झाला आहे. लाराचा जन्म हा येथील लोकसंख्या वाढीसाठी शुभशकून असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

इटलीच्या अब्रुझो प्रदेशातील पग्लियारा देई मार्सी गावामध्ये ३० वर्षांनंतर एका बाळाचा जन्म झाला. या गावात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यावर अवघ्या मार्सी गावात आनंदोत्सव साजरा झाला. मार्च २०२५ मध्ये या बाळाचा जन्म झाला, आता या बाळाचे नाव ठेवण्यात आले. बाळाचे नाव लारा बुसी ट्राबुको असे ठेवले असून तिच्या नामकरण सोहळ्यासाठी फक्त मार्सी गावातीलच नव्हे, तर आसपासच्या गावातील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लाराच्या जन्मामुळे बऱ्याच वर्षापासून शांत असलेल्या या गावामध्ये चहलपहल वाढली आहे.आधी या गावातील बहुतांश तरुण, काम आणि चांगल्या जीवनाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहेत. येथील शाळा बंद पडल्या होत्या आणि गावाची लोकसंख्या अवघी २० वर आली आहे. या गावातील बहुतेक घरे बंद असल्यामुळे गाव ओसाड भासत होते. मात्र लाराच्या जन्मानंतर चमत्कार झाला. या छोट्या बाळाला बघण्याचे निमित्त साधून अनेक कुटुंब परत आली आहेत. त्यापैकी काहींनी गावात पुन्हा रहाण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच लाराचा जन्म हा तिच्या पालकांसाठी, चिन्झिया ट्रॅबुको आणि पाओलो बुस्सीसाठी अधिक आनंदाचा ठरत आहे.
हे देखील वाचा
इटलीमध्ये आता जॉर्जियाराज मेलोनी आणि हुकुमशहा बेनितो मुसोलिनी यांच्या नावाची चर्चा
आता लारा नऊ महिन्याची झाली असून तिच्याबरोबर खेळण्यासाठी रोज सकाळी अवघं गाव तिच्या घरी गोळा झालेलं असतं. हे दृष्य बघण्यासाठी आसपासच्या गावातील लोकही येथे येत आहेत. त्यामुळेच अवघी नऊ महिन्यांची लारा एक स्टार झाली आहे. लाराच्या निमित्तानं या गावातील साधन सामुग्रीचा कायापालट सुरु झाला आहे. येथील चर्चमध्ये लाराचे नामकरण होणार होते, त्यामुळे या चर्चचीही रंगरंगोटी करण्यात आली. तसेच लाराला खेळण्यासाठी येथे बगिचाही तयार करण्यात येत आहे. लाराच्या जन्माच्या निमित्तानं इटलीमध्ये भविष्यात येणा-या संकटावरही चर्चा सुरु झाली आहे. इटलीमध्ये लोकसंख्या दर कमी होत असून लाराच्या गावासारखी अनेक गावं ओसाड होऊ लागली आहेत.आता येथील सरकारनं ग्रामिण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. इटलीचा जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर जात आहे. महागाई, अनिश्चित नोकऱ्या आणि चांगल्या भविष्याबद्दलच्या चिंतांमुळे अनेक जोडपी मुले होऊ देणे टाळत आहेत.
हे देखील वाचा
४० लाख वर्ष पृथ्वीवर राहणाऱ्या प्राण्याला माणसाने ५० वर्षात संपवलं !
आता या जोडप्यांना सरकारतर्फे मदत देण्यात येत आहे. दरमहा १,००० युरो आणि ३७० युरोची मदत या जोडप्यांना देण्यात येत आहे. शिवाय नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी विशेष केंद्र निर्मिण कऱण्याचे कामही सुरु आहे. सोबतच खेड्यांमध्येही रोजगार निर्मिती आणि मुलांना सर्व सुविधा उपलब्ध होतील, अशी केंद्रही उभारण्यात येत आहेत. इटलीमध्ये २०२४ या संपूर्ण वर्षात फक्त ३७०,००० मुले जन्माला आली. २०२५ या वर्षात परिस्थिती आणखी बिकट असून जन्मदर १० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. अशात आता एका गावात जन्म झालेल्या लारा या मुलीला शुभ मानले जात आहे. गावाकडे तरुण आता पुन्हा येऊ लागतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
