मार्च महिना आला की, उन्हाळ्यासोबत चाहूल लागते ती होळीची. “बुरा ना मानो होली हैं…” असं म्हणून जर कोणी तुमच्या चेहऱ्यावर, अंगावर रंग लावत असेल, तर जरा जपून बरं का! कारण त्या रंगामध्ये असू शकतात हानिकारक केमिकल्स, ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आणि केसांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे होळीची मजा घेता आली नाही. परंतु, यावर्षी कोरोनाचं सावट बहुतांशी प्रमाणात कमी झाल्यामुळे सर्वजण होळीची मजा नक्की घेणार. पुन्हा हा रंगांचा उत्सव रंगणार, पुन्हा गुलाल उधळला जाणार, पुन्हा “पाणी वाचवा…” या विषयावरून सोशल मीडियावर धुमाकूळ होणार आणि पुन्हा वरवर सुंदर दिसणारे पण प्रत्यक्षात विषारी केमिकल्स द्रव्यांनी युक्त रंग आपल्या अंगावर बरसणार.

सध्या बाजारात ‘केमिकल फ्री’ नैसर्गिक रंग उपलब्ध असतात. ते महाग असले तरीही तेच वापरण्यावर भर द्यायला हवा. अर्थात आपण काय वापरावे हे आपल्या हातात असले, तरी कोणी काय वापरावे, हे आपल्या हातात नसते. त्यामुळे होळी खेळताना काळजी तर घ्यावीच लागणार.
होळी खेळताना अनेकजण ‘इंडट्रीअल डाय’ या प्रकारातील रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापरतात कारण ते स्वस्त आणि आकर्षक असतात. परंतु, या डाय कलरमध्ये अभ्रक, ॲसिडस्, अल्कली, काचेचे तुकडे इ. हानिकारक घटक मिसळलेले असतात. याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.

दरवर्षी वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या रिपोर्टनुसार, दरवर्षी होळीच्या दिवशी एक हजारहून अधिक लोक डोळ्यांना दुखापत झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती केले जातात.
याशिवाय या रंगांमुळे अंगाला खाज सुटणे, पुरळ उठणे, ॲलर्जी, या समस्यांबरोबरच केस गळणे, केस तुटणे, कोरडे होणे अशा समस्याही उद्भवू शकतात. अर्थात हे सौम्य आणि तात्पुरते परिणाम असतात. परंतु, काहीवेळा या रंगाचे अत्यंत गंभीर परिणाम झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामध्ये विषबाधा, डोळ्यांच्या समस्या, श्वसनाची समस्या आणि कर्करोग यांचा समावेश होतो.
====
हे देखील वाचा: आला उन्हाळा त्वचा सांभाळा – घरच्या घरी बनवा नैसर्गिक फेसपॅक
====
/GettyImages-495237901-5a4b46960d327a00372ec269.jpg)
होळीच्या केमिकल्स युक्त रंगापासून त्वचेचे आणि केसांचे रक्षण कसे कराल?
होळी खेळण्यापूर्वी तुम्ही तुमच्या केसांवर आणि त्वचेवर, नखांवर शुद्ध खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा व्हिटॅमिन ई यापैकी कोणतेही तेल किमान एक तास आधी लावून मगच होळी खेळा. कोरडी त्वचा केमिकल्स सहजतेने शोषून घेते, त्यामुळे तेल हा संरक्षणात्मक उपाय आहे.
या व्यतिरिक्त त्वचेला सनस्क्रीन लावण्याचा सल्लाही त्वचारोगतज्ज्ञ देतात. यासाठी कोणत्याही चांगल्या कंपनीचं जेल-बेस, वॉटरप्रूफ आणि SPF 26 युक्त सनस्क्रीन वापरावं. शक्यतो होळी खेळण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी सनस्क्रीन लोशन लावणं आवश्यक आहे.
होळी खेळायला जाण्यापूर्वी शरीराचा जास्तच जास्त भाग झाकला जाईल असे कपडे वापरत जा. शक्यतो हलके, कॉटनचे आणि फिक्या रंगांच्या कपड्यांचा वापर करा. दोन तासांपेक्षा जास्त वेळ ओल्या कपड्यांमध्ये राहू नका.

====
हे देखील वाचा: कोल्हापूरची खाद्यसंस्कृती -सणासुदीचं सुग्रास कोल्हापूर
====
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरावर जर छोट्या -मोठ्या जखमा असतील, तर त्या उघड्या ठेवू नका. जखमेला वॉटरप्रूफ बँड-एडने झाकणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून रसायने त्वचेमध्ये सहजी मिसळणार नाहीत.
खरंतर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, होळीसारखा सण जो निसर्गाच्या सुंदर रंगछटांचा अविष्कार आहे, पण हा सण आपण मोठ्या प्रमाणात विषारी आणि घातक केमिकल्स असणाऱ्या रंगानी साजरा करतो. त्यामुळे यावर्षीपासून फक्त आणि फक्त नैसर्गिक रंग वापरूनच होळी खेळण्याचा निश्चय करा आणि इतरांनाही समजवा.