Home » Sonam Wangchuk : सोनम वांगचुकांना अटक भारतातही सुरू होईल GEN – Z आंदोलन ?

Sonam Wangchuk : सोनम वांगचुकांना अटक भारतातही सुरू होईल GEN – Z आंदोलन ?

by Team Gajawaja
0 comment
Sonam Wangchuk
Share

सोनम वांगचुक (Sonam Wangchuk), ज्यांना आपण “रिअल लाईफ रांचो” म्हणून ओळखतो, त्यांना लेह पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. का? तर त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई झाली. सोनम वांगचुक गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये एका आंदोलनाचं नेतृत्व करत होते. हे आंदोलन सुरुवातीला शांततेच्या मार्गाने सुरू होतं. पण बुधवारी गोष्टी हाताबाहेर गेल्या आणि हिंसाचार उसळला. सोनम गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत होते. पण उपोषणादरम्यान त्यांचे काही सहकारी बेशुद्ध पडले आणि आंदोलनकर्त्यांची सहनशीलता संपली आणि त्यांनी हिंसाचाराला सुरुवात केली. लेहमधलं भाजपचं कार्यालय जाळलं गेलं. पुढे निदर्शनांदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास पन्नास जण जखमी झाले. आता या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप सोनम यांच्यावर आहे, म्हणून त्यांना अटक झाली.

महत्वाचं म्हणजे हिंसाचारनंतर सोनम यांनी आपलं उपोषणही मागे घेतलं होतं. अटकेबरोबरच केंद्र सरकारने वांगचुक यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख या संस्थेचा FCRA परवाना रद्द केला. FCRA उल्लंघनाच्या आरोपाखालीच ते चालवत असलेल्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज लडाखचीही चौकशी सुरू केली आहे. बेकायदेशीरदृष्ट्या विदेशी फंडिंग घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (Top Stories)

अटकेनंतर वांगचुक यांनी दावा केला आहे की केंद्र सरकार त्यांना किमान दोन वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यासाठी खटला उभारत आहे. पण सोनम वांगचुक तुरुंगात गेल्यावर जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात. थोडक्यात संपूर्ण देशासाठी स्ट्रॅटिजिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या लेह लडाखमध्ये वातावरण अजूनच पेटू शकतं. त्यामुळे हे सोनम वांगचुक नेमकं कोणतं काम करत होतं? त्यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या? आणि कधीकाळी केंद्रातल्या भाजप सरकारचे समर्थक असलेलं सोनम वांगचुक विरोधक कसे बनले ? हे जाणून घेऊ. (Sonam Wangchuk)

सोनम वांगचुक यांची देशाला ओळख झाली ती २००९ च्या ३ इडियट्स पिक्चरमधील रांचो या क्यारेक्टरमळे. या पिक्चरमध्ये दाखवलेलं फुंसुख वांगडू, जो रँचो म्हणून समोर आला होता हे पात्र सोनम वांगचुक यांच्यापासून इन्स्पायर असल्याचं बोललं गेलं. मात्र सिनेमाच्या प्रोड्यूसर्संनी आणि सोनम वांगचुक यांनी याबद्दल कधी स्पष्टपणे काही सांगितलं नाही. (Top Stories)

मात्र सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांचं काम मात्र तसंच होतं. गेल्या तीन दशकांपासून जग सोनम वांगचुक यांना एक शिक्षण सुधारक, हवामान कार्यकर्ता आणि नव नवीन गोष्टींचा शोध लावणारा खटपट्या संशोधक म्हणून ओळखत होतं, मात्र लडाख ते नवी दिल्ली पर्यंत सर्वांचे लाडके झालेले सोनम यांना हळूहळू लडाखच्या गुंतागुंतीच्या राजकारणाच्या जाळ्यात ओढलं गेलं. लडाखच्या नाजूक परिसंस्थेवर हवामान बदलाचा परिणाम अधोरेखित करू इच्छिणाऱ्या हवामान कार्यकर्त्यापासून ते लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा, जमीन, नोकऱ्या आणि सांस्कृतिक ओळखीचं संरक्षण या मागण्यांसाठी राजकीय कार्यकर्ता हा तीन दशकांचा त्यांचा प्रवास शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत तुरुंगवासात संपला.

सोनम यांचं आयुष्य जीवनाचा आढावा घ्यायचा झाल्यास लेहच्या एका दूरच्या गावात १९६६ मध्ये जन्मलेल्या वांगचुक यांच्या बालपणीच्या शिक्षणाच्या अनुभवांनी त्यांच्या दृष्टिकोनाला आकार दिला. मेकॅनिकल इंजिनिअरपासून, त्यांनी स्वतःला शिक्षण सुधारक बनवलं. लडाखमध्ये पुन्हा येऊन त्यांनी पहिली स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखची या एका वेगळ्या आणि नवीन शाळेची स्थापन केली.

वांगचुक यांनी आपला फोकस लडाख आणि तिथल्या लोकांच्या शिक्षणावर केंद्रित केला. १९९४ मध्ये, त्यांनी सरकारी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी ‘ऑपरेशन न्यू होप’ सुरू करण्यास सरकारला मदत केली. या चळवळीमुळे ते लडाख आणि जम्मू आणि काश्मीरमधील प्रशासनाच्या जवळ आले आणि अनेक शैक्षणिक प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून त्यांची नियुक्त होऊ लागली. पुढे २००५ मध्ये त्यांना मानव संसाधन विकास मंत्रालयात प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय प्रशासकीय परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यामुळे त्यांचं केंद्र सरकारसोबतही काम सुरू झालं. (Top Stories)

त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला पर्यावरण रक्षणाकडे त्यातही त्यांनी भरीव काम करण्यास सुरवात केली. हिमनद्या, शेतकरी त्यांच्या संस्थेचे ग्रीन कॅम्पस अशा अनेक सेगमेंटमध्ये त्यांनी काम सुरू केलं. ज्यामुळे मग त्यांना २०१८ मध्ये प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. त्यानंतर लडाखसाठी एक महत्वाची घटना घडली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्राने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. तेव्हा लेहमधील बहुतेक लोकांप्रमाणेच सोनम वांगचुक यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. (Sonam Wangchuk)

सोनम यांनी तर ट्विटरवर पोस्ट टाकली, “धन्यवाद पंतप्रधान, लडाखचे जुने स्वप्न पूर्ण केल्याबद्दल लडाख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. ३० वर्षांपूर्वी ऑगस्ट १९८९ मध्ये लडाखी नेत्यांनी केंद्रशासित प्रदेशाच्या दर्जासाठी आंदोलन सुरू केले होते. या लोकशाही निर्णयासाठी सर्वांचे आभार!” अशी ट्विटर पोस्ट करत त्यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. त्यानंतर पुढे २०२० मध्ये गलवान येथे भारत आणि चीनचे सैनिकी आमने सामने आले होते तेव्हा वांगचुक यांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं. सोबतच त्यांनी दुर्गम परिस्थितीत राहणाऱ्या सैनिकांसाठी सौर तंबूही विकसित केले होते. (Top Stories)

पण हळूहळू गोष्टी बदलल्या सोनम वांगचुक यांची काही विषयांवरील भूमिका त्यांना केंद्र सरकारच्या विरोधात उभी करणार होती. कधीही थेट राजकारणात पाऊल न टाकलेल्या सोनम यांनी २०२३ मध्ये जगातील सर्वात उंच खिंडींपैकी एक असलेल्या खारदुंग ला येथे हवामान उपोषणाची घोषणा केली. कारण ते लडाखच्या नाजूक पर्यावरणावर हवामान बदलाचा परिणाम अधोरेखित करण्यासाठी आणि सहाव्या अनुसूचीअंतर्गत लडाखमधील लोकांना संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यासाठी हे उपोषण होतं.

==============

हे देखील वाचा : Ramayan : तुम्हाला माहिती आहे का? प्रभू श्रीरामांना एक बहीणही होती

==============

चीनशी झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने लेह लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यास सुरवात केली होती. मात्र यामुळे इथल्या निसर्गाची हानी होईल असं म्हणत वांगचुक यांनी या प्रकल्पांनाही विरोध केला. त्यानंतर आंदोलनांची मालिकाच सुरू झाली. याचदरम्यान त्यांनी एक राजकीय विधान देखील केले की लडाख केंद्रशासित प्रदेश बनण्यापेक्षा जम्मू-काश्मीरचा भाग असताना जास्त चांगलं होतं.” त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली होती. (Sonam Wangchuk)

सप्टेंबर २०२४ मध्ये तर त्यांनी लेह ते दिल्ली असा मोर्चा काढला होता आणि त्यानंतर त्यांना दिली बॉर्डरवर अटकही करण्यात आली होती. पुढे त्यांनी मग उपोषणाचा मार्ग स्वीकरला आणि त्यांच्या या उपोषनाला देशभरातून पाठिंबा मिळत होता. लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा आणि लडाखला संविधानिक संरक्षण या दोन मागण्यांवर ते अजूनही आग्रही आहेतच. (Top Stories)

आताही १० सप्टेंबर पासून त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं होते. मात्र जम्मू काश्मीर आणि लडाखचा मुद्दा हा देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेसंवेदनशील असल्याने असं प्रेशरखाली निर्णय घेता येणार नाही असं केंद्राचं म्हणणं होतं. या उपोषणाच्या १५ व्या दिवशी तरुणांचा एक गटाने तोडफोड करून हिंसाचाराला सुरुवात केली, ज्यामुळे पोलिसांच्या गोळीबारात चार निदर्शकांचा मृत्यू झाला. त्यातच नेपाळमधील gen z आंदोलनाच्या घटनेचा उल्लेख करून तरुणांना भडकवल्याचा आरोप सोनम यांच्यावर करण्यात आला. केंद्राने वांगचुक यांच्यावर त्यांच्या “प्रक्षोभक विधानाने” तरुणांना भडकावल्याचा आरोप केला आणि त्यांच्या संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द केला. तीन दिवस चाललेल्या या नाट्याचा अखेर वांगचुक यांच्या अटकेने शेवट झाला.

आता हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्वपूर्ण असलेलं प्रकरण केंद्र सरकार कसं हॅण्डल करतं हे पाहणं महत्वपूर्ण असणार आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.