Home » Aron Ralston : ३६० किलोच्या दगडाखाली हात १२७ तास तो तसा अडकला आणि…

Aron Ralston : ३६० किलोच्या दगडाखाली हात १२७ तास तो तसा अडकला आणि…

by Team Gajawaja
0 comment
Aron Ralston
Share

डोंगरांच्या दगडी भेगांमधोमध १२ फूट खोल खड्ड्यात अडकलेला हा माणूस आपल्या आयुष्याचे शेवटचे काही श्वास मोजतोय. गेल्या अनेक तासांपासून तो अमेरिकेतील कॅनियनलँड्स नॅशनल पार्कमध्ये एकटाच ३६० किलो वजनाच्या दगडाखाली आपला हात अडकवून बसला आहे. तो मदतीसाठी ओरडतोय, पण त्याचा आवाज कोनापर्यंतच पोहचत नाहीये. आता त्याच्याकडे कोणताच मार्ग उरला नाहीये. शेवटी त्याने एका हाताने आपला कॅमेरा उचलला आणि आपले शेवटचे क्षण रेकॉर्ड करायला सुरुवात केली, जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर जगाला कळेल की, त्याच्यासोबत काय झालं. त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण पुढे त्याने जे केलं… त्याच्यावर विश्वास बसणं अवघड आहे. डोंगरांच्या दगडी भेगांमधोमध त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊ. (Aron Ralston)

एरॉन राल्स्टनला लहानपणापासूनच अ‍ॅडव्हेंचरची आवड होती. वयाच्या 12 व्या वर्षापासून स्कीइंग, राफ्टिंग, हायकिंग, सगळं काही त्याने शिकून घेतलं होतं. त्याला ते इतकं आवडायचं की पुढे त्याने 9 to 5 ची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ तो भटकंतीच करायचा. नोकरी सोडल्यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत अनेक धोकादायक हायकिंग ट्रिप्स केल्या. जिथून कोणीही जाऊ शकत नाही अशा अवघड रस्त्यांवरुन त्याला जायला आवडायचं यामुळेच एकदा तो मृत्यूच्या जबड्यातून परत आला होता.

त्याच्या या अशा वेडेपणामुळे मित्र त्याच्यासोबत जाण्यास नकार द्यायचे. यावेळीही असंच काहीसं घडलं. एरॉन आणि त्याच्या काही मित्रांनी हायकिंग ट्रिपचं नियोजन केलं. पण निघण्याच्या काही दिवस आधी, सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केला. एरॉनला एकट्याने या ट्रिपवर जायचं नव्हतं. म्हणून त्याने ठरवलं की या मोकळ्या वेळेत तो दुसरीकडे जाईल. त्याने अमेरिकेच्या युटा प्रांतात जायचं ठरवलं, पण युटामध्ये नेमकं कुठे जायचं हे अजून ठरलं नव्हतं. कारण युटामध्ये त्याच्या अ‍ॅडव्हेंचरसाठी बरंच काही होतं, सहसा जेव्हा एरॉन एकटा कुठे जायचा, तेव्हा त्याच्या रूममेट्सना त्याच्या ठावठिकाण्याची माहिती असायची. पण यावेळी त्याला स्वतःलाच माहिती नव्हतं की तो युटामध्ये कुठे जाणार आहे, म्हणून त्याने आपल्या मित्रांना फक्त इतकंच सांगितलं होतं की तो यूटाला चालला आहे. (Aron Ralston)

पुढे त्याने जायचं ठरवलं यूटातल्याचं कॅनियनलँड्स नॅशनल पार्कमध्ये असणाऱ्या स्लॉट कॅनियनला, स्लॉट कॅनियन म्हणजे उंच खडकाळ डोंगर आणि मैदानांमधून जाणाऱ्या अरुंद आणि खोल दऱ्या. जे बघून असं वाटतं की डोंगराला मोठं मोठ्या भेगा पडल्या आहेत. कॅनियनलँड्स नॅशनल पार्कमध्ये अशा अनेक स्लॉट कॅनियन्स होत्या. कॅनियनलँड्स नॅशनल पार्क हजारो चौरस किलोमीटरवर पसरलेला असल्याने त्याचा ९५% भाग पूर्णपणे निर्जन आणि सुनसान असतो. अशीच एक निर्जन सुमसान जागा होती ब्लू जॉन कॅनियन.

शनिवार, २६ एप्रिल २००३ एरॉन सकाळी ९:०० वाजता कॅनियनलँड्स नॅशनल पार्कमध्ये पोहोचला. त्याने आपला ट्रक ब्लू जॉन कॅनियनपासून सुमारे 24 किलोमीटर दूर एका कच्च्या रस्त्याच्या कडेला पार्क केला आणि तिथून सायकलवर तो पुढे ब्लू जॉन कॅनियनच्या दिशेने निघाला. एरॉनने फक्त एका दिवसासाठीच सामान घेतलं होतं, ज्यात दोन बरिटोज, ४ लिटर पाणी आणि क्लायंबिंग गिअरचं सामान होतं. पुढे त्याने एका बाजूला सायकल लावली आणि तिथून त्याची पायी हायकिंग सुरू झाली आणि दुपारी २:३० पर्यंत तो कॅनियनच्या ७ मैल आत गेला होता. पुढच्या १५ मिनिटांनी त्याने कॅनियनच्या खोलात उतरायला सुरूवात केली. (Aron Ralston)

Aron Ralston

वरून पाहताना ही कॅनियन सुमारे ११ ते १२ फूट खोल दिसत होती. त्यात मोठमोठे दगड अडकले होते. एरॉन खूप काळजीपूर्वक दगडांवर एक एक पाऊल टाकत खाली उतरू लागला. पण एक दगड, ज्याचा आकार बसच्या टायराएवढा होता, तो त्या दगडाला पकडून आणखी खाली जाण्याचा प्रयत्न करणार होता पण त्याने तो दगडाला पकडाला आणि तो दगड हलू लागला, त्याने लगेच कॅनियनच्या आणखी खालच्या भागात उडी मारली. पण पुढच्याच क्षणी तो बसच्या टायराएवढा 360 किलोचा दगड सरकत खाली आला आणि त्याचा उजवा हात त्याखाली चिरडला गेला!

पुढचे काही मिनिटं घाबरलेला एरॉन वेदनेने कळवळून मोठमोठ्याने ओरडत राहिला आणि आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत राहिला. पण थोड्यावेळाने त्याला परिस्थिती समजली त्याने स्वत:ला शांत केलं. बॅगमधून घाईघाईने पाण्याची बाटली काढली आणि १ लिटर पाणी तीन घोटातच पिऊन टाकलं. पण तेव्हाच त्याला जाणीव झाली की तो इथे कितीवेळ अडकून राहिलं, हे त्याला माहिती नाही. म्हणून त्याने उरलेलं पाणी काळजीपूर्वक वापरायचं ठरवलं. एरॉन आपला हात कसा सोडवायचा याचा विचार करू लागला. (Aron Ralston)

एरॉन घाबरला, तो ओरडत होता, दुखण्याने कळवळत होता. त्याने हात बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण तो दगड 1 इंच सुद्धा हलत नव्हता. मग त्याने शांतपणे विचार केला. त्याच्याकडे सेलफोन नव्हता, म्हणजे मदत मागवणं शक्यच नव्हतं. त्याने बॅग उघडली – त्यात होतं एक सीडी प्लेयर, बॅटरी, कॅमेरा, हेडलॅम्प, काही दोर, आणि एक मल्टी-टूल चाकू. त्याच्यासमोर तीन पर्याय होते: 1) चाकूने दगड तोडायचा, 2) दोरखंडाने पुली बनवून दगड उचलायचा, किंवा 3) स्वतःचा हात कापायचा! तिसरा पर्यायाचा त्याला विचारही करायचा नव्हता.

त्याने चाकूने दगड तोडायला सुरुवात केली. काही तास गेले, रात्र झाली, पण दगड तशाचा तसाच होता. मग त्याने दोरखंडाने पुली बनवली, पण एका हाताने इतका जड दगड कसा घेचला जाणार होता. त्याने पूर्ण ताकद लावून सुद्धा काहीही फरक पडला नाही, तोही प्लॅन फसला. दूसरा दिवस उजाडला होता दुपारचे 3 वाजले होते, त्याला अडकून 24 तास झाले होते. सगळे प्रयत्न फसल्यावर त्याने कॅमेरा काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. “हाय, मी एरॉन राल्स्टन. मला ब्लू जॉन कैनियनमध्ये अडकून 24 तास झाले. हा व्हिडिओ जो कोणी बघेल, त्याने कृपा करून माझ्या पालकांपर्यंत पोहोचवावा.” त्याने त्याचा चिरडलेला हात दाखवला आणि गेल्या 24 तासात त्याने केलेले आपले सर्व प्रयत्न सांगितले आणि कुटुंबाला शेवटचा निरोप दिला.

त्यासाठी येणारे पुढचे दिवस आणखी भयंकर होणार होते. तास उलटत होते पण प्रत्येक सेकंद एरॉनला त्याचा शेवटचा वाटत होता. त्याचं पाणी संपलं होतं, पर्याय नसल्यामुळे तो स्वत:चीच लघवी प्यायला लागला. भूक, तहान, आणि दुखण्याने तो थकत चालला होता. तिसऱ्या दिवशी न राहून त्याच्या डोक्यात विचार आला स्वतःचा हात कापायचा! त्याची अवस्था इतकी वेदनादायक होती की मृत्यूपासून वाचण्यासाठी तो आपला हात गमवायलाही तयार होता. हात कापण्याचा विचार करताच त्याच्या मनात पहिला विचार आला तो रक्तस्त्रावाचा. त्याच्या मनात कल्पना होती की तो आपल्या पाण्याच्या पाइपने हात बांधून रक्तप्रवाह कमी करू शकतो. पण खरी अडचण त्याचा चाकू होता, तो इतका बोथट होता की त्याने हाताचं मांस कापलं गेलं असतं पण हाड कापणं अशक्य होतं. (Aron Ralston)

पुढची रात्र अन् सगळा दिवस असा हतबल अवस्थेत निघून गेला. कधी तो अर्धवट बेशुद्धासारखा होऊन काहीतरी काल्पनिक गोष्टी बघत होता, कधी कॅनियनमध्ये अडकलेले तास मोजत होता, कधी त्याला स्वत:चाच राग येत होता की, इथे येताना कोणालाच का सांगितलं नाही. पण सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होत होता जेव्हा त्याचा घसा पुरता कोरडा पडून टोचायला लागायचा. स्वत:ची लघवी पिताना त्याला मळमळायचं, पण शरीरात आता उलटी करायला काहीच शिल्लक नव्हतं.Aron Ralston

१ मे च्या सकाळी ९:०० वाजता एरॉनला कॅनियनमध्ये अडकून १२० तास झाले होते. आतापर्यंत त्याच्या हाताच्या सुटकेची कोणतीही आशा नव्हती आणि कोणतीही मदत येण्याची शक्यता नव्हती. तो दोन तीन दिवसांपासून जोरजोरात ओरडत होता की कोणीतरी त्याचा आवाज ऐकेल. पण या कॅनियनमधून आवाज बाहेर जाणं अशक्य होतं आणि बाहेर गेला तरी हजारो चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या नॅशनल पार्कमध्ये त्याचा आवाज कोण ऐकणार? हरलेल्या एरॉनने आपले डोळे पुन्हा एकदा बंद केले. त्याला झोप लागली झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. त्यात त्याला एक 3 वर्षांचा मुलगा आपल्याकडे येताना दिसला. एरॉनने पुढे सरकत त्याला आपल्या मांडीवर उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दिसलं की त्याचा उजवा हात कापलेला आहे, तोच हात जो आतापर्यंत दगडाखाली दबला होता. हे पाहून एरॉनची झोप उडाली. त्याला वाटलं हे स्वप्न त्याच्यासाठी जणू एक संकेत होता की तो अजूनही जिवंत परत जाऊ शकतो. (Aron Ralston)

हे विचार करताच एरॉनच्या थकलेल्या अशक्त शरीरात अचानक एनर्जि आली, इतके दिवस दगडाखाली राहून त्याचा हात पूर्णपणे सडला होता. कुठलाही विचार न करता त्याने तो हात कापायला सुरुवात केली. मांस चाकूने सहज कापलं जातं होतं. पण हाड कापलं जाणार नव्हतं, तेव्हा त्याला एक आयडिया आली. आतापर्यंत तो फक्त हाड कापण्याचा विचार करत होता. पण तो ते तोडूही शकत होता. त्याचा हात दगडामागे एका विचित्र अवस्थेत वाकलेला होता. त्याने आपल्या अडकलेल्या हाताच्या हाडावर जोर देऊन जमिनीवर बसण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित त्या प्रेशरमुळे हाड तुटू शकतं. गेल्या पाच दिवसांत पहिल्यांदा एरॉनला खरोखर वाटलं की आता काहीतरी होऊ शकतं.

पुढचा एक क्षणही वाया न घालवता त्याने तसं केलं आणि शेवटी हाड तोडलं. मग त्याच चाकूने उरलेला हात कापून स्वतःला मुक्त केलं. पण अजून धोका टळला नव्हता. त्याला कैनियनमधून बाहेर पडायचं होतं, आणि त्याची गाडी 24 किलोमीटर दूर होती. थकलेला आणि अशक्त एरॉन फक्त एका हाताच्या आधाराने कॅनियनच्या भिंती चढत अखेर बाहेर पडला. थोडं पुढे गेल्यावर त्याला सुट्टी साजरी करायला आलेलं एक कुटुंब भेटलं. त्यांनी एरॉनला खाणं आणि पाणी दिलं आणि लगेच मदत बोलावली. हात कापल्यानंतर सुमारे ४ तास आणि कॅनियनमध्ये अडकून १२७ तासांनंतर एरॉन राल्स्टनला हेलिकॉप्टरच्या मदतीने हॉस्पिटलला नेलं गेलं!

=================

हे देखील वाचा : Martin Luther King Jr : मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर हत्याकांडच्या फाइलमध्ये असे काय होते जे 50 वर्षे लपवण्यात आले?

==================

गेल्या 5 दिवसात त्याचं वजन 18 किलो कमी झालं होतं. त्याच्या शरीरात फक्त 25 % रक्त शिल्लक होतं. काही दिवसांनंतर १३ जणांच्या एका टीमने त्या ३६० किलोच्या दगडाला त्याच्या जागेवरून हलवलं आणि एरॉनचा हात बाहेर काढला. (Aron Ralston)

आपल्या २८व्या वाढदिवसाला एका टीव्ही क्रूसह त्या कॅनियनमध्ये पोहोचला आणि आपली संपूर्ण कहाणी सांगितली. पण ही फक्त एक सुरुवात होती. येणाऱ्या वर्षांत एरॉन एक सेलिब्रिटी बनला आणि अनेक शो आणि इव्हेंट्समध्ये सहभागी झाला. त्याचं पुस्तक “बिटवीन रॉक ॲन्ड हार्ड प्लेस” अनेक देशांमध्ये बेस्टसेलिंग ठरलं. २०१० मध्ये त्याच्या या घटनेवर “127 Hours” नावाची फिल्म बनली, ज्याचा हात कापण्याचा सीन पाहून अनेक लोक बेशुद्ध झाले! पण हे खूप पुढचं झालं त्या घटनेच्या 2 वर्षांनंतरच त्याने अमेरिकेतली सर्वात उंच शिखरं सर केली. २००५ मध्येच कोलोराडोमधले सगळे १४,००० फूटपेक्षा उंच शिखरं हिवाळ्यात एकट्यानं चढणारा तो पहिला व्यक्ती ठरला. आज तो मोटिव्हेशनल स्पीकर आहे, तो म्हणतो, “मी माझा हात गमावला, पण माझं आयुष्य परत मिळवलं!” ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा!

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.