Home » UNESCO च्या जागतिक वारसा यादीत हेच १२ किल्ले का निवडले?

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत हेच १२ किल्ले का निवडले?

by Team Gajawaja
0 comment
UNESCO
Share

११ जुलै २०२५ ही तारीख केवळ महाराष्ट्रासाठी, भारतासाठी नाही, तर संपूर्ण जगभरात जिथं जिथं शिवभक्त असतील, त्या प्रत्येक शिवभक्तांच्या काळजावर कोरली गेली. युनेस्को मधले भारताचे परमनन्ट रिप्रेजेंटेटिव विशाल शर्मा, जेव्हा शेवटी जय भवानी, जय शिवाजी म्हणाले, तेव्हा प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून आल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाला. जे १२ किल्ले निवडले गेले, त्या १२ किल्ल्यांपैकी ११ किल्ले तर आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत आणि १२वा किल्ला थेट तामिळनाडूमधला आहे. ते १२ किल्ले कोणते? UNESCO ने जागतिक वारसा यादीत स्वराज्यातील हेच १२ किल्ले का निवडले? आणि त्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होण्याचं महत्त्व काय? हे जाणून घेऊ. (UNESCO)

सह्याद्रीचे गडकिल्ले आता सातासमुद्रापार पोहोचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे १२ किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट झाले ,ते म्हणजे महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी हा किल्ला. या किल्ल्यांचा समावेश होण्याची कारणं म्हणजे त्यांचा इतिहास, संस्कृती आणि त्यांचं महत्त्व. यूनेस्कोचा उद्देश काय असतो की, एकदा का कोणत्या स्थळांचं नाव वर्ल्ड हेरीटेज लिस्टमध्ये आलं की, मग त्या जागांचं अस्तित्व वाचवणं, जेणेकरून ते दुर्लक्ष होऊन किंवा निष्काळजीपणामुळे नष्ट होऊ नये आणि त्यांचं जतन आणि संरक्षण ही जागतिक जबाबदारी असते. याचा फायदा असाही होतो की, पर्यटनाला चालना मिळते, त्याचं ऐतिहासिक महत्त्व जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतं, इतिहासकार आणि अर्किओलॉजिस्ट संशोधन करतात आणि अशी बरीच कारणं समोर येतात.(Trending News)

तर यादीमधला पहिला किल्ला म्हणजे दुर्गदुर्गेश्वर रायगड, १६७४मध्ये याच किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हिंदवी स्वराज्याच्या या राजधानीला प्रत्येक शिवभक्ताच्या मनात एक खास स्थान आहे. महाराजांच्या सानिध्यात राहण्याचं सर्वात जास्त भाग्य याच किल्ल्याला मिळालं.(UNESCO)

पुढचा किल्ला राजगड, मराठ्यांची पहिली राजधानी म्हणून राजगडला विशेष महत्त्व आहे. शिवाजी महाराजांनी इथून स्वराज्याच्या स्वप्नाला आकार दिला. म्हणूनच राजगडाला ‘राजियांचा गड’ असं म्हटलं जातं.

त्यानंतरचा किल्ला म्हणजे प्रतापगड, या बद्दल तर कोणाला माहिती नाही, असं होणारच नाही. १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांंनी प्रतापगडाच्या पायथ्याशीच अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्याचा वध केला. या लढाईमुळेचा प्रतापगड हे शिवरायांच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक मानला गेला.(Top Stories)

पुढचा किल्ला आहे पन्हाळा किल्ला. १६६० मध्ये सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा दिला होता, त्यावेळी महाराज तिथे अडकले होते. बाजीप्रभू देशपांडेंंनी याच किल्ल्याजवळ असणाऱ्या घोडखिंडीत जौहरच्या सैन्याला रोखून धरलं होतं, ज्यामुळे शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुरक्षित जाऊ शकले. हा पन्हाळा किल्ला मराठा साम्राज्याच्या शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे.(UNESCO)

पुढचा किल्ला शिवनेरी किल्ला, हा किल्ला म्हणजे हिंदवी स्वराज्याचे उगमस्थान असं म्हणायला हरकत नाही. कारण १९ फेब्रुवारी १६३० ला महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आजही शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला हा शिवभक्तांसाठी एखाद्या देवस्थानासारखाच आहे.

UNESCO

यानंतरचा किल्ला म्हणजे लोहगड, मराठा इतिहासात आणि महाराष्ट्राच्या संरक्षणात या किल्ल्याचं महत्त्व जास्त आहे. हा किल्ला ‘लोखंडी किल्ला’ म्हणून सुद्धा ओळखला जातो. १९६५ मध्ये जो पुरंदरचा तह झाला होता तेव्हा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता, पण पुढे १३ मे १९७० मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला होता.

त्यानंतरचा किल्ला आहे, साल्हेर किल्ला, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून साल्हेर लोकप्रिय आहे. असं म्हणतात, सूरतेच्या लुटीनंतर हा किल्ला महत्त्वाचा स्पॉट होता आणि सूरत शहरावर छापा टाकून आणलेले धन मराठा राजधानीकडे जाताना आधी साल्हेर किल्ल्यावर ठेवलं जायचं.

यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. शिवरायांनी उभारलेला सिंधुदुर्ग त्यांचे आरमार आणि जलदुर्ग या विषयातील सखोल ज्ञान दाखवतो. सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे मराठा साम्राज्याला नौदल मजबूत करायला आणि वाढवायला मदत झाली. समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असलेला हा किल्ला मराठा नौदलाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. याची मजबूत रचना आणि सागरी संरक्षणाची अनोखी पद्धत यामुळे युनेस्कोने या किल्ल्याला मान्यता दिली.(UNESCO)

पुढचा किल्ला हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचा सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे विजयदुर्ग किल्ला. टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५०मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन ‘विजापूरकरांचा अभेद्य किल्ला’ असं करून ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ च्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला होता.

त्यानंतरचा किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला. समुद्रात उभारलेला हा जलदुर्ग मराठा आरमाराचं महत्त्वाचं केंद्र होता. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे प्रमुख झाल्यावर, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग येथे आरमाराच्या छावण्या उभारल्या गेल्या, ज्यामुळे मराठा आरमाराची ताकद वाढली.(Top Stories)

त्यानंतरचा महाराष्ट्राचा अकरावा किल्ला म्हणजे खांदेरी किल्ला, खांदेरी किल्ला मुंबई शहराच्या संरक्षणासाठी महत्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली, ज्यामुळे हिंदवी स्वराज्यावर समुद्रातून होणाऱ्या ब्रिटिश आणि इतर परकियांच्या आक्रमणांना रोखण्यात मराठा आरमाराला यश आलं. इंग्रज आणि सिद्दी यांच्या विरोधात मराठा आरमाराने या किल्ल्याचा उपयोग केला. इंग्रजांना समुद्रात आपली सत्ता वाढवण्यासाठी खांदेरीचा अडसर वाटत होता, म्हणून त्यांनी अनेकवेळा या किल्ल्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला.(UNESCO)

आता १२वा किल्ला जो युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज लिस्टमध्ये सामील करून घेतला. तो म्हणजे तामिळनाडूमधला महाराजांचा जिंजी किल्ला. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान हा किल्ला जिंकला आणि मराठा साम्राज्याचा विस्तार दक्षिणेकडे करायला मदत केली. त्यामुळे जिंजी किल्ला हा हिंदवी स्वराज्याच्या दक्षिणेतील विस्ताराचे प्रमुख प्रतीक आहे. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर रायगड पडला आणि छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी गाठली, तेव्हा हिंदवी स्वराज्याचा कारभार याच जिंजी किल्ल्यावरून चालवला जात होता. त्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या या तिसऱ्या राजधानीला इतिहासात विशेष स्थान आहे.

==================

हे देखील वाचा : Jimmy Zhong : त्याने 29 हजार कोटी चोरले पण एक कॉल आणि…

==================

तर असे होते हे १२ किल्ले… केंद्र सरकार, राज्य सरकार, इतिहास संशोधक आणि शिवभक्तांच्या प्रयत्नांमुळे या किल्ल्याच्या प्रेझेंटेशन मध्ये यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ Outstanding Universal Valueच्या निकषांची पूर्तता झाली. (UNESCO)

शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हा मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील इतर कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. यासोबतच किल्ल्यांची रचना, संरक्षणासाठी खास डिझाईन केलेल्या रचना यामुळे युनेस्कोने या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला. युनेस्कोच्या या मान्यतेमुळे शिवरायांचे हे १२ किल्ले आता जागतिक स्तरावर सन्मानित करण्यात आले आहेत. यामुळे या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न जागतिक स्तरावर होतील आणि यामुळे पुढच्या पिढ्यांना हा अभिमानास्पद वारसा अनुभवता येईल. या ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली घटनेसाठी समस्त शिवप्रेमींचे हार्दिक अभिनंदन !

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.