Home » Jaipur : ऐन श्रावणात बंद रहाणारे महादेवाचे मंदिर !

Jaipur : ऐन श्रावणात बंद रहाणारे महादेवाचे मंदिर !

by Team Gajawaja
0 comment
Jaipur
Share

देशभरात आता श्रावण महिन्याची तयारी सुरु झाली आहे. कावड यात्राही सुरु होत आहे. यानिमित्तानं देशभरातील भगवान शंकराच्या मंदिरांना सजवण्यात येत आहे. या मंदिरात श्रावण महिन्यातील सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येणार आहेत, त्यामुळे मंदिर प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी तयारी करत आहे. असे असतांना देशातील एकमेव मंदिर या श्रावण महिन्यात बंद ठेवण्यात येते. (Jaipur)

या मंदिराप्रती लाखो भाविकांची श्रद्धा जोडलेली आहे. मात्र हजारो वर्षाच्या परंपरेनुसार हे मंदिर वर्षातून या भाविकांसाठी फक्त एकदाच खुले करण्यात येते. त्याव्यतिरिक्त या मंदिराला बंद ठेवण्यात येते. हे मंदिर राजस्थानमधील जयपूर येथे आहे. राजस्थानच्या राजघराण्याची खाजगी मालमत्ता असलेले हे भगवान एकलिंगेश्वर महादेव मंदिर फक्त महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुले कऱण्यात येते. मात्र गेल्या तीन वर्षापासून महाशिवरात्रीलाही या मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले नाहीत. त्यामुळे भगवान एकलिंगेश्वराचे भाविक नाराज झाले आहेत. जयपूरमधील किल्ल्यात असलेल्या या भगवान एकलिंगेश्वराच्या मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी येथील नागरिक आतूर असतात. महाशिवारात्रीच्या दिवशी पहाटेपासून हा किल्ला चढून हजारो नागरिक या मंदिरात पोहचतात. मात्र गेल्या तीन वर्षापासून भगवान एकलिंगेश्वरांचे दर्शन न झाल्यामुळे भाविक नाराज झाले आहेत. निदान श्रावण महिन्यातील सोमवारी तरी या मंदिराचे दरवाजे खुले करावेत, यासाठी आता हे नागरिक राजघराण्याकडे विनंती करत आहेत. (Social News)

राजस्थानमधील जयपूरमध्ये अनेक किल्ले आणि राजवाडे आहेत. या शिवाय जयपूरमधील राजघराण्यांनी उभारलेली मंदिरही प्रसिद्ध आहेत. या सर्वच मंदिरांपैकी जयपूरच्या मोती डुंगरीच्या टेकडीवर असलेले एकलिंगेश्वर महादेव मंदिर हे त्याच्या अनोख्या परंपरेसाठी ओळखले जाते. जयपूर येथील बिर्ला मंदिरापासून जवळ असलेल्या मोती डुंगरीवरील टेकडीवर असलेले हे एकलिंगेश्वर मंदिर अवघ्या जयपूर शहराचे आद्य दैवत आहे. जयपूरच्या राजघराण्याची खाजगी मालमत्ता असलेल्या या मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त एकदाच सर्व भाविकांसाठी खुले करण्यात येत होते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे सर्वांना भगवान एकलिंगेश्वराचे दर्शन घेण्यात येत होते. मात्र गेल्या तीन वर्षापासून हे दर्शनही बंद कऱण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. देशभरतील शिवमंदिरांमध्ये श्रावण महिन्यानिमित्त तयारी सुरु झाली असतांना एकलिंगेश्वराचे दर्शनही होत नसल्यामुळे जयपूरसह अन्य भागातील भगवान एकसिंगेश्वराचे भक्त नाराजी व्यक्त करीत आहेत. (Jaipur)

जयपूरच्या मोती डुंगरीच्या टेकडीवर असलेल्या या मंदिराबाबत अनेक गुढ कथा सांगितल्या जातात. या मंदिरात जाण्यासाठी एक किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. ही उभी चढाई चढतांना भक्तांची परीक्षा होते. मोती डुंगरीवर हे मंदिर जिथे आहे, तो भाग शिव डुंगरी म्हणून ओळखला जातो. एकलिंगेश्वर मंदिर जिथे आहे, तो भाग संपूर्ण जयपूर शहराच्या उंच आहे. जयपूर शहाराची स्थापना होण्याआधीपासूनच हे मंदिर या ठिकाणी स्थित असल्याची माहिती आहे. या एकलिंगेश्वर मंदिराला शंकरगड मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात भगवान शंकर, भव्य अशा शिवलिंगाच्या रूपात विराजमान आहेत. या मंदिरात काही वर्षापूर्वी माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या कुटुंबाच्या मूर्ती होत्या. पण या मुर्ती अचानक एक दिवस गायब झाल्या. अशाच मुर्ती पुन्हा मंदिरात ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र त्या मुर्तीही गायब झाल्या. (Social News)

=============

हे ही वाचा : Ujjain : उज्जैनमधील या मंदिरात मृत्यू मागायला येतात लोक

=============

तेव्हापासून या मंदिरात फक्त शिवलिंगाची पूजा केली जाते. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही मूर्ती स्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही. जयपूरचे सवाई जयसिंग यांचा धाकटा मुलगा माधो सिंग याने उदयपूर येथील त्यांच्या घरात असलेल्या एकलिंगजी मंदिरापासून प्रेरित होऊन हे मंदिर बांधले. महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक येतात. या दिवशी भगवान एकलिंगेश्वरांची चार तास विशेष पूजा करण्यात येते. यावेळी होत असलेल्या मंत्र उच्चारांमुळे ही संपूर्ण टेकडीच भगवान शंकाराच्या नामात रंगून जाते. मंदिर फक्त वर्षातून एकदाच खुले होत असले तरी या मंदिरात नियमीत पूजा करण्यात येतात. या मंदिराच्या आवारात भगवान गणेश, माता अंबा, कालिका माता यांचीही मंदिरे आहेत. कोविड काळापासून हे मंदिर महाशिवरात्रीलाही भाविकांसाठी उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे या श्रावणातील सोमवारी तरी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी आता होत आहे. (Jaipur)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.