रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने भाजपामध्ये चव्हाण सेंटरचा कसा उदय झाला हे आपण पहिल्या भागात पाहिलं. तो त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय अस्तित्वापासून सुरु झालेला प्रवास होता.
एकदा आमदार झाल्यानंतर त्यांनी हळूहळू आपला पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर प्रभाव टाकायला आणि विस्तार करायला सुरुवात केली. खरंतर नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणून मिळालेल्या खुर्चीच्या शक्तीचा त्यांनी युक्तीने वापर केला. ज्या खुर्चीचा वापर त्या आधीच्या एकूण एक सर्वांनी वैयक्तिक संपदेसाठी केला होता. म्हणूनच त्यांच्यासोबत काम केलेले सर्वच पक्षातील दिग्गज नगरसेवक पालिका ओलांडून विधिमंडळ पायरी चढू शकले नाहीत. चव्हाण यांना ती दूरदृष्टी होतीच म्हणून त्यांनी सत्तेची खुर्ची ब्रॉड उद्देशाने राबवली, न की वैयक्तिक उत्कर्षासाठी. त्यातच पुढचा टप्पा म्हणजे त्यांनी स्वतःला विचारधारेचा वाहक म्हणून पक्षाच्या दावणीला बांधले, ही त्यांची खेळी यशस्वी ठरली. विचारधारा राजकीय पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी किती महत्त्वाची ठरू शकते याचं उदाहरण म्हणजे रविंद्र चव्हाण यांचे घडलेले नेतृत्त्व… आता या भागात डोंबिवलीच्या नगरसेवकपासून ते भाजपा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत ते कसे पोहोचले, हा प्रवास जाणून घेऊ. (Ravindra Chavan)
भाजपाच्या विचार परिवाराने म्हणजे RSS ने पक्षाला तत्त्वज्ञान दिले. RMP सारख्या संस्थेंतून लोकप्रतिनिधीना बुद्धिजीवी बनविण्याचं ठरवलं. विचारांची पक्की मांडणी देण्यासाठी परिश्रम घेतले. भाजपाकडे कार्यकर्ते होते आणि RSS कडे विचार होता. RSS च्या विचारांना फूट सोल्जर म्हणून तळागाळात नेण्याचे काम पूर्णवेळ प्रचारक करतच होते ते भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजूनच जोमाने पसरले. एक डोंबिवलीकर म्हणून संघाची ही कार्यपद्धती फार जवळून पाहायला मिळाल्याने रविंद्र चव्हाण यांना तात्त्विक वैचारिक लाभ झाला. संघाच्या इको सिस्टीमची शिकवणी त्यांना स्वगृही मिळाली. भाजपात अनेक वर्षे काम करून या इको सिस्टीमशी जुजबी ओळखही न होणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना याचे महत्त्व प्रत्यक्षात अनुभवल्याशिवाय कळणार नाही. चव्हाण डोंबिवलीत कार्यरत असल्याने त्यांचे संघाशी हे “कॉन्फिडन्स बिल्डिंग” घडले. ते चव्हाणांसाठी नागपूर ते दिल्ली व्हाया डोंबिवली असा अंत्योदय होण्यासाठी प्रचंडच पूरक ठरले. आजच्या त्यांच्या प्रेसिडेन्सीचे बीज त्या “कॉन्फिडन्स बिल्डिंग” मध्ये होते हे निर्विवाद. (Political News)
संघाच्या विश्वासास पात्र ठरण्याची पूर्वपरीक्षा पास केल्यानंतर भाजपा नेतृत्वाने कोकणातल्या राजकीय प्रयोगांसाठी चव्हाण यांची निवड केली, ते ही चव्हाणांचे पहिले मेन्टॉर विनोद तावडे यांच्या ऐवजी! हे स्थित्यंतर तसे स्मूथ घडले. कारण तावडे एक तपाहून अधिक काळ भाजपासाठी कोकणाचे समन्वयक नेते म्हणून काम करत होते. मात्र तावडे आणि चव्हाण यांच्या कार्यशैलीत जसा फरक असू शकतो तसाच अजून एक फरक म्हणजे तावडे अधिककाळ सत्ताधारी नसताना त्यांच्याकडे कोकणाची जबाबदारी होती आणि तेव्हा नारायण राणे (Narayan Rane) फॉर्मात होते. चव्हाणांच्या बाबतीत असं झालं की चव्हाण सत्तेत असल्यापासून ते कोकणची जबाबदारी पार पाडत आहेत. अर्थात ही तुलना करून चव्हाणांनी केलेल्या श्रमाचे मोल कमी होत नाही.(Ravindra Chavan)
====================
हे देखील वाचा : Ravindra Chavan : रविंद्र चव्हाण यांची अनटोल्ड स्टोरी- – भाग एक
====================
कारण चव्हाण आजच्या मार्केटिंगच्या भाषेत हायपर लोकल संपर्क ठेवणारे आणि रिपोर्टींग घेणारे नेते आहेत. चव्हाण यांची शैली थेट भिडण्याची अशी आहे. ते उंटावरून शेळ्या हाकत नाहीत. जे काय ते थेट मैदानावर जाऊन. पालघर पट्ट्यातल्या ग्रामपंचायतीची निवडणूक असो की सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला नगर परिषदेची तिथे जाऊन परिस्थिती हाताळण्याची त्यांची सवय. आणि निवडणूक नसलेल्या काळात ते सर्वव्यापी मदत करण्यासाठी कायम उपलब्ध असतात. त्यांच्यासाठी कार्यकर्ता महत्त्वाचा घटक आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. त्यामुळेच त्यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग सर्व पक्षात विखुरलेला आहे.(Ravindra Chavan)
या सर्वव्यापी अशा स्वभावाला सर्वोच्च नेतृत्वाने हेरले होते, म्हणूनच महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ राबविण्याच्या मोहिमेवर त्यांची नेमणूक झाली. आणि सुरु झाला २०२२ सालचा महाराष्ट्राच्या इतिहासातला सुरस सत्तांतराचा प्रयोग. सुरत गौहत्ती मुंबई असा हा एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) प्रवास सत्तेचा प्रयोग यशस्वी ठरला त्यात हेड ऑफ ऑपरेशन्सची संयत आणि लॉजिस्टिक भूमिका चव्हाणांनी पार पाडली. त्याचे त्यांना फळ मिळाले PWD मंत्री म्हणून. या भानगडीत त्यांनी शीर्षस्थ नेतृत्वाचा विश्वास संपादन केला, त्यांची संघ भाजपा वर्तुळात कनेक्शन अधिक पॉवरफुल झाली. पक्षात स्थान आणि वजन अजूनच वाढले. पण हे पुढारीपण पक्षात भल्याभल्यांना रुचले नाही. खुद्द शिंदे शिवसेनेला याचा सर्वात धोका वाटायला लागला. भाजपच्या लोकसभेच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीनंतर विधानसभा निवडणुकीत रविंद्र चव्हाणांना निवडणूक यंत्रणा प्रमुखपद दिलं. याचा खुलेआम इम्पॅक्ट जाणवला. भाजपचे उमेदवार साधनसंपन्न झाले, निवडणूक जिंकले. त्याचाच परिणाम त्यांचे आजचे प्रदेशाध्यक्षपद. विधानसभा निवडणूक निकाल आणि अध्यक्षपद यातलं मोठं, वेळ स्तब्ध करणारं… राजकीय कृष्णविवर हा गहन विषय बाजूला ठेवला… कारण डाव अजून बाकी आहे.