बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..
महाराष्ट्र… शब्द ऐकताच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, संतांची भूमी, पुरोगामी विचारधारा, सांस्कृतिक वारसा आणि १०७ हुतात्म्यांचं बलिदान डोळ्यासमोर येतं. याच आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कसं मिळालं ते आज आपण पाहू. (Maharashtra)
१ मे १९६०, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०७ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्रात सामील झाली आणि महाराष्ट्र राज्य अधिकृतपणे (ऑफिशियली) स्थापन झालं. तेव्हापासून आपण त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून हा दिवस महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण आपल्या महाराष्ट्राला किंवा मराठा प्रदेशाला महाराष्ट्र नाव हे या आधीच मिळालंय असे पुरावे इतिहासात सापडतात. अगदी प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, शिव काळ, स्वातंत्र्यपुर्व काळ ते संयुक्त महाराष्ट्र लढा यात ते ऐतिहासिक पुरावे सापडतात.
ऋग्वेदात महाराष्ट्राचा उल्लेख ‘राष्ट्र’ असा केला आहे. प्राचीन काळात तर महाराष्ट्र वेगवेगळ्या नावाने ओळखला जात होता. इ स पूर्व ३०४ ते २३२ सम्राट अशोकांच्या काळात महाराष्ट्र “राष्ट्रिक” या नावाने ओळखला जायचा. त्यानंतर इ स पूर्व २३० ते २०० सातवाहन राजवंश ज्यांची राजधानी ‘प्रतिष्ठान’ म्हणजे आताचं पैठण. या काळात महाराष्ट्र शब्द स्थानिक प्राकृत भाषेत “महाराठ्ठी” या नावाने ओळखला जात होता. याचा अर्थ “राठोडांचा देश” असा होता. ज्यामुळे हा प्रदेश “महान राष्ट्र” म्हणून ओळखला जाऊ लागला. आणखी एक संदर्भ असा सापडतो की, महाराष्ट्र या शब्दाचा प्राकृत भाषेत अर्थ “महारठ्ठ” असा आहे, महाराष्ट्रातील क्षत्रिय महारठ्ठ म्हणजे मराठा या जातीवरून हे नाव आलंय. महाराठ्ठीनी आणि महारठीक असे शब्द प्रयोग जुन्नरच्या नाणेघाटमधील शिलालेखात दिसून येतात.(Maharashtra)
इतिहासात आणखी पुढे आलो की, वाकाटक राजवंश आणि चालुक्य राजवंशांच्या काळात “महाराष्ट्र” हा शब्द प्राकृत आणि संस्कृत ग्रंथांमध्ये वारंवार आढळतो. त्यानंतर राष्ट्रकूटांच्या नावावरूनच “महा-रट्ट” हा शब्द रूढ झाला, असं म्हटलं जातं. आतापर्यंत आपण प्राचीन काळातील काही ऐतिहासिक संदर्भ पाहिले ज्यातून महाराष्ट्र शब्द उदयाला आला असं सांगितलं जातं.
त्या नंतरचा मुख्य काळ म्हणजे मराठा साम्राज्याचा काळ, जिथून “महाराष्ट्र” हे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झालं. इ.स. १६३०-१६८० छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन स्थापन केलं आणि त्यामुळे महाराष्ट्राला स्वतंत्र राजकीय ओळख मिळाली. समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या काही ओळी आहेत, (Maharashtra)
“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे” “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”… यावरून तुम्हाला कळून आलंच असेल की, शिवकाळातही या भूमीला महाराष्ट्र म्हणायचे.
================
हे देखील वाचा : Palakmantri : पालकमंत्री म्हणजे काय? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात?
================
देशाच्या स्वातंत्र्यात याच मराठा भूमी म्हणजेच महाराष्ट्रातूनच सर्वाधिक स्वातंत्र्यसैनिक झाले. स्वातंत्र्यपूर्व काळातच मराठी भाषिकांचं स्वतंत्र महाराष्ट्र नावाचं राज्य व्हावं, ही मागणी जोर धरू लागली होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे अशा घोषणा उठू लागल्या. सेनापती बापट, एस एम जोशी, श्रीपाद डांगे, केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली १९४६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. यानंतर १०७ हुतात्म्यांचं योगदान, आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांमुळे “महाराष्ट्र” हे नाव स्वीकारलं गेलं आणि आता याच महाराष्ट्राचं नाव अभिमानाने घेतलं जातं. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापन झाली. तुम्ही आजही बघा कोणत्याही राज्याला स्वतःचं असं राज्यगीत नाही, पण आपल्या महाराष्ट्राला आहे.
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा !