भारताचा माजी all rounder केदार जाधव नुकताच भाजपा पक्षात आला. तसं त्याचं क्रिकेट करीअर इतकं काही खास राहिलं नाही. त्यामुळे राजकारणात आपलं काही घडतंय का ? यासाठी त्याने राजकारणात प्रवेश केला. तसं भारतात विविध क्षेत्रातले सेलेब्रिटी राजकारणात घुसतात. साउथचं राजकारण तर सिने सेलेब्रिटीनी भरलेलं आहे. मग क्रिकेटर कसे मागे राहणार ? त्यातच केदार जाधवच्या राजकारणात येण्यामुळे क्रिकेट आणि Politics च्या चर्चा सगळीकडेच होत आहेत. पण केदार जाधव हा राजकारणात उतरणारा पहिलाच क्रिकेटर नाहीये. याची एक मोठी लिस्ट आहे. चला तर मग जाणून घेऊ. (Kedar Jadhav)
भारतात तसे बरेच धर्म आहेत. हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौध्द, जैन, सिख, पारसी… यात आणखी एक धर्म आहे तो म्हणजे क्रिकेट… आणि या क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडूलकर… क्रिकेटविश्वात इतकं नाव कमावूनही सचिन एकदा राजकारणात आलाच होता. तसा तो थेट पक्षप्रवेश करून आला नव्हता, तर त्याची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती आणि मग तो झाला खासदार सचिन तेंडूलकर ! क्रिकेट पीचवर त्याने भल्याभल्यांची पळती भुई थोडी केली पण राज्यसभेत काय त्याची batting चालली नाही. तसं आपल्यात कोणत्याही गोष्टीची सुरुवात देवापासून होते. म्हणून सचिनपासून केली. तसं ९० वर्षांपूर्वीही एक क्रिकेटर राजकारणात आला होता आणि तो थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच निवडणुकीत भिडला होता, त्यांचं नाव बाळू पालवणकर… उत्तम स्पिनर… क्रिकेटमध्येही त्याकाळी त्यांनी आपला चांगला जम बसवला होता. ते भारताचे पहिले दलित क्रिकेटर होते.
मात्र क्रीकेटमधून बाजूला झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९३७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बाबासाहेबांविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर भारताचे माजी कॅप्टन नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी राजकारणात चान्स घेतला. त्यांनी विशाल हरियाणा पार्टीकडून गुडगाव मतदारसंघातून दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी राजकारणातूनही रिटायरमेंट घेतली. यानंतर ८० च्या दशकात सुनील गावसकर यांच्यासोबत ओपनिंग करणारे चेतन चौहान हे दोनवेळा लोकसभा खासदार आणि आमदारसुद्धा राहिले आहेत. तर ते उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्रीसुद्धा होते. (Kedar Jadhav)
८० च्या दशकातलं आणखी एक मोठ नाव म्हणजे, कीर्ती आजाद… आजाद हे १९८३ च्या वर्ल्ड कप विनिंग squad मध्ये होते. तसं त्यांचं क्रिकेट करिअर इतकं ग्रेट राहिलं नाही. तसं त्यांचं background च राजकारणाचं… कारण त्यांचे वडील बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. त्यामुळे क्रिकेटमधून स्पिन होऊन ते politics मध्ये गेले, यात नवल वाटायला नको. कीर्ती आजाद सध्या खासदार आहेत आणि त्यांना भाजपा, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तिन्ही पक्षांचा अनुभव आहे. यानंतर नव्वदीमधले तीन खेळाडू राजकारणात उतरले. ते म्हणजे नवज्योत सिंग सिधू, मनोज प्रभाकर आणि मुहम्मद अझरूद्दीन… सिधू क्रिकेटअधून रिटायर झाल्यानंतर काही वर्ष राजकारणासोबत एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्येही होते. सुरुवातीला ते भाजपात होते. २०१६ साली त्यांनी भाजपाला राम राम ठोकला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार, खासदार ते राज्याचे मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
दुसरीकडे मनोज प्रभाकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पण राजकारणात त्यांना काही आपला जम बसवता आला नाही. अझरूद्दीन भारताच्या ग्रेट कॅप्टन्सपैकी एक… पण match फिक्सिंगमुळे त्यांना कायमचं घरी बसावं लागलं. यानंतर त्यांनी २००९ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर एक टर्म ते खासदार राहिले. त्यानंतर क्रिकेट आणि राजकारण दोघांमध्येही ते दिसून आले नाही. २००० च्या काळातही अनेक असे क्रिकेटर झाले, ज्यांना वाटल राजकारणातल मैदान सुद्धा आपण गाजवू, यातले काही यशस्वी झाले, काही नाही झाले. यामधली काही नावं म्हणजे विनोद कांबळी, मुहम्मद कैफ, गौतम गंभीर, हरभजन सिंग, युसुफ पठाण आणि मनोज तिवारी ! (Kedar Jadhav)
विनोद कांबळी… जबरदस्त batsmen पण काही कारणस्तव क्रिकेटमध्येच फसला. सिनेमामध्येही त्याने आपलं नशीब आजमावून पाहिलं, पण तिथेही तो काही प्रकाश पाडू शकला नाही. अखेर त्याने लोक भारती पार्टी जॉईन केली. इलेक्शनही लढला, मात्र त्याचा पराभव झाला. काहीच दिवसांपूर्वी त्याचे आजारी असतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. भारताचा ग्रेट फिल्डर मुहम्मद कैफसुद्धा कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्याचा पराभव झाला. यानंतर पद्मश्री गौतम गंभीर येतात… २००७ची टी-२० वर्ल्ड कप फायनल आणि २०११ च्या क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरच्या वन साईड नॉकमुळेच भारत जिंकला. यानंतर आयपीएलमध्येही तो गाजला. अजूनही तो आयपीएलमध्ये कोचिंग करतोय आणि त्यातच तो इंडियन टीमचाही कोच आहे. २०१९ साली त्याने भाजपा जॉईन केली होती आणि दिल्लीतून लोकसभा इलेक्शनसुद्धा जिंकला. यानंतर तो राजकारणातच जरा थंडच आहे. (Kedar Jadhav)
================
हे देखील वाचा : Shivaji Satam : सीआयडीची ओळख असणाऱ्या ‘एसीपी प्रद्युमन’चा प्रेरणादायी अभिनय प्रवास
================
आपल्या भज्जीनेही म्हणजेच हरभजन सिंगनेही फिरकी घेत राजकारणात एन्ट्री केली. तो सध्या आम आदमी पार्टीकडून राज्यसभेत खासदार आहे. त्यातच साईड बाय साईड क्रिकेट कॉमेंट्री करतच असतो. युसुफ पठाणसुद्धा तृणमूल कॉंग्रेसमध्ये जॉईन झाला. यंदा बंगालमधून लोकसभा इलेक्शन जिंकून तो खासदार झालाय. कॉंग्रेसच्या एका मातब्बर माणसाला म्हणजेच अधीर रंजन चौधरीला त्याने पराभूत केलं होतं. त्यातच क्रिकेटर मनोज तिवारीनेही ममता दीदींची पार्टी जॉईन केली आणि आमदार झाला, यासोबतच तो बंगालचा क्रीडामंत्रीसुद्धा आहे. यामध्ये आता भर पडली आहे, केदार जाधवची ! भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि असे अनेक मोठे नेते उपस्थित होते. त्यामुळे क्रिकेट पिचवर धावांचा पाउस पडणारा केदार आता राजकारणाच्या पिचवर टिकेल का ? हे येणारा काळच दाखवेल.