रशिया आणि युक्रेन युद्धाला विराम मिळणार, अशी आशा अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर वाटत होती. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे एक बेताल वक्तव्य आणि रशियन राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील गाडीमध्ये झालेला स्फोट, या घटनांमुळे हे युद्ध अधिक भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका मुलाखतीमध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या तब्बेतीबाबत विधान केले. तसेच पुतिन अनेक आजारांनी त्रस्त असून लवकरच त्यांचा मृत्यू होईल, अशी बेताल भविष्यवाणी केली. त्यांच्या या विधानावर उलटसुलट चर्चा होत असतांनाच पुतिन यांच्या ताफ्यातील अलिशान अशा लिमोझिन गाडीमध्ये स्फोट झाला. (Vladimir Putin)
मॉस्कोच्या एफएसबी मुख्यालयाजवळ पुतिन यांच्या ताफ्यातील एका आलिशान ऑरस लिमोझिनमध्ये स्फोट होऊन गाडीला आग लागली. थेट राष्ट्रपतींच्या ताफ्यातील आणि त्यांच्या आवडत्या गाडीमध्येच स्फोट झाल्यानं रशियामध्ये खळबळ उडाली आहे. लगेच रशियन गुप्तचर यंत्रणेनं सर्व गाड्यांचा ताबा घेतला आणि तपासणी सुरु झाली. थेट मास्कोच्या एफएसबी मुख्यालयाजवळ ही घटना घडल्यामुळे रशियाची संरक्षण यंत्रणा अधिक सजग झाली आहे. या घटनेला झेलेन्स्की यांचे पुतिन यांच्या मृत्यूबाबत केलेले वक्तव्य जोडण्यात आले आणि रशियानं युक्रेनवर ड्रोणद्वारे हल्ला सुरु केला.
सध्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे बंकरमध्ये असल्याची माहिती आहे. मात्र या हल्ल्यांमागे त्यांचाच हात असून ते कुठेही लपून बसले तरी आता वाचू शकणार नाहीत, असे रशियाच्या संरक्षण विभागानं जाहीर केले आहे. यामुळेच भविष्यात रशिया-युक्रेन युद्ध अधिक दाहक होत जाण्याची चिन्हे आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यात तैनात असलेल्या आलिशान कारमध्ये स्फोट झाला. शिवाय हा स्फोट गुप्तचर संस्थेच्या कार्यालयाबाहेरच झाल्यानं रशियाच्या गुप्तहेर संस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पुतिन यांच्या ज्या लिमोझिन कारमध्ये हा स्फोट झाला, ती गाडी पुतिन यांची आवडती गाडी असल्याची माहिती आहे. (Vladimir Putin)
पुतिन यांच्या ताफ्यात अशा अनेक लिमोझिन तैनात असतात. पुतिन कुठेही जाण्यासाठी लिमोझिन कार वापरतात. ते कुठली कार वापरणार हे सुरक्षतेच्या कारणामुळे नक्की नसते. ताफ्यात तैनात असलेल्या एका गाडीची पुतिन निवड करतात. मात्र त्यापूर्वी या ताफ्यातील सर्वच गाड्यांची कडक तपासणी झालेली असते. असे असतांनाही गाडीमध्ये स्फोट झाला आणि नंतर त्या गाडीत आग लागली, ही घटना रशियाच्या गुप्तचर खात्याच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कारण या गाड्यांच्या आसपास फक्त पुतिन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांचाच वावर असतो. (International News)
त्यामुळे आता पुतिन यांच्या या अंगरक्षकांच्या टिममध्येही कोणी फितूर आहे का, याचाही तपास सुरु झाला आहे. पुतिन हे कायम लिमोझिनचा वापर करतातच शिवाय रशियामध्ये आल्या राजकीय पाहुण्यांनाही ते लिमोझिन गाडीच भेट देतात. उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनाही त्यांनी हिच गाडी भेट दिली होती. या घटनेनं रशिया आणि युक्रेन युद्धाला वेगळे वळन मिळण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या गाडीतील स्फोटासंदर्भात गुप्तचर यंत्रणा तपास करत असून यात मिळालेल्या पुराव्यावरुन रशिया काय निर्णय घेणार आहे, हे स्पष्ट होईल. (Vladimir Putin)
==============
हे देखील वाचा : Summer :उन्हाच्या तडाख्यातही हिवाळ्याचा फील देणारी पर्यटन स्थळं
==============
या स्फोटात कुठलिही जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरुन चांगलाच व्हायरल झाला आहे. पुतिन यांच्या सुरक्षा यंत्रणेत गडबड अशा आशयाचा उल्लेख सोबत असल्यानं हा रशियन गुप्तचर यंत्रणेच्या प्रतिष्ठेवर झालेला हल्ला मानण्यात येत आहे. ज्या गाडीत स्फोट झाला, त्या गाडीची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. जिथे स्फोट झाला, त्याच ठिकाणी व्लादिमिर पुतिन यांचे भाषण होणार होते. त्यामुळे या घटनेनंतर हा सर्व भाग सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतला आणि तिथे कसून तपासणी केली. शिवाय पुतिन यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही झडती घेण्यात आली. (Vladimir Putin)
या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांच्या बंदुकीचीही तपासणी अधिका-यांनी केली आहे. यावरुनच रशियातील सुरक्षा यंत्रणा किती सजग झाल्या आहेत, याची कल्पना येते. या घटनेसाठी सध्यातरी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर संशय व्यक्त कऱण्यात येत आहे. युक्रेनने ड्रोणच्या मार्फत स्फोटकं या गाडीत टाकल्याची शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. त्यातच युक्रेनचे लष्करी गुप्तचर प्रमुख किरिलो बुडानोव्ह यांनी पुतिन यांच्या हत्येचे अनेक प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे. तसाच हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितल्यानं या प्रकऱणात युक्रेनचाच हात आहे, अशी खात्री रशियन गुप्तचर संघटनांना झाली आहे. तसा पुरावा मिळाला तर युद्धाला अधिक भयानक स्वरुप येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
सई बने