कोल्हापुरी चपला हा ट्रेंड पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहे, कारण त्यात परंपरेचा सुंदर संगम आणि आधुनिक फॅशनचा टच आहे. आजकाल कोल्हापुरी चपलेन फॅशनच्या जगात एक नवा ट्रेंड सेट केला आहे. तो म्हणजे लग्न, यात्रा, उत्सव किंवा कॉलेजचा ट्रॅडिशनल डे असो,त्यावेळी तरुणाईमध्ये कोल्हापुरी चपला घालण्याची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. पायात एक जोडी कोल्हापुरी चपला असल्या की,व्यक्तिमत्वाला एक वेगळाच रुबाब येतो. खास करून, त्याचा येणारा “कररर-कररर” असा आवाज त्याने एक वेगळीच जादू निर्माण होते. आणि हो, कोल्हापुरी पायतान हा एक प्रतिष्ठित ट्रेंड आहे. त्यातलं एक असं नाव आहे जे सेनापती कापशी चप्पल म्हणून प्रसिद्ध आहे. जी आणखी एक स्टाइलिस्टिक आणि खास डिझाइनची चप्पल आहे. परंतु कोल्हापूरमध्ये कमाल अशी ओळख असलेली सेनापती कापशी चप्पल कोल्हापूरमध्ये आली तरी कशी ? आणि याची गोष्ट नेमकी आहे तरी काय? जाणून घेऊ. (Kolhapuri Chappal)
कोल्हापूर म्हटलं की आठवतं ते झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, येथील रांगडी माणसं, रंकाळा, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल आंबाबाईचं भव्य मंदिर आणि दख्खनचा राजा ज्योतिबा ! परंतु कोल्हापूर म्हंटलं की या सर्व गोष्टींसोबतच प्रसिध्द आहे ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरात आपण गेलो आणि कोल्हापुरी चप्पल घेतली नाही असं कधीच होत नाही. भारतासह ५५ देशातील चप्पल प्रेमींना या कोल्हापुरीनं भुरळ घातली आहे. आता तर या रूबाबदार कोल्हापुरीला जीआयचं अधिकार प्रमाणही मिळालं आहे. (Information)
परंतु कोल्हापूरमधील सर्वात प्रसिद्ध असलेली सेनापती कापसी चप्पलेची खास ओळख आहे तरी काय ? तर कोल्हापुरी चप्पलांचा इतिहास १३व्या शतकापासून सुरू होतो. तेव्हा या चप्पलांचे डिझाईन साधारणपणे जाड चामड्याचे होते. ज्यात मजबूत आणि टिकाऊपणा होता. मात्र, १९२० च्या दशकात कोल्हापूरातील कारागिरांनी या डिझाईनमध्ये बदल करून ती अधिक आरामदायक आणि हलकी केली. याच कालखंडात कागल तालुक्यातील कापशी गावात आणखी एक नवीन चप्पल प्रकार उगम पावला, ज्याला “कापशी चप्पल” असं नाव देण्यात आलं. कापशी चप्पल हा एक खास प्रकार आहे जो प्रामुख्याने कापशी गावात तयार होतो. कापशी हे गाव कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेलं आहे. या गावातील चप्पलांचं वैशिष्ट्य म्हणजे ते बनवण्यासाठी अस्सल चामड्याचा वापर, आणि त्यात केलेली आकर्षक नक्षी. (Kolhapuri Chappal)
कोल्हापूर संस्थानातील ९ जहागिरींपैकी कापशी हे एक महत्त्वाचं गाव आहे आणि येथेच एका परंपरेन चप्पल तयार केल्या जातात. या गावाचा ऐतिहासिक संबंध हिंदवी स्वराज्याचे महान सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याशी आहे. २०० वर्षांपूर्वी कापशी गावातील गोविंद लक्षमण चव्हाण यांनी राजघराण्यातील घोरपडे यांच्यासाठी चामड्यापासून एक आकर्षक आणि आरामदायक चप्पल तयार केली. घोरपडे यांच्या या चपलेची एक जोड इतर राजे आणि सेनापतींना दाखवण्यात आले, ज्यामुळे याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. पाहता पाहता कोल्हापुरी चपलेनं भारतभर तसेच विदेशात आपला बाजार तयार केला. (Kolhapuri Chappal)
अगदी राजकीय नेत्यांमध्येही कापशी चप्पलला मोठं स्थान आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यादेखील चपला कापशी चप्पलच होत्या. दत्तात्रय कृष्णाजी चव्हाण हे यशवंतराव चव्हाण यांना या चपला बनवून देत, आणि आजही त्यांचे माप चव्हाण यांच्या दुकानात आहे. या चपलेची मागणी प्रा. एन.डी. पाटील, विजयसिंह मोहीते पाटील, रणजीतसिंह पाटील यांसारख्या प्रमुख राजकारण्यांमध्ये आहे. तसेच, उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्येही या चपलेची विशेष मागणी आहे.
================
हे देखील वाचा : Sweat Smell : चारचौघात घामाच्या दुर्गंधीमुळे ओशाळलेपणा जाणवतो….? मग करा ‘हे’ सोपे उपाय
=================
एवढंच नाही तर ह्या सेनापती कापशी चप्पलचे देखील प्रमुख तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे साधारण कापशी, जी हाताने बनवलेली असते आणि यात दोन चामड्याच्या पट्ट्यांचा वापर केला जातो. या पट्ट्यांची संख्या ८ ते १२ वेणींवर असते. साधारणपणे कापशी चप्पल तयार करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि काळजी ही या चपलेला खास बनवते. दुसरा प्रकार म्हणजे पेपर कापशी, जी साधारण कापशीपेक्षा अधिक पातळ आणि हलकी असते. या चपलेला लहान आकारात गुंडाळून बॅगेत ठेवता येत, ज्यामुळे ती खास करून हलकी चप्पल वापरणाऱ्यांसाठी आदर्श आहे. तिसरा प्रकार म्हणजे जाड कापशी, जी रांगड्या आणि मजबूत चप्पल आवडणाऱ्या लोकांसाठी आहे. या चपलेत तीन तळे असतात, जी अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असतात. जाड कापशी एकदा घेतल्यास ती वर्षानुवर्षे टिकते. (Kolhapuri Chappal)
हे सर्व लक्षात घेता सेनापती कापशी चप्पल ही केवळ एक चप्पल नाही, तर कोल्हापुरच्या कलेचं, परंपरेचं आणि कुटुंबाच्या मेहनतीचं प्रतीक बनल आहे. उन्हाळ्यात वापरायला आरामदायक, टिकाऊ आणि पायासाठी योग्य असलेली ही चप्पल आज देश-विदेशातील बाजारात आपला ठसा उमठवत आहे. विशेष म्हणजे, ही चप्पल वापरण्याने डोळ्यांना त्रास होण्याचा प्रश्न नाही आणि पायाला कोणत्याही प्रकाराची इजा देखील होत नाही. यामुळेच सेनापती कापशी चप्पल कोल्हापूरच्या एका विशिष्ट परंपरेला जगभर पोहचवण्याच कार्य करत आहे. आधुनिकतेसह पारंपारिकतेचा संगम असलेल्या कोल्हापुरी चपलेचा अनुभव कोणी कोणी घेतलाय आणि हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता हे आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.