हिंदू धर्मामध्ये श्रीरामांचे सर्वात उंच आणि महत्वाचे स्थान आहे. सर्वच पुरुष जातीसाठी एक आदर्श पुरुष कसा असावा याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण श्रीरामांनी स्थापित केले. त्यांनी त्यांच्या वर्तवणुकीतून समाजासमोर अनेक आदर्श उभे केले. एक आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श भाऊ, आदर्श राजा अशा सर्वच भूमिकांमध्ये त्यांनी त्यांचे कर्तव्य उत्तमपणे पार पाडले. भगवान विष्णू यांचा अवतार असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी रावणाचा वध करण्यासाठी राम अवतार घेतला होता.
एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असे आदर्श पुरुष म्हणून श्रीराम यांची ओळख आहे. श्रीराम स्वारी यांचे नाव उच्चरताच आपल्या डोळ्यासमोर एक छबी उभी राहते भलेही ती संन्यासी वेषातली असली किंवा राजाच्या पोषाखातली असली तरी त्यांच्या हातात धनुष्य आपल्याला दिसतेच. श्रीराम हे त्यांच्या धनुष्याशिवाय निव्वळ अपूर्णच. मात्र तुम्हाला माहित आहे का…? की ज्या धनुष्याच्या साथीने श्रीराम यांनी अनेक पराक्रम गाजवत रावणासारख्या अनेक मोठ्या राक्षसांना मारले त्या धनुष्याचे नाव काय आहे?
ऐकून थोडे तरी आश्चर्य वाटले असेल ना…? आतापर्यंत आपण रामायण बऱ्याचदा पाहिले पण आपल्याला श्रीरामाच्या धनुष्याच्या नावाबद्दल ऐकलेले आठवत नसेल. मात्र या धनुष्याला श्रीरामांनी एक नाव दिले होते. ते कोणते नाव होते हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
राम आणि त्यांच्या तिन्ही भावांना गुरु वशिष्ठांनी इतर शस्त्रांसह धनुष्य आणि बाणाचा वापर करण्यास शिकवले होते. श्रीराम धनुष्य चालवण्यात निष्णात होते. पुर्वीच्या काली विशिष्ट वयानंतर मुलांना गुरुगृही अर्थात गुरुकुलात जावे लागायचे तिथे जाऊन सर्व मुलं त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे. मग राजा असो किंवा सेवक सर्वच मुलांना या गुरुकुलात एकसारखी वागणूक मिळायची. श्रीरामांना देखील धनुष्य चालवण्याचे शिक्षण गुरुकुलात दिले गेले होते. सहसा सर्व धनुर्धारी स्वतःचे धनुष्य स्वतः बनवत असत. बाणही स्वत: बनवून त्याला अभिमंत्रीत करत असत. धनुष्य बनवण्याची देखील एक कला होती.
प्रत्येक महान धनुर्धारी त्याचे धनुष्य कायम सोबत ठेवत असे. शिवाय तो आपल्या या खास सोबतीला एक विशेष नावही द्यायचा. प्राचीन काळी धनुर्धारी धनुष्यबाण नेहमी सोबत ठेवत असत. भगवान श्रीरामांनी देखील त्यांच्या धनुष्याचे एक खास नाव ठेवले होते. श्रीरामांच्या धनुष्याचे नाव होते, ‘कोदंड’. श्रीरामांचे कोदंड हे एक अतिशय प्रसिद्ध धनुष्य होते. म्हणूनच श्रीरामांना कोदंडधारी देखील म्हटले जाते. ‘कोदंड’ म्हणजे बांबूपासून बनवलेला. कोदंड हे एक प्रभावी धनुष्य होते.
श्रीरामांच्या कोदंड धनुष्याची खास बाब म्हणजे हे धनुष्य त्याचे लक्ष्य भेदूनच पुन्हा माघारी येत असे. हे धनुष्य कधीच त्याचे लक्ष्य चुकत नसे. श्रीराम जेव्हा लंकेसाठी निघाले होते. तेव्हा याच धनुष्याच्या मदतीने त्यांनी काही बाण समुद्रातील पाण्यात सोडले ज्यामुळे पाणी सुकण्यास मदत झाली अशी आख्यायिका आहे.
श्रीरामाच्या कोदंड धनुष्याची लांबी ही साडे पाच हात लांब असल्याचे पुराणात वर्णन आहे. तर या धनुष्याचे वजन तब्बल १०० किलो असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. श्रीरामाच्या या कोदंड धनुष्याला देव धनुष्य असे ही म्हटले जाते. राम हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध धनुर्धर होते. त्यांच्याशिवाय कोणीही त्यांच्या धनुष्याला स्पर्शही करू शकत नव्हते.
धनुष्य हे प्राण्याचे शिंग किंवा लाकूड याचे बनायचे. धनुष्याची तार बांबू किंवा इतर झाडांच्या तंतूंनी बनवली जायची. लाकडी धनुष्याची लांबी सहा फूट असायची. लहान आकाराचे धनुष्य सुमारे साडेचार फूट असायचे. बाणावरची पकड मजबूत आणि स्थिर करण्यासाठी जाड आवरण गुंडाळले जायचे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)