Home » संकष्टी चतुर्थीचे महत्व आणि पूजा करण्याची पद्धत

संकष्टी चतुर्थीचे महत्व आणि पूजा करण्याची पद्धत

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sankashti Chaturthi
Share

आज या २०२४ वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. गणपतीच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा समजला जातो. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्यात एक अशा वर्षभरात १२ आणि ज्या वर्षी अधिकमास असेल त्या वर्षी १३ संकष्टी चतुर्थी येतात. संकष्टीच्या दिवशी चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग असतो.

६४ कलांचा अधिपती, प्रथमपुज्य असलेल्या गणपतीचे अनेक भक्त आहे. सगळ्यांचे लाडके दैवत म्हणून गणपती बाप्पाला ओळखले जाते. गणेशाची उपासना केल्यामुळे उत्तम बुद्धी प्राप्त होते. संकटांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे अनेक लोकं गणपतीची हरतऱ्हेने भक्ती करताना दिसतात. गणपतीचा वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवारी लोकं उपवास करतात, गणेशाची पूजा अर्चना करतात. यासोबतच दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीचे व्रत देखील पाळतात. आता दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीचे महत्व काय? हे व्रत का आणि कसे करतात? याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया.

चतुर्थीच्या दिवशी भक्त मोठ्या निर्मल मनाने या दिवशी दिवस उपवास करतात आणि गणेशाचे ध्यान करतात. गणेश भक्तांसाठी संकष्ट चतुर्थीला अधिक महत्त्व असते. या दिवशी चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. आपण राहतो तिथे चंद्रोदय झाल्यानंतरच गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो आरती केली जाते. यानंतर भाविक त्यांचा उपवास सोडतात.

संकष्ट चतुर्थीचे व्रत महिला आणि पुरुष यांच्यापैकी कोणीही करू शकते. काही जण मिठाची चतुर्थी करतात तर काहीजण पंचामृती चतुर्थी करतात. या दोन्ही व्रतांसाठी चंद्रदर्शन महत्त्वाचे असते. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. यादिवशी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा कालावधी आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा असतो.

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही एकादशी आहे असा त्याचा अर्थ आहे. संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते. हा उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते, शिवाय विविध कलांमध्ये व्यक्ती निपुण होते.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते. धार्मिक मान्यतेनुसार संततीप्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हे व्रत करुन चंद्र दर्शन केल्यानंतर गणेश पूजा करावी. काही ठिकाणी या दिवशी ब्राह्मण भोजन देखील करवले जाते. याने अर्थ- धर्म-काम-मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकते.

संकष्टीचा उपवास कसा सोडावा?
संकष्टीचा उपवास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्र दर्शन घ्यावे. चंद्राला पाणी अर्पण करावे. हळद कुंकू वाहावे, दिवा आणि अगरबत्ती ओवाळावी. चंद्राला नमस्कार करावा. त्यानंतर गणेशाचे दर्शन घ्यावे. त्याला दुर्वा आणि फुले वाहावीत. गणपतीची आरती करावी. मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

संकष्टी चतुर्थीची कथा
एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला बघुन चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला शाप दिला की “आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!” गणपतीचा हा शाप ऐकून चंद्र भयभीत झाला व क्षमा करुन शाप मागे घ्या, असे विनवणी करू लागला. गणपती ऐकत नाही हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आले, तेव्हा चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले.

चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस ” भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी ” तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे?

तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत” करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत ” केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.

श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात. चंद्राने तप करुन गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्र दर्शनाचे महत्व आहे. या दिवशी प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या, असे शास्त्र सांगते.

गणपतीची आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामनांपुरती॥ जय देव…

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥ जय देव…

लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे,
सुरवरवंदना॥ जय देव…।


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.