Home » त्याला फक्त हवा माणसाचा डोळा !

त्याला फक्त हवा माणसाचा डोळा !

by Team Gajawaja
0 comment
Magpie
Share

ब्रिटन आणि युरोपमध्ये सध्या एका पक्षामुळे दहशतीचे वातावरण आहे. हा पक्षी आहे, मॅग्पी नावाचा. याला आपल्या मराठीमध्ये निलकंठ असेही नाव आहे. हा पक्षी घनदाट जंगलामध्ये राहतो. मात्र सध्या होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे हे मॅग्पी पक्षी सैरावैर झाले आहेत. हे पक्षी थेट मनुष्यावर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः ब्रिटन आणि युरोपमध्ये सध्या वर्षअखेर आणि ख्रिसमसच्या निमित्तानं सुट्ट्यांचे वातावरण आहे. पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. अशावेळी जे पर्यटक जंगलांच्या आसपास जात आहेत, किंवा पॅराग्लाईडींगसारखे खेळ करत आहेत, त्यांच्यावर मॅग्पी नावाच्या पक्षानं हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. हा पक्षी माणसावर हल्ला करतो, असे नाही, तर तो थेट मानवी डोळ्यावरच हल्ला करतो. माणसाचा डोळाच काढून घेतल्याच्या घटना झाल्यामुळे या भागात भीतीचे वातावऱण आहे. (Magpie)

युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात पॅराग्लायडींगसारखे खेळ खेळले जातात. माणसाला हवेत उडवणा-या या खेळात आता मॅग्पी नावाच्या छोट्या पक्षाचा अडसर आला आहे. हा मॅग्पी पक्षी इतका धोकादायक आहे की थेट माणसाच्या डोळ्यांवरच हल्ला करत आहे. या पक्षानं पॅराग्लायडींग करणा-या व्यक्तीच्या डोळ्यावर केलेल्या हल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियामध्ये सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हे पक्षी युरोप, आशिया आणि पश्चिम उत्तर अमेरिकेच्या समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. शिवाय तिबेट आणि काश्मीरच्या उंच प्रदेशातही या पक्षांची संख्या अधिक आहे. ब्रिटनमध्ये या पक्षांची मोठी संख्या आहे. घनदाट जंगलात राहणारे हे पक्षी मोठ्या प्रमाणात होणा-या वृक्षतोडीमुळे मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. या पक्षांची घरटी उंच वृक्षावर असतात. (International News)

अशावेळी कोणी या घरट्यांजवळ येऊल लागले तर आपल्या पिल्ल्यांच्या संरक्षणासाठी मॅग्पी पक्षी थेट त्यांच्यावर हल्ला करतात. अलिकडे मॅग्पी पक्षांनी मानवी वस्तीमध्येही घरटं केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे या घरट्यांच्या आसपास कोणी मनुष्य दिसला तर हे पक्षी त्यांच्यावर हल्ला करत आहेत. धक्कादायक म्हणजे, मॅग्पी मनुष्यावर हल्ला करतांना थेट त्याच्या डोळ्यावर चोच मारतात. ही प्रतिक्रीया संबंधीत माणसालाही गोंधळात टाकणारी असते. तोपर्यंत मॅग्पी आपल्या धारधार चोचीनं मनुष्याच्या डोळ्याला चांगलीच इजा करतात. अशाच मॅग्पी पक्षांनी लहान मुलांवरही हल्ला केल्यामुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे. मॅग्पी पक्षाच्या अनेक प्रजाती आहेत. यात युरेशियन मॅग्पी हे जगातील सर्वात बुद्धीवान पक्षी म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलियन मॅग्पी हे शिकारी पक्षी म्हणून ओळखले जातात. मात्र ते घनदाट जंगलात रहातात. अमेरिकेच्या जंगलातही या मॅग्पी पक्षांची मोठी वस्ती आहेत. हे पक्षी दिसायला आकर्षक असतात. मात्र त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ते माणसावर लगेच हल्ला करतात. त्यामुळे या भागात मॅग्पी पक्षांपासून सावधान रहा अशी फोटो आणि माहितीपत्र लावण्यात आली आहेत. (Magpie)

========

हे देखील वाचा : चेस मास्टर गुकेश डोम्मराजू !

======

युरोपमध्ये मॅग्पी पक्षासंदर्भात अनेक कथाही सांगितल्या जातात. काळ्या, पांढ-या रंगाची पंखे असलेल्या या मॅग्पीच्या पंखांवर जांभळ्या, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या रेषा असतात. असे मॅग्पी पक्षी एक साथ किती दिसतात, यावर काही भाकीते युरोपमध्ये कऱण्यात येतात. त्यामध्ये एक मॅग्पी पक्षी दिसला तर दुःख, दोन मॅग्पी पक्षी दिसले तर आनंद, तिन मॅग्पी पक्षी एक साथ दिसले तर अंत्ययात्रा, म्हणजे, मृत्यू आणि चार मॅग्पी पक्षी एकत्र दिसले तर जन्म अशा समजूती सांगण्यात येत असत. तसेच मॅग्पी पक्षी येऊन घराच्या खिडकीवर बसला तर तो वाईट बातमी घेऊन आला आहे, अशीही समजूत आहे. या अशा समजुतीमुळे मॅग्पी पक्षांवर हल्ला करण्याची संख्या वाढली आहे. मॅग्पी पक्षाबाबत अशा समजुती असल्या तरी मॅग्पी पक्षी हा सर्वाधिक बुद्धीवान पक्षी म्हणून मानला जातो. काही प्रयोग करायचे असतील तर या मॅग्पी पक्षांचाच वापर केला जातो. त्यामुळे त्यांची शिकारही जास्त होते. तसेच मॅग्पी पकडण्यासाठीही प्रयत्न केले जातात. आता या सर्वांमुळेच मॅग्पी पक्षी अधिक आक्रमक झाल्याचे बोलले जाते. हे पक्षी थेट मनुष्याच्या डोळ्यावर हल्ला करत असल्यानं या पक्षांपासून दूर रहा असा सल्ला देण्यात येत आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.