प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी तयारी पूर्ण होत आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रयागराजचा दौरा करत या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यासाठीच्या तयारीची पाहणी केली आहे. या महाकुंभमध्ये 14 आखाड्यांचे साधु आजपासून प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांची मोठी मिरवणूक निघणार आहे. या 14 आखाड्यांपैकी एका आखाड्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. सर्वांना आश्चर्य वाटेल की या आखाड्यामधील साधू हे डॉक्टर, इंजिनीअर, प्रोफेसर आहेत. हा आखाडा म्हणजे, श्री पंचायती निरंजनी आखाडा. या आखाड्याचा प्रमुख देवता भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेय आहे. महामंडलेश्वर आणि श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महंत दिगंबर साधू आहेत. श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे उज्जैन, हरिद्वार, त्र्यंबकेश्वर आणि उदयपूर येथे आश्रम आहेत. या आखाड्याच्या ध्वजाचा रंग भगवा आहे. महाकुंभच्या दरम्यान होणा-या शाही स्नानातही श्री पंचायती निरंजनी आखाड्याला मानाचे स्थान आहे. प्रयागराजमध्ये जानेवारीपासून सुरु होत असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी 14 आखाड्यांमधील साधुसंतांचे आगमन होऊ लागले आहे. यात श्री निरंजनी पंचायती आखाड्यातील साधुंचाही समावेश आहे. 726 विक्रम संवत 960 मध्ये मांडवी, गुजरात येथे श्री पंचायती निरंजनी आखाड्याची स्थापना झाली. महंत आजी गिरी, मौनी सर्जुननाथ गिरी, पुरुषोत्तम गिरी, हरिशंकर गिरी, रणछोर भारती, जगजीवन भारती, अर्जुन भारती, जगन्नाथ पुरी, स्वाभाव पुरी, कैलास पुरी, खड्गा नारायण पुरी, सभाव पुरी या सर्वांनी आखाड्याची पायाभरणी केली. या आखाड्याचे पूर्ण नाव श्री पंचायती तपोनिधी निरंजन आखाडा आहे. (Maha Khumbh Mela)
भगव्या रंगाची ध्वजा असलेल्या या आखाड्याला मानाचे स्थान आहे. याला प्रमुख कारण म्हणजे, निरंजनी पंचायती आखाडा हा ज्ञान, भक्ती आणि त्याग याबाबत सर्वात पुढे आहे. या आखाड्यातील निम्म्याहून अधिक साधू डॉक्टर, अभियंता आणि प्राध्यापकांसह उच्च शिक्षणाच्या पदवीधर आहेत. या आखाड्याचे मुख्यालय मायापूर, हरिद्वार येथे आहे. श्री पंचायती निरंजनी आखाड्याच्या भगव्या ध्वजाखाली हजारो साधू-संत आहेत. याशिवाय या आखाड्यात लाखो नागा साधू-संन्यासीही आहेत. या आखाड्याचे प्रमुख दैवत भगवान कार्तिकेय असून त्यांना निरंजन या नावाने ओळखले जाते. म्हणूनच या आखाड्याचे नाव निरंजनी आखाडा असे आहे. या आखाड्याचा कारभार चार मुख्य सचिवांमार्फत चालवला जातो. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला पंचपरमेश्वराच्या परवानगीनेच मान्यता दिली जाते. या श्री निरंजनी आखाड्याचे वैशिष्ट म्हणजे, यात कायमस्वरूपी आणि तात्पुरती दीक्षा दिली जाते. जे गृहस्थ कुटुंबातून येतात त्यांना तात्पुरती संन्यास दीक्षा दिली जाते. त्यांच्यात संन्यासी जीवन जगण्याचे गुण आहेत की नाही हे बघूनच त्यांना पूर्ण संन्यासाची दीक्षा दिली जाते. हा दीक्षा दानाचा सोहळा महाकुंभमेळ्या दरम्यानच होतो. (Social News)
या आखाड्यातील संतांपैकी वृंदावन आश्रमात राहणारे आदित्यनंद गिरी हे एमबीबीएस पदवीधारक आहेत. आखाड्याचे सचिव ओंकार गिरी अभियंता आहेत. त्यांच्याकडे एम.टेक पदवी आहे. महंत राम रतन गिरी हे दिल्ली विकास प्राधिकरणात सहाय्यक अभियंता होते. राजेश पुरी यांनी पीएचडीची पदवी घेतली आहे, तर महंत रामानंद पुरी हे वकील आहेत. याबाबत निरंजनी आखाड्याचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी सांगतात, आमचा आखाडा असा आहे की तेथे अनेक साधू ज्यांच्याकडे उच्च शैक्षणिक पदवी आहे. आखाड्यात गुणवत्तेच्या आधारे संन्यासाची दीक्षा दिली जाते. त्यात संस्कृतचे अभ्यासक आणि शिक्षकही आहेत. या आखाड्याच्या वेदविद्या शाळा आणि महाविद्यालयेही आहेत. महाकुंभमध्ये श्री महानिर्वाणी अटल आखाड्यासह पंचायती आखाडा अग्रभागी शाही स्नान करतो. त्यानंतर पंचायती आखाडा श्री निरंजनी आनंद आखाडा येथे शाही स्नानासाठी जातो. आखाड्याचा कारभार लोकशाही पद्धतीनं होतो. आखाडा चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड निवडणुकीद्वारे केली जात आहे. कुंभमध्ये दर सहा वर्षांनी आणि महाकुंभमध्ये दर 12 वर्षांनी सर्व पदांसाठी निवडणुका होतात. यानंतर निवडक संतांवर जबाबदारी सोपवली जाते. (Maha Khumbh Mela)
========
हे देखील वाचा : चेस मास्टर गुकेश डोम्मराजू !
======
निरंजनी आखाड्यात सामील होण्याचे नियम पूर्वी खूप कडक होते. मात्र अलिकडच्या काळात यामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. आखाड्यात सामील होण्यास इच्छुक संन्याशांची निवड एका मोठ्या मुलाखतीच्या आधारे केली जाते. त्यात त्या व्यक्तीची आध्यात्मिक साधना किती आहे, हे बघितले जाते. संन्याशांची निवड गुणवत्ता आणि मुलाखतीच्या आधारे केली जाते. आखाड्यात सामील होण्यापूर्वी पाच वर्षे ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे. यानंतर त्यांना महापुरुष ही पदवी दिली जाते. प्रयागराज आणि परिसरातील निरंजनी आखाड्यातील मठ, मंदिर आणि जमिनीची किंमत 300 कोटींहून अधिक आहे. 10,000 हून अधिक नागा संन्यासी या आखाड्याचे आहेत. महामंडलेश्वरांची संख्या 33 आहे. निरंजनी आखाडा हा भव्य मिरवणूक काढून महाकुंभस्थानी प्रवेश करतो. यात अनेक रथ, हत्ती, उंट यांचा सहभाग असतो. आचार्य महामंडलेश्वर आणि महामंडलेश्वर सुमारे 50 रथांवर चांदीच्या सिंहासनावर विराजमान होतात. या मिरवणुकीमध्ये नागा साधूही असतात. ते भगवान शंकराचे तांडव करत आखाड्याची महती सर्वांना सांगतात. (Social News)
सई बने