मार्गशीर्ष महिना लागला की, सुरु होतात ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि यासोबतच याच महिन्यातला दुसरा महत्वाचा सण म्हणजे, ‘दत्त जयंती’. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी सर्वत्र दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
यंदा, उद्या अर्थात शनिवार १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती साजरी आहे. या दिवशी दत्तात्रयांची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी दत्ताची पूजा केल्याने दत्ततत्त्वाचा अधिक लाभ मिळतो, अशी मान्यता आहे. असे सांगितले जाते की, दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त-तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होते. बहुतांशी ठिकाणी ‘त्रिमूर्ती’ म्हणजे त्रिमुखे असलेल्या स्वरुपात दत्ताची पुजा केली जाते. तर काही ठिकाणी एकमुखी दत्ताच्या मूर्तीचे पूजन केले जाते. दत्ताला ‘अवधूत’ असंदेखील म्हटलं जातं. दत्ताचे चोवीस गुरू मानले जातात.
दत्त, दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात. आपल्या पुराणांमध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये, त्यांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. आपल्या काही हिंदू धर्मग्रंथांमध्ये असेही सांगितले आहे की, दत्तगुरु हे भगवान विष्णूंचा पुनर्जन्म आहे. भगवान दत्तात्रेय भगवान विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक मानले जातात. असे सांगितले जाते की, दत्त भगवानांनी सभोवतालचे आणि पर्यावरणाचे निरीक्षण करून ज्ञान संपादन केले होते.
तसे पाहिले तर दत्तसंप्रदायाचा प्रभाव संपूर्ण हिंदूंवर पाहायला मिळतो. मात्र त्यातही महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दत्त भक्ती पाहायला मिळतो. यातही महाराष्ट्रात तर दत्त भगवानांचा सर्वात मोठा प्रभाव पाहायला मिळतो. आपल्याकडे प्रत्येक गावात, शहरात दत्ताची लहान, मोठी अनेक मंदिरं पाहायला मिळतात. दत्तांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त पूजा आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
दत्त जन्माची कथा
अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, ‘‘तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.’’ हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, ‘‘एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.’’
एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता’, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’
मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.’’
मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, ‘अतिथी माझी मुले आहेत’ आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला.
ती म्हणाली, ‘‘स्वामिन् देवेन दत्तं ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.