सूर्य आपल्या मानवी आयुष्याचा सर्वात मोठा भाग. सूर्यावर आपले संपूर्ण मानवी जीवन अवलंबून आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न, पाणी आदी महत्वाच्या सर्वच गोष्टी सूर्यामुळेच आपल्याला मिळतात. त्यामुळे आपण नेहमीच सूर्याचे ऋणी असतो. सूर्याला वैज्ञानिकरित्या जेवढे महत्व आहे, तेवढेच किंबहुना त्याहून जास्त सूर्याला आपल्या हिंदू धर्मात महत्व आहे. सूर्य ही देवता असून, पृथ्वी चालवण्यामध्ये या देवतेचा मोठा वाटा आहे. सूर्याची उपासना सर्व दु:ख दूर करणारी आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढवणारी मानली जाते.
याच सूर्य देवतांच्या आपल्या पुराणांमध्ये आणि ग्रंथांमध्ये पूजा सांगितली गेली आहे. आपल्या मनुष्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या कमी करण्यासाठी आपण भानुसप्तमी हे व्रत करू शकतो. भानू हे सूर्याचेच एक नाव आहे. त्यावरून या व्रताला नाव दिले गेले आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीच्या दिवशी भानुसप्तमी साजरी केली जाते. नक्की भानुसप्तमी काय आहे आणि हे व्रत कसे करतात चला जाणून घेऊया.
धार्मिक मान्यतेनुसार भानुसप्तमीचा दिवस सूर्य पूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान सूर्याची विधीवत पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी भानुसप्तमी साजरी केली जाते. मान्यता आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे नक्कीच त्या व्यक्तीसाठी लाभदायक ठरू शकते. भानुसप्तमीचे व्रत केल्याने व्यक्तीला चांगल्या आरोग्यची प्राप्ती होत आपले आयुष्य दुःखविरहित होते.
यंदा हिंदू पंचांगानुसार, डिसेंबर महिन्यातील शुक्ल पक्षातील ८ डिसेंबर रोजी भानु सप्तमीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी पूजेसाठी सर्वात शुभ वेळ सकाळी ०६:०१ ते ०६:३३ पर्यंत असणार आहे.
भानु सप्तमी व्रत पद्धत
सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला लाल फुले, चंदन, अखंड मिश्रित जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फुले, कुंकू, अक्षदा आणि काळे तीळ मिसळून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना सूर्यमंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करावा. अर्घ्य देताना पाण्याच्या प्रवाहाकडे पाहून सूर्यदेवाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते.
यानंतर आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्य चालीसा पठण करावे. त्यानंतर सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा. तसेच,सूर्यदेवाची आराधना करून सुखी व आनंदी जीवनाचा आशीर्वाद मागावा. फळे खावी. मीठ सेवन करू नका. काही लोक सूर्योदयानंतरच पारण करतात तर काही लोक दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करतात.
सूर्याची पूजा करतांना या मंत्राचा जप करावा
ॐ मित्राय नम:, ॐ रवये नम:,
“ॐ सूर्याय नम:. ॐ भानवे नम:”
ॐ खगाय नम:, ॐ पूष्णे नम:,
“ॐ हिरन्यायगर्भाय नम:, ॐ मरीचे नम:”
ॐ सवित्रे नम:,ॐ आर्काया नम:,
“ॐआदिनाथाय नम:, ॐ भास्कराय नम:”
ॐ श्री सवितसूर्यनारायणा नम :..
भानु सप्तमीला सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक फायदे होतात. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. भानु सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्याला अर्घ्य दिल्याने आत्मविश्वास वाढतो, धन-धान्य वाढते. या दिवशी दान केल्याने देखील शुभ फळ मिळते. सूर्यदेवाची पूजा केल्याने मान-सन्मान मिळतो आणि सौभाग्यही वाढते.
जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग आणि त्वचारोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्याने सूर्यदेवाची पूजा करावी. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाच्या पुत्रानेही पूर्वी सूर्यदेवाची पूजा केली होती. त्यामुळे सांबची कुष्ठरोगातून सुटका झाली. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर ज्योतिषी त्याला सूर्याला बल देण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा करण्याचा सल्ला देतात.
भानु सप्तमीच्या दिवशी गूळ, तांदूळ, गहू, तांबे, माणिक रत्न, लाल फुले इत्यादी वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी वस्तूंचे दान केल्यास आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते. याशिवाय या दिवशी गंगा स्नान करणेही खूप शुभ मानले जाते.