अखेर ती वेळ आली आणि आज ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राला त्याचे २१ वे मुख्यमंत्री मिळणार आहे. आज महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून फडणवीस यांची निवड झाल्याने तेच मुख्यमंत्री होणार हे सगळ्यांनाच माहित होते. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अतिशय मोठा विजय संपादन केला.
२०१९ मध्ये निवडणुकांमध्ये भाजपने जास्त जागा मिळून देखील विरोधी पक्षात बसण्याचे ठरवले आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तेव्हा विरोधी पक्षनेतेपद भूषवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा काळ सर्वाधिक कठीण होता. त्यांच्या ‘मी परत येणार, मी परत येणार’ या वाक्यावरून राजकारण्यांनी, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी फडणवीस यांची खूप खिल्ली उडवली होती. मात्र आज वेळ बदलली आणि अखेर फडणवीस पुन्हा मानाने परत एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे.
२०१९ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधीपक्षनेते बनले तेव्हा त्यांनी सभागृहात ‘‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा,’ हा शेर म्हटला होता. जो आज खरा ठरला आहे. २०२४ च्या निवडणुकीमध्ये महायुतीने जो दणदणीत विजय मिळवला त्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वात जास्त दिले गेले. जेव्हा निवडणुकीचा निकाल आला तो पाहूनच अनेकांनी फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे जाहीर केले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी मोठी आणि महत्वाची पदे भूषवली आहेत. नगरसेवक पदापासून ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर आणि महाराष्ट्राचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री बनण्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी अनेक अडचवींवर मात करत त्यांचा राजकीय प्रवास केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी वयाच्या ४४ व्या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात ते दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपदी राहत आपला कार्यकाळ पूर्ण केला. पुढे २०१९ च्या निवडणुकीनंतर ते ८० तासांसाठी पुन्हा मुख्यमंत्री बनले. परंतु तेव्हा अजित पवार यांनी त्यांचा पाठिंबा मागे घेतला आणि फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ३० जून २०२२ पासून त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे पद भूषवले. आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे. त्याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांचा राजकीय प्रवास.
देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्ष आणि भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्थात आरआरएसचे सदस्य आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपुरमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील, दिवंगत गंगाधर फडणवीस हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार होते. तर आई सरिता फडणवीस या विदर्भ हाऊसिंग क्रेडिट सोसायटीच्या माजी संचालिका होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना देवेंद्र फडणवीस हे भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य होते.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठाच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी आणि जर्मनीतील डीएसई-जर्मन फाऊंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे.
फडणवीस यांची राजकीय कारकीर्द १९९२ मध्ये नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून सुरू झाली. १९९७ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले होते. आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण महापौर होते. त्यानंतर पहिल्यांदा १९९९ मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभेमधून निवडून आले. या मतदारसंघातून सलग दोनदा आमदार झाले. त्यानंतर ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चारदा विजयी झाले. १९९९ पासून ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत.
२००९ साली ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार झाले. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ते पुन्हा विजयी झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदावर काम करणारे फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत.
२०१९ च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युतीमधून वेगळी झाली. पुढे फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पर्यायी आघाडी बनवून २३ नोव्हेंबर २०१९ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार पाच दिवसच टिकले. फडणवीस यांना लगेच २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले होते.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंड झाले. या बंडानंतर फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या फडणवीसांसाठी उपमुख्यमंत्रीपद म्हणजे डिमोशन असल्याचे अनेकांनी म्हटले होते. मात्र हाच निर्णय एका मोठ्या विजयाची नांदी ठरला.
महायुतीमधील शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता. आता देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून समोर आलेत. देवेंद्र फडणवीस हे मृदुभाषी अन् चारित्र्यवान नेता म्हणून प्रसिद्ध आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह या दोघांच्याही जवळचे देखील आहेत.