भारतात मोठ्या आनंदात दिवाळी सण साजरा झाला. त्यासोबत आपल्या शेजारी देशात, म्हणजेच नेपाळमध्येही दिवाळी साजरी झाली. भारतात आपण दिवाळी साजरी करतांना गायीची पूजा करतो, तिला गोडधोड खायला देऊन तिची आरती करतो. मात्र नेपाळमध्ये दिवाळी साजरी करतांना चक्क कावळा आणि कुत्र्याची पुजा केली जाते. या पुजेला कुकुर पुजा असे म्हटले जाते. कुत्रा हा माणसाचा पक्का साथी असतो, अगदी मृत्युनंतरही हा कुत्राच सोबत असतो, त्यामुळे त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी कुकुर पुजेचा सोहळा नेपाळच्या घराघरात होतो. यावेळेही नेपाळमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी झाली आणि त्यासोबत कुकर पुजाही करण्यात आली. नेपाळची ही कुकुर पुजा कशी केली जाते, आणि त्यामागची धारणा काय आहे, हे जाणण्यासारखे आहे. (Kukur Pooja)
भारतात दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन सुरु असते, तेव्हाच नेपाळमध्ये एक अनोखे पुजन होत असते. ते म्हणजे, नेपाळमध्ये कुत्र्यांची पूजा केली जाते. ज्याला कुकुर तिहार किंवा कुकुर पूजा म्हणतात. दिवाळी सणाचा सर्वात मोठा भाग म्हणून या कुकुर पुजेचा सोहळा येथील घराघरामध्ये पार पडतो. नेपाळमध्ये, लोक या दिवशी दिवे लावून घरांची सजावट केली जाते. तसेच नवीन कपडे घालून मित्रपरिवाराला भेटी देण्यात येतात. यासोबतच येथे घरातील किंवा अगदी रस्त्यावरील कुत्र्याची पुजा केली जाते. कुत्र्याला स्नान घालण्यात येते. तसेच त्याला टिळा लावून हार घालण्यात येतो. याशिवाय कुत्र्यांसाठी खास पदार्थही तयार केले जातात. कुत्र्यांना दही खायला दिले जाते. अंडी आणि दूधही खाण्यासाठी दिले जाते. यामुळे आपल्या घरातील कुत्रा कायम सोबत रहावा अशी प्रार्थना करण्यात येते. नेपाळमध्ये लोक कुत्र्याला भगवान यमाचा दूत मानतात. नेपाळी लोकांचा असाही विश्वास आहे की कुत्रा मेल्यानंतरही त्यांच्या मालकाचे रक्षण करतो. याच कारणांमुळे नेपाळमध्ये कुत्र्यांची पूजा केली जाते. यासोबत घरातील गाय, बैल यांचीही पुजा केली जाते. सोबत कावळ्यालाही मान देऊन त्याला गोडधोडाचा नैवेद्य देण्यात येतो. (Social News)
हा कुकुर सण म्हणजे नेपाळच्या संस्कृतीचा पाया समजला जातो. आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी जसे मानवाचे योगदान आहे, तसेच प्राण्यांचेही महत्त्व आहे. त्यामुळेच प्राण्यांना त्यांचा मान मिळाला पाहिजे, असाही उद्देश या कुकर सणामागे आहे. कुकुर सण साजरा करतांना प्राण्यांनाही मान दिला पाहिजे, त्यांना हानी करु नये, अशी शिकवण एका पिढी पुढच्या पिढीला देते, असे नेपाळमध्ये सांगितले जाते. शिवाय या कुकुर सणामागे काही पौराणिक कथाही सांगण्यात येतात. त्यातील एक कथा जेष्ठ पांडव युधिष्ठिराबाबत आहे. महाभारत युद्धानंतर पाच पांडव स्वर्गात जात असतांना त्यांच्यासोबत एक कुत्राही होता. या स्वर्गाच्या वाटेवर दौपदी आणि अन्य चार पांडवांचा मृत्यू झाला. मात्र एकमेव युधिष्ठिर सदेह स्वर्गाच्या दारावर जातात. तेव्हा युधिष्ठिरासोबत त्यांचा कुत्राही होता. स्वर्गात गेलेल्या युधिष्ठिरांचे स्वर्गाचे राजे इंद्र स्वागत करतात. (Kukur Pooja)
======
हे देखील वाचा : दिवाळीत लक्ष्मीसोबत गणेश पूजन का करतात?
====
मात्र स्वर्गात रहायचे असेल तर आपल्या कुत्र्याला सोडून ये, असा आदेश ते युधिष्ठिराला देतात. पण युधिष्ठिरानं कुत्र्याशिवाय स्वर्गात जाण्यास नकार दिला, पुन्हा पृथ्वीवर जाण्याची तयारी दाखवली. युधिष्ठिराच्या या वाक्यावर इंद्रराज प्रसन्न झाले तसेच कुत्र्याचा रुप घेतलेले यमराजही खुष झाले. त्यांनी युधिष्ठिराला आशीर्वाद देऊन त्याच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले. नेपाळमध्येही याच कथेचा दाखला देण्यात येतो. कुत्रा हा आपल्याला नेहमी वाईट प्रवृत्तींपासून दूर ठेवतो, असे सांगून त्याची पुजा केली जाते. आणखी एक कथा नेपाळमध्ये कुकर पुजनाच्यावेळी सांगितली जाते. या पौराणिक कथेनुसार यमराजाकडे दोन कुत्रे आहेत. श्यामा आणि शर्वरा हे त्यांचे दोन कुत्रे नरकाच्या दरवाजांचे रक्षण करतात. नेपाळी हिंदूंचा असा विश्वास आहे की, कुत्र्यांची पूजा केल्याने ते मृत्यूकडे सकारात्मकतेने पाहू लागतात. यमराजाला प्रसन्न ठेवण्यासाठी कुत्र्यांची पुजा करण्याची प्रथा येथे रुढ झाली. या कुकर पुजनात फक्त घरातील नव्हे तर रस्त्यावरील कुत्र्यांचीही पुजा केली जाते. (Social News)
सई बने