Home » संकर्षण कऱ्हाडेची निवडणुकांवर भाष्य करणारी ‘ती’ कविता व्हायरल

संकर्षण कऱ्हाडेची निवडणुकांवर भाष्य करणारी ‘ती’ कविता व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sankarshan Karhade
Share

सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे आहेत. अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणूक संपन्न होणार आहे. राजकीय वर्तुळापासून ते मनोरंजनविश्वपर्यंत सर्वच लोकांना या निवडणुकांबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकांनंतर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार की पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार याबाबत सगळ्यांना कुतुहूल आहे.

सध्या चालू असणारी सर्वच राजकीय घडामोडींवर अगदी समर्पक शब्दात भाष्य करणारी अतिशय सुरेख कविता अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सादर केली आहे. सध्या त्याचा ही कविता सादर करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. त्याच्या या कवितेवर सध्या नेटकऱ्यांकडून आणि राजकीय नेत्यांकडून देखील कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

संकर्षण हा एक चांगला आणि प्रतिभावान अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखक आणि कवी देखील आहे. त्याच्या कविता हा नेहमीच त्याच्या फॅन्समध्ये आणि कलाकारांमध्ये चर्चेचा विषय असतो. आता संकर्षणच्या व्हायरल होणाऱ्या कवितेमध्ये तो काय म्हणतो जाणून घेऊया

“महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पाहावं
मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं
मग ना पावसातल्या सभा, ना प्रचाराचा घाम
तुझेच स्टार प्रचारक देवा ज्ञानबा- तुकाराम
प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील
बॅनर पाहून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील…
सगळं सुखाचं होईल देवा, विपरीत काहीच घडणार नाही
आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही
अजून तरी पांडुरंगा तुझा कोणी विरोधक नसल्याने सगळ्यांना बरंच वाटेल
आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडं देखील लवकर सुटेल
पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील
आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील
सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे…
कायद्यासोबत गृहखातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे!
मग काय टाप कोणाची, कोण कायदा हातात घेईल
अरे एका नजरेत पूर्ण महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल
लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं
त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं
आणि साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील
बुद्धीला वैभव म्हणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षणमंत्री होतील
अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत: खाली बुडलं जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं
त्या तुकोबांच्या हाती दे पुन्हा हिशेबाच्या वह्या आणि अर्थमंत्री म्हणून घे त्यांच्या ताबडतोब सह्या
एकदम झाला आवाज हो…लखलख वीज कडाडली
वीटेवरची माऊली माझ्यावरती चिडली
काय लावली केव्हापासून तुझी ही बडबड आहे…
हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे
या थोरांना मंत्री करून मला CM करतोय होय
राजकारणात यांच्या नावाचा होतोय तेवढा वापर पुरेय
राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोय म्हणून केव्हाचा ऐकतोय
पण, ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय
माऊलीच्या रुपातला विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीने राष्ट्रासाठी पुढे बोलू लागला
मला बोलला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता?
आणि मग कसं काय तुम्ही जयंती असताना डीजे लावून नाचता
या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलंत
डोक्यावरती घेतलं पण, डोक्यात नाही घातलंत.
प्रत्येक तुका-शिवाजी आहेत…जर विचारांचा घेतला वसा
सुराज्यासाठीच काम करावं मग कोणीही खुर्चीत बसा!
आणि कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड
आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड…
आम्ही सगळे पाठिशी आहोत तुम्ही खुशाल राहा
अरे समोर महाराष्ट्र उभा आहे त्याच्यात पांडुरंग पाहा…”

संकर्षणने सादर केलेली ही कविता त्याने पांडुरंगाला अनुसरून लिहिली आहे. या कवितेतून त्याने अगदी मार्मिक शब्दांमध्ये राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. ही कविता सादर करण्यापूर्वी संकर्षणाने प्रेक्षकांना एक विनंती देखील केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. तो म्हणतो, “राजकारण आणि पांडुरंग हे दोन्ही माझ्या अत्यंत आवडीचे विषय आहेत. या विषयाला अनुसरून मी काहीतरी लिहिलंय…ते ऐकवतो.” सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ ‘स्मृतीगंध मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.