Home » जेलमधून सुटण्यासाठी त्याने केली आत्महत्या !

जेलमधून सुटण्यासाठी त्याने केली आत्महत्या !

by Team Gajawaja
0 comment
Bhopal Crime Story
Share

तारीख २९ जून २०१९ मध्य प्रदेशच्या भोपाल जेलमध्ये पोलिस एका कैदीची वाट पाहत होते. एक कैदी आपल्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणून काही दिवसांसाठी पॅरोलवर जेलमधून बाहेर गेला होता. पण अचानक जेलमध्ये असणाऱ्या पोलिसांना स्थानिक पोलिसांकडून माहिती मिळते. जो कैदी पॅरोलवर बाहेर होता त्याने स्वत:ला जाळून आत्महत्या केली आहे. मग पोलिस त्या कैदीच्या केसचा पंचनामाकरून ती केस बंद करण्याच्या तयारीत होते. पण या आत्महत्येच्या पोस्टमार्टमच्या रीपोर्टमध्ये जे समोर आलं त्यामुळे पोलिस सुद्धा हैराण झाले. ही फक्त एक आत्महत्या नव्हती, पोलिसांना रीपोर्टमध्ये काय सापडलं. पुढे या केस मध्ये काय खुलासे झाले. हे जाणून घेऊया. (Bhopal Crime Story)

प्रत्येक क्राइम स्ट्रोरीची सुरुवात ही हत्ये पासून होते. पण या स्टोरीची सुरुवात होते अटके पासून. ३४ वर्षीय राजेश परमार हा भोपालच्या नीलबड परिसरात राहत होता. ज्याला पोलिसांनी २०१४ मध्ये एका खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती. २ वर्षांनी २०१६ मध्ये कोर्टाने त्याला आजीवन कारावासची शिक्षा सुनावली. त्यानंतर तो जेल मध्येच होता. त्याचे वडील कधी कधी त्याला पॅरोलवर सोडवायचे. पण एक दिवशी अचानक त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी त्याला १४ दिवसांसाठी पॅरोलवर सोडलं होतं. २९ जून २०१९ हा त्याचा पुन्हा जेलमध्ये परतण्याचा दिवस होता. (Crime Story)

पण त्याच दिवशी सकाळी त्याच्या घरातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना लोकांनी पहिल्या. लोकांनी तत्काळ पोलिसांना बोलावून घेतलं. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विजवली तेव्हा त्या घरातून त्यांना एक जळालेला मृतदेह आणि एक सुसाइड नोट मिळाली. चेहरा आणि शरीर पूर्णपणे जळाल्यामुळे तो माणूस मृत आहे की बेशुद्ध हे कळत नव्हतं. म्हणून त्यांनी लगेचच त्या बॉडीला रुग्णालयात नेलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हा मृतदेह राजेश परमार याचा होता. कारण, पोलिसांना राजेश परमारच्या घरात एक सुसाइड नोट सापडली होती. ज्यावर राजेशच्या आत्महत्येचं कारण लिहिलं होतं, वडिलांच्या निधनामुळे राजेश खूप दुःखी झाला होता. आता कुटुंबातील कोणीही त्याला पॅरोलवर सोडवणार नाही असं त्याला वाटत होतं. त्याला जेलच्या जगण्याचा कंटाळा आला होता आणि म्हणून त्याने आत्महत्या केली. याला दुसरं कोणीही जबाबदार नाही असं ही त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. (Bhopal Crime Story)

राजेश कैदी होता आणि पॅरोलवर असताना मृत्यू पावला म्हणून या सुसाईडची माहिती स्थानिक पोलिसांनी भोपाल मध्यवर्ती कारागृहाला दिली. नंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. बॉडी जवळ सुसाईड नोट सापडल्यामुळे, पोस्टमार्टम रीपोर्ट आल्यानंतर ही केस बंद करण्याच्या तयारीत पोलिस होते. पोस्टमार्टम झाल्यानंतर पोलिसांनी राजेशचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाइकांनीही मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण पोस्टमार्टम रीपोर्ट आल्यानंतर या केसला एक वेगळचं वळण आलं. जेव्हा तत्कालीन एसीपी अखिल पटेल यांनी पोस्टमार्टम रीपोर्ट पाहिलं तेव्हा त्यात राजेशचा मृत्यू हा आगीत जळून झाला नव्हता, तर कोणीतरी गळादाबल्याने त्याचा मृत्यू झाला होता. (Crime Story)

एसीपींनी ताबडतोब घटनास्थळावरून काढलेले फोटोस तपासणीसाठी मागवले. सर्व फोटोस बारकाईने बघितल्यानंतर त्यांना मृत व्यक्तीचे पाय एकमेकांना चिकटलेले दिसले. कोणीही जेव्हा जळून मरतं तेव्हा आगीचा त्रास होतं असल्यामुळे तो व्यक्ती तडफडून मरतो. मग त्याचे पाय एकमेकांना चिकटून राहण्याऐवजी वेगळे असायला हवेत असा प्रश्न एसीपींना पडला. शिवाय मृतदेह जेव्हा सापडला होता. तेव्हा त्याचं पूर्ण अंग जळालेलं नव्हतं. त्या मृतदेहाचा चेहरा आणि छातीचा भाग फक्त जळलेला होता. हात आणि पाय फारसे जळालेले नव्हते त्यामुळे त्यांचे हात पाय बांधले होते का? राजेशला जर आत्महत्याच करायची होती तर त्याची गळादाबून हत्या का करण्यात आली? मेलेला व्यक्ती राजेश नसलाच तर ? अशा अनेक शंका पोलिसांच्या मनात आल्या. या शंकांमुळे बंद होणारी फाइल पोलिसांनी पुन्हा उघडली. (Bhopal Crime Story)

या सर्व प्रश्नांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी राजेशचा मोबाइल नंबर शोधला. जो जेल मधून बाहेर आल्यानंतर चालू होता. पण आता बंद होता. त्याची शेवटची लोकेशन सुद्धा भोपाळचीच होती. पोलिसांनी त्याच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा एका नंबरवर सारखं बोलत असल्याचं समोर आलं. तो नंबर निहाल नावाच्या एका माणसाचा होता. निहाल हा राजेशच्याच एका खोलीत भाड्याने राहत होता. पण काही महिन्यांपूर्वीच त्याने राजेशची खोली सोडली होती. पोलिसांना निहाल गुजरातमध्ये असण्याची खबर मिळाली होती. पोलिसांनी लगेचच निहाला पकडण्यासाठी गुजरातकडे टीम रवाना केली आणि निहालला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने पोलिसांना सर्व खरं सांगितलं. (Crime Story)

तुरुंगातून पॅरोलवर आल्यानंतर राजेशने निहालला भेटण्यासाठी कॉल केला होता. निहाल राजेशला भेटल्यानंतर तो खूप अस्वस्थ असल्याचं समजलं. वडिलांच्या निधनानंतर त्याला आता आयुष्यात कोणी पुन्हा पॅरोलवर सोडवणार नाही या विचारामुळे तो अस्वस्थ असल्याचं त्याने निहालला सांगितलं होतं. जेलमधून कायमची सुटका होण्यासाठी राजेशकडे एक आइडिया होती. अनेक क्राइम सीरीज आणि मूवीज पाहून त्याला ही आइडिया सुचली होती. ही आइडिया अशी होती की, आपल्या ऐवजी दुसऱ्याला मारून सर्वांना भासून द्यायचं की आपणच आत्महत्या केली आहे. ज्यामुळे केस क्लोज आणि राजेश मुक्त असं त्याला वाटत होतं. पण निहाल ने पूर्ण स्टोरी पोलिसांना सांगितली. (Bhopal Crime Story)

दुसऱ्या व्यक्तीला राजेश म्हणून मारण्यासाठी त्यांना निहालची मदत मागितली होती. पण जेव्हा निहाल ने हे करण्यासाठी नकार दिला तेव्हा त्याने त्याला पैशांची ऑफर दिली. मग निहाल लगेच तयार झाला. २९ जूनला राजेशची पॅरोल संपणार होती. म्हणून 28 जूनच्या संध्याकाळी राजेश आणि निहाल यांनी मिळून एका राजेशच्या शरीरयष्टीच्या बिगारी कामगाराला दारूचं आमिष दाखवून राजेशच्या घरी नेलं. तिथे दोघांनीही त्या बिगारी कामगाराला ज्याच नाव राजू होतं त्याला भरूपूर दारू पाजली. नंतर त्याची गळादाबून हत्या केली. यानंतर त्यांचे हातपाय दोरीने बांधले. म्हणजे तो जिवंत असला तरी आगीपासून वाचू शकणार नाही. हातपाय बांधून त्याला जमिनीवर झोपवले आणि घरात ठेवलेली पुस्तके त्याच्यावर ठेवली. तेव्हा राजेशने स्वत: सुसाईड नोट लिहून काही अंतरावर ठेवली जेणेकरून पोलिसांना आत्महत्येचा पुरावा म्हणून ती मिळू शकेल. यानंतर दोघांनी दुचाकीतून काढलेले पेट्रोलही ओतून घराला आतून कडी लावून. घराच्या छतावरुन ते बाहेर आले. त्यानंतर खिडकीतून माचिसची काडी पेटवून आत फेकली. जेव्हा आग खूप वाढली तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. (Crime Story)

======

हे देखील वाचा :  बाबा सिद्दिकींच्या हत्येला राज्यातूनच मदत

======

आता पोलिसांना सगळी स्टोरी समजली होती. पण राजेशला पकडेपर्यंत तपास अपूर्णच होता. आता आज ना उद्या राजेश कोणत्याही प्रकारे निहालशी नक्की संपर्क साधेल याची पोलिसांना खात्री होती, आणि झालंही तसंच निहालला राजेशचा फोन आला. तो निहालला पुन्हा मदत मागत होता. मी चेन्नईत आहे. इथे कोणी ओळखीच असेल तर कळव, आणि घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला शंका नाहीना अशी सर्व विचारपूस राजेशने निहालकडे केली. आता राजेशला पकडण्यासाठी पोलिसांनीही संपूर्ण फिल्मस्टोरी तयार केली. त्याअंतर्गत काही पोलिसांना चेन्नईला पाठवून स्थानिक बनून राजेशला भेटण्यास सांगितले. निहालने राजेशला स्वत:चे मित्र म्हणून पोलिसांचा नंबर दिला होता. राजेश जेव्हा निहालच्या मित्रांना म्हणजे पोलिसांना भेटण्यासाठी गेला तेव्हा कपाळावर टीळा आणि लुंगी वगैरे घालून एकदम साऊथ इंडियन लुकमध्ये स्वत:ची ओळख लपवण्याचा निष्फळ प्रयत्न तो करत होता. तिकडेच पोलिसांनी राजेशच्या मुसक्या आवळल्या, एका निर्दोष व्यक्तीला ठार मारून तो स्वत:ला मुक्त करण्याचा प्रयत्न करत होता, एका हत्येमुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला राजेश आता आणखी एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगणार होता. राजेशने कायद्याला फसवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तो आपल्या गुन्ह्याच्या जाळ्यातच अडकला. (Bhopal Crime Story)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.