सामान्यपणे आपल्या शरीराच्या काही नैसर्गिक सवयी आहेत. ज्या आपण थांबवू देखील शकत नाही आणि बंद देखील करू शकत नाही. यातलीच एक म्हणजे ढेकर देणे. ढेकर ही जरी सामान्य बाब असली तरी एकापाठोपाठ एक ढेकर लोकांसमोर येणे हे खूपच लाजिरवाणे असते. मोठे आणि दुर्गंधी येणारे ढेकर अधिकच त्रासदायक असतात.
मेडिकल भाषेमध्ये ढेकरला बेल्चिंग किंवा ऍसिड रिफ्लक्स असेही म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा पोटात किंवा अन्ननलिकेमध्ये वायू जमा होतो, तेव्हा हा वायू ढेकरच्या स्वरूपात तोंडातून बाहेर पडतो. जर तुम्हाला सतत अपचनाचा त्रास होत असेल तर ढेकर देताना दुर्गंधी सुद्धा येऊ शकते. जर तुम्हाला अचानक ढेकर यायला सुरुवात झाली आणि हे ढेकर सतत येत असतील तर त्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत. चला जाणून घेऊया त्याबद्दल.
१) ढेकर कमी करण्यासाठी, नॉन-कार्बोनेटेड शीतपेये निवडा किंवा कार्बोनेटेड पेये हळूहळू आणि मध्यम प्रमाणात प्या, ज्यामुळे गॅस पोटात जाण्यापूर्वी बाहेर पडू शकेल.
२) तुम्ही पटापट जेवत असाल तर अतिरिक्त हवा पोटात जाऊ शकते आणि हा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे अन्न हळूहळू आणि चावून खा. असे केल्याने जेणेकरून अन्न लाळेत मिसळून अन्ननलिकेतून सहज पुढे ढकलले जाते. यामुळे ढेकर कमी होऊन पचन सुद्धा सुरळीत होते.
३) पोटासंबंधित समस्यांसाठी बडीशेप लाभदायक आहे. याने गॅसची समस्या दूर होते. बडीशेपचे रस आणि गुलाबजल समप्रमाणात मिळवून पिण्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते. आपण बडीशेप चावूनही खाऊ शकता.
४) आपण खात असलेले काही खाद्यपदार्थ पचनसंस्थेमध्ये वायू निर्माण करतात, ज्यामुळे ढेकरांचे प्रमाण वाढते. बीन्स, मसूर, कोबी, कांदे आणि काही मसाले आदी. या पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. शिवाय बीन्स आणि मसूर शिजवण्यापूर्वी ते भिजवून ठेवल्याने त्यांचे वात तयार करणारे गुणधर्म कमी होण्यास मदत होते.
५) जेवताना पाठ सरळ ठेवा. यामुळे पोटावरील दाब कमी होऊन पोट फुगण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते. याशिवाय सतत खाणे कमी केले पाहिजे. जे खाल ते शांतपणे चावून खा.
६) तणाव आणि नकारात्मक भावना पचनात व्यत्यय आणू शकतात. व्यायाम, ध्यान, योग आणि तुमच्या आवडी जपत तुम्ही मन शांत ठेवू शकता जेणेकरून पचन सुद्धा सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
७) ढेकर आल्यावर वेलची टाकून केलेला चहा पिणे फायदेशीर ठरते. किंवा वेलची तोंडात ठेऊन ती चावल्याने देखील अराम मिळतो. तोंडात एक लवंग ठेवून ती चघळण्यास देखील आराम मिळतो.
======
हे देखील वाचा : जायफळाचे ‘हे’ फायदे ऐकाल तर चकित व्हाल
======
८) ढेकर येत असल्यास कोथिंबीरची दंडी चावावी. काही न मिसळता ताज्या लिंबाचा रस प्यावा किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने देखील फायदा होतो.
ढेकर कमी करण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्कीच अजमावून पाहू शकतात. मात्र जर तुमचा त्रास या घरगुती उपचारांनी देखील थांबत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.