बॉलिवूड चा ‘डॉन’ किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला दिन-प्रतिदिन वेगळेच वळण मिळत आहे. आर्यन खानला अटक करणारे ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याभोवतीच आता संशयाचे जाळे निर्माण झाले असून त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या ‘वसुली’च्या आरोपांची ‘एनसीबी’ च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.
तसेच यापुढील तपासालाही ‘एनसीबी’ने स्थगिती दिली आहे. राज्यसरकारच्या पोलीस खात्यातर्फेही वानखेडे यांची चौकशी करण्यात येत असून त्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र उच्च न्यायालयाने यासंदर्भात तातडीने कठोर कारवाई न करण्याचा आदेश देऊन वानखेडे यांना तूर्तास तरी दिलासा दिला आहे.
क्रूझवर आर्यन खान (Aryan Khan) जवळ ड्रग्ज सापडले नसले तरी त्याने ड्रग्जचा व्यापार करण्याचा प्रयत्न केला असे ‘एनसीबी’चे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी आर्यनच्या व्हॉट्स अप चॅट चा पुरावा दिला आहे. मात्र आर्यनचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहटगी यांनी आपल्या युक्तिवादात ‘एनसीबी’ चे हे आरोप अमान्य केले. उच्च न्यायालयानेही त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे.
२५ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यामुळे या प्रकरणात ‘एनसीबी’ बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आता या सर्व प्रकरणात ”आरोपी बाहेर आणि फिर्यादीच आरोपीच्या पिंजऱ्यात” असे ‘फिल्मी दृश्य’ निर्माण झाले आहे. अभिनेता शाहरुख खान याची ‘मन्नत’ अखेर पूर्ण झाली असून आर्यनच्या सुटकेमुळे त्याच्या घरची दिवाळी आणि चार दिवसांवर आलेला शाहरुखचा वाढदिवस आता धूमधडाक्याने साजरा होईल असे वाटते.
आर्यन प्रकरणाच्या आधी, महाविकास आघाडीतील एक मंत्री आणि ‘राष्ट्रवादी’ चे प्रवक्ते नबाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयालाही ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. मात्र ”माझ्या जावयाजवळ ‘हर्बल तंबाखू’ होती तरीही त्याला ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असा दावा नबाब मलिक यांनी केला आहे. त्यांच्या जावयांविरुद्धची कारवाई देखील समीर वानखेडे यांनीच केली होती. जावयाला अटक केल्यापासून नबाब मलिक खवळले असून त्या दिवसांपासून ते ‘तंबाखू मळलेले हात’ धुवूनच समीर वानखेडे यांच्या मागे लागले आहेत.
नबाब मलिक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर रोज एका पुराव्यानिशी आरोप करीत असून आपले आरोप खोटे ठरल्यास मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा देण्याचीही त्यांनी तयारी ठेवली आहे. मलिक म्हणतात त्याप्रमाणे समीर वानखेडे यांना तुरूंगात पाठविल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत कारण त्यासाठी त्यांनी आता आपले मंत्रिपदही ‘पणाला’ लावले आहे. याशिवाय ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी यास पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्या चौकशीत काय निष्पन्न होते तेही वानखेडे यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
वास्तविक, आर्यन ड्रग्ज प्रकरणातील काही गोष्टी सुरूवातीपासूनच संशयाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्या प्रकरणात आर्यनला घेऊन जाणारा किरण गोसावी नावाचा पंच हा फरारी गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच मनीष भानुशाली नावाचा भाजपचा पदाधिकारीही आर्यनच्या अटकेप्रकरणी ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांना मदत करीत होता हेही स्पष्ट झाले आहे. या दोन्ही प्रकरणात ‘एनसीबी’ तर्फे समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली नाहीत.
त्यातच या प्रकरणातील आणखी एक पंच आणि किरण गोसावींचा सहकारी असलेला प्रभाकर साईल याने, आर्यन खान प्रकरणात २५ कोटींचे ‘डील’ झाले होते आणि त्यातील आठ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते असा सनसनाटी आरोप केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले त्यामुळे आता समीर वानखेडे हेच आरोपीच्या पिंजऱ्यात गेल्यामुळे ‘एनसीबी’तर्फे त्यांची चौकशी केली जात आहे.
वानखेडे यांच्यावरील या आरोपात कितपत तथ्य आहे हे चौकशीतून निष्पन्न होईलच मात्र अशा आरोपांमुळे ‘एनसीबी’, ‘ईडी’ यासारख्या सरकारी यंत्रणांचा भाजप सरकारतर्फे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापर केला जातो या विरोधकांच्या आरोपांना बळकटीचं मिळत आहे. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी या सरकारी यंत्रणाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याची तक्रार महा विकास आघाडीचे नेते रोजच करीत असतात.
महाराष्ट्रातील भाजपचे काही ‘वाचाळ’ नेतेही आपल्या वक्तव्याद्वारे त्याची पुष्टीच करीत आहेत असे म्हणावे लागेल. इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अलीकडेच एका मेळाव्यात बोलताना ‘मी भाजपमध्ये असल्याने ‘ईडी’ चे शुक्लकाष्ठ माझ्या मागे लागणार नसल्यामुळे मला रात्री शांत झोप लागते’ असे विधान केले तर तिकडे सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनीही, ‘मी भाजपमध्ये असल्याने ‘ईडी’ च्या कारवाईची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही’ असे हसत हसत सांगितले.
दोघाही नेत्यांनी ‘थट्टेवारीच्या सुरात’ तसे सांगितले असले तरी त्याचा गर्भितार्थ वेगळा निघू शकतो याची जाणीव त्यांना असायला हवी होती. एकूणच अशा सर्व प्रकरणांमुळे या दोन्ही संस्थांच्या कारवायांभोवती संशयाचे दाट धुके निर्माण होत असून त्यामध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची मात्र नाहक बदनामी होत आहे.
विशेष म्हणजे यामुळे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातो हा विरोधकांचा दावा हळूहळू खरा ठरत चालल्याची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. तसे झाले तर सरकारी यंत्रणांच्या कारभारावरचा जनतेचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही. तसे झाले तर केंद्रातील भाजप सरकार आणखी बदनाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व गोष्टी केंद्र सरकारनेच गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
या सर्व प्रकरणात ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे पाहता पाहता चांगलेच बदनाम झाल्याचे दिसून आले. नबाब मलिक यांनी तर वानखेडे यांच्या ‘जातकुळी’ पासून त्यांच्या ‘धर्मा’पर्यंत अनेक प्रश्न पुराव्यानिशी उपस्थित केले आहेत.
समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या ‘धर्मपत्नी’ अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) या सरसावल्या खऱ्या मात्र ‘क्रांतीचा इतिहास’ आम्हाला सांगायला लावू नका असे ‘धमकावत’ आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात समीर वानखेडे प्रकरण एकूणच ‘क्रांती’ कारी ठरणार असे दिसते.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.