आपल्या देशात महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अछूत मानले जाते. आजही आपल्या देशातील अनेक ठिकाणी या दिवसांमध्ये महिलांना विटाळ आला म्हणून बाजूला ठेवले जाते. ३ दिवस स्त्रिया वेगळ्या राहतात. त्यांना कोणीही शिवत नाही. अशा महिला देवा धर्माच्या काळात देखील चालत नाही. शिवाय अनेक सुशिक्षित महिलांना देखील त्यांच्या महत्वाच्या दिवसांमध्ये सणवारांमध्ये, सहलीमध्ये पाळी ही एक व्यत्यय वाटत असते.
महिलांसाठी आजही पाळी ही एक अडचणच समजली जाते. त्यामुळे आपल्या महत्वाच्या दिवसांमध्ये जर पाळी येत असेल तर महिला ती पुढे ढकलण्याच्या गोळ्या सर्रास घेताना दिसतात. कधी कधी कुटुंबाच्या दाबाखाली, कधी स्वतःच्या मर्जीने तर कधी नाइलाज म्हणून. पण पाळी पुढे जाण्यासाठी या गोळ्या घेण्याचे प्रमाण आपल्या देशात जास्त आहे.
या गोळ्या आपल्या शरीराच्या नैसर्गिक चक्रामध्ये व्यत्यय आणतात. मासिक पाळी हे एक असे चक्र आहे की जे विविध हार्मोन्स आणि शारीरिक क्रियांवर परिणाम करते. या प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला माहित आहे का, कारण कितीही मोठे, लहान असो तुम्ही या गोळ्या घेतल्या तर त्याचे अनेक अयोग्य परिणाम तुमच्या शरीरावर होताना दिसतात. जाणून घेऊया या गोळ्यांचे महिलांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम.
मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्यांमध्ये नॉर-इथिस्टेरॉन नावाचा एक घटक असतो. हे नॉर-इथिस्टेरॉन प्रोजेस्टेरॉन नावाच्या औषधांच्या गटाशी संबंधित असते. यामुळे तुमच्या गर्भाशयातून बाहेर पडणारा कोणताही स्राव थांबवण्यास मदत होते. त्यामुळे या औषधांच्या वापरामुळे तुमची मासिक पाळी काही दिवस पुढे ढकलली जाते.
एका अभ्यासानुसार या गोळ्यांचे जर तुम्ही दीर्घकाळ सेवन केले तर भविष्यात तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा प्रजननासंबंधीत काही विकार देखील उद्भवू शकतात. या गोळ्यांमुळे मासिक पाळीत बदल होऊन तुमच्या एकूण हार्मोनल संतुलनावर त्याचा परिणाम होतो.
प्रत्येक स्त्रीच्या शरीरात महिनाभर हार्मोनल चढउतार होत असतात. हे केवळ मासिक पाळीच नव्हे तर मूड स्विंग्ज, शरीराच्या ऊर्जेची पातळी आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक गोष्टींवर देखील परिणाम करतात.
======
हे देखील वाचा : मेंदूला हेल्दी ठेण्यासाठी महत्वाचे असतात हे 3 व्हिटॅमिन्स
======
मासिक पाळीत लांबविल्याने त्या कालावधीपुरता आराम मिळू शकतो, परंतु भविष्यात मासिक पाळीसंबंधित अनियमितता दिसून येते. जीवनशैलीत योग्य बदल करणे आणि संतुलित आहाराचे सेवन करणे हे नैसर्गिकरित्या मासिक पाळीचे नियमन करण्यास मदत करू शकते.
काही महिलांमध्ये या गोळ्या घेतल्याने मासिक पाळीच्या वेळेस ओटीपोटात अतीव आणि असहनीय वेदना झाल्याचे आणि रक्तस्त्राव वाढल्याचे देखील अनेकदा होते.
यासोबतच शरीरावर पुरळ उठणे, चक्कर येणे, डोकेदुखी, हार्मोन्समध्ये असंतुलनाची समस्या, कावीळ, वजन वाढणे, शरीराची सूज, स्तन सैल पडणे, चेहऱ्यावर मुरुम येणे, मळमळ, मूड स्विंग आणि सेक्सच्या इच्छेत बदल, हाय ब्लड प्रेशर, अस्थमा आणि मायग्रेनची तक्रार आदी समस्या देखील उदभवू शकतात. जर तुम्हाला या गोळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य ठरेल.