परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान पाचवे आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.
वैजनाथाची आख्यायिका
परळी वैजनाथ (Shri Vaijnath Temple) या विषयीची एक पौराणिक कथा आहे. ती म्हणजे राक्षस रावण हा अभिमानी आणि अहंकारी होता. एकदा राक्षसराज रावणाने हिमालयावर स्थिर उभे राहून भगवान शिवाची घोर तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या खूप कडक होती.
तो उन्हाळ्याच्या दिवसात पंचाग्नीच्या मध्यात बसून पंचाग्नी सेवन करीत असे. तर धुवाधार पावसात मोकळ्या मैदानावर उघड्यावरच झोपत असे आणि कडाक्याच्या थंडीच्या दिवसात थंडगार पाण्यात उभे राहून साधना करीत असे.
या तीन वेगवेगळ्या प्रकाराने रावणाने महादेवाला प्रसन्न केले पण भगवान महेश्वर त्याला प्रसन्न झाले नाही, तेव्हा रावणाने आपले एक शीर कापून शिवलिंगावर अर्पण करून त्याची पूजा करायला सुरुवात केली. या प्रक्रियेमध्ये त्यांनी आपली नऊ शिरे अर्पण केल्यावर दहावे शीर कापण्यासाठी जाणार तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले होते.
प्रकट होऊन भगवान शिवांनी रावणाची शीरे पहिल्या सारखी केली व रावणाला वर मागायला सांगितले. रावणाने भगवान शिवाला सांगितले की, “मला शिवलिंग नेऊन लंकेत स्थापित करायची अनुमती द्या.” शिवलिंग शिवशंकरांनी नेण्यास परवानगी दिली. व जर ते लिंग नेताना जमिनीवर ठेवले गेले, तर तिथेच त्याची प्रतिष्ठापना होईल.
रावण शिवलिंग घेऊन निघाला, तेव्हा मार्गात असलेल्या चिंताभूमी मध्ये त्यांना लघुशंका करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याने लिंगाला एका सेवकाच्या हातात दिले आणि लघुशंकेसाठी गेले, तिकडे शिवलिंग जड झाल्याने त्या सेवकाने ते भूमीवर ठेवले आणि ते तिथेच अचल झाले.
परत आल्यावर रावणाने खूप जोर लावून त्या शिवलिंगाला जमिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात असफल झाला. शेवटी तो निराश झाला आणि त्याने त्या शिवलिंगावर आपले अंगठे दाबून परत त्याला जमिनीत गाडले. आणि रिकाम्या हाताने लंकेत गेला. तिकडे ब्रह्मा, विष्णू, इंद्र, आदी देवतांनी तिथे पोहचून त्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली. त्यांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले आणि लिंगाची प्रतिष्ठापना करून सर्व देव स्वर्गलोकी निघून गेले.
अशा प्रकारे रावणाच्या तपश्चर्या फलस्वरूप श्री वैद्यनाथ ईश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली. जो मनुष्य श्रद्धापूर्वक श्री भगवान वैद्यनाथ यांना अभिषेक करतो त्याचे शारीरिक आणि मानसिक रोग अतिशीघ्र नष्ट होतात असा समज आहे. हे ज्योतिर्लिंग अजमेरी दाबले गेल्यामुळे त्याचे वरील भागात एक खड्डा झाला आहे. तरीही या शिवलिंग मूर्तीची उंची जवळजवळ अकरा बोटे आहे.
मंदिराची रचना
हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत.
मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
कसे पोहोचाल
परळी वैजनाथ (Parli Vaijnath) हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: बारा ज्योतिर्लिंग- ओंकारेश्वरचे अमलेश्वर
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.