Home » पृथ्वीवरील सर्वात अनोखे शहर

पृथ्वीवरील सर्वात अनोखे शहर

by Team Gajawaja
0 comment
City of Neom
Share

पृथ्वीवरील सर्वात अनोखे शहर कुठले आहे, हा प्रश्न विचारला तर याचे आत्तापर्यंतचे उत्तर स्विझलॅंड, न्युयॉर्क, लंडन, पॅरीस असे होते.  मात्र आता ही सर्व शहरे बाजुला होणार आहेत. कारण पृथ्वीवरील सर्वात अनोखे शहर म्हणून एक नवीन शहर तयार होत आहे.  हे शहर आहे, निओम.  म्हणजे, नाविन्याची वाट. (City of Neom)

हे नवीन आधुनिक शहर तयार होत आहे, ते सौदी अरेबियामध्ये. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे हे स्वप्नवत शहर आहे. निओम शहर पाच टप्प्यात खुले करण्यात येत असून त्याचा पहिला टप्पा तयार झाला आहे. निओम शहर म्हणजे, सौदी प्रिन्सच्या व्हिजन २०३० चा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. निओम शहर पूर्ण झाल्यावर त्याच्या पुढे लंडनही टिकणार नाही. कारण या शहरात सर्व आधुनिक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. शून्य टक्के प्रदूषण हे घोषवाक्य असलेल्या या शहरामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगभरातील श्रीमंतांमध्ये स्पर्धा लागली आहे.  

सौदी अरेबियाच्या वाळवंटात स्वर्ग तयार झाला आहे. हा स्वर्ग म्हणजे निओम शहर. तब्बल ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या निओम मेगासिटीचा काही भाग आता खुला करुन देण्यात येणार आहे.  अल्लाउद्दीनच्या चिरागमधून जशा जादूच्या वस्तू बाहेर येत असत, तसेच या शहराबाबत आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे स्वप्न असलेल्या या शहरात अशा काही सुविधा आहेत, ज्यांची कल्पना सर्वसामान्यांनी स्वप्नातही कलेली नसेल. (City of Neom)

निओम शहराच्या पूर्ण प्रकल्पाला व्हिजन २०३० असे नाव देण्यात आले आहे. सौदी अरेबियाला एका नव्या वाटेवर घेऊन जाणारा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा हा प्रकल्प आहे. लाल समुद्राच्या काठावर हे निओम नावाचे शहर तयार होत आहे. या शहराचा पहिला भाग सिंडाला, या वर्षी नागरिकांसाठी खुला होईल. यात अल्ट्रालक्स बेट रिसॉर्टचा समावेश असेल. येथे पर्यटक बेट रिसॉर्टचा आनंद घेऊ शकतील आणि तीनपैकी एका भव्य हॉटेलमध्ये राहू शकतील.

सौदी अरेबियाकडे परदेशी पर्यटक आकृष्ट व्हावे यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे.   तांबड्या समुद्राचे अनन्य प्रवेशद्वार‘  म्हणूनही या प्रकल्पाचा उल्लेख कऱण्यात येत आहे. क्राऊन प्रिन्स बिन सलमान यांनी २०१७ मध्ये ताबुक येथे या प्रकल्पाची सुरुवात केली. तेव्हा सौदीमधील काही संघटनांनी या प्रकल्पाचा विरोध केला. (City of Neom)

देशात परदेशी पर्यटक आणि परदेशी गुंतवणूक आल्यास सौदीची संस्कृती पुसली जाईल, असा त्यांचा आक्षेप होता. मात्र क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी भविष्यासाठी हा प्रकल्प असल्याचे सांगितले आहे. सौदी यापुढे तेलाच्या व्यवहारावर अवलंबून राहता येणार नाही. त्या व्यतिरिक्त आर्थिक स्त्रोत तयार करावे लागतील, असे स्पष्ट करीत त्यांनी निओम शहराच्या उभारणीची पाठराखण केली.  

आता याच निओमचा पहिला टप्पा सुरु होईल, त्याची प्रतीक्षा करण्यात येत होती. निओम म्हणजे नवीन भविष्य. सौदी अरेबियाचे उज्वल भविष्य म्हणून या प्रकल्पाकडे बघितले जाते. हे संपूर्ण शहर तयार झाल्यावर ते भव्यदिव्य असेल. लंडनपेक्षा अंदाजे १७ पट मोठ्या क्षेत्रात हे शहर पसरलेले असेल. या शहराच्या पहिल्या टप्यात आकर्षक रिसॉर्ट, बीच क्लब, एक यॉट क्लब, स्पा, वेलनेस सेंटर, ५१ लक्झरी रिटेल आउटलेट्स, ४०० हून अधिक खोल्या आणि ३०० स्वीट्स असलेली तीन भव्य हॉटेल्स आणि एक मोठा मरीना यांचा समावेश आहे.  (City of Neom)

या निओम शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांनाही क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आवाहन केले आहे. २०३० पर्यंत १०० दशलक्ष ते १५० दशलक्ष गुंतवणूक  मिळवण्याचे सौदी अरेबियाचे लक्ष्य आहे. निओम शहराची पूर्ण बांधणीच आश्चर्यकारक अशी आहे. 

या शहराच्या जमिनीच्या पातळीवर कोणतेही वाहन चालणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा रस्ता बांधला जाणार नाही. हे ठिकाण पूर्णपणे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असेल. जगभरातील अनेक दुर्मिळ वनसंपदा येथे पाहायला मिळणार आहे.(City of Neom)

===========

हे देखील वाचा :  मलिशियाच्या गायब विमानामागे एलियन

===========

निओम सिटीचा दुसरा स्तर सेवा स्तर असेल. येथे सर्व प्रकारचे व्यावसायिक उपक्रम राबवले जातील. सेवा स्तरावर दुकाने, कार्यालये, मोठे मॉल्स, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था असेल. या शहराची वाहतूक व्यवस्था सर्वांत आधुनिक असेल. शहराच्या एका कोप-याहून नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी फक्त वीस मिनिटांचा कालावधी लागले. 

निओम शहराच्या उभारणीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यासाठीही सौदी अरेबियानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत, समुद्रापासून गोड्या पाण्याची निर्मिती केली आहे. आता निओमच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतांना सौदी मोठा समारंभ करणार आहे. यासाठी जगभरातील मान्यवरांना बोलवण्यात येणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.