अमेरिकेतील मेरीलँडमध्ये मालवाहू जहाज धडकल्याने फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळला. ही बातमी सोशल मिडियावर आली आणि त्यासोबत सर्वांची एकच प्रतिक्रीया आली ती म्हणजे, अमेरिकन इतिहासाचे प्रतीक इतिहासजमा झाले. अमेरिकेच्या इतिहासात (American history) काही वास्तुंना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यात हा फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज प्रमुख होता. याला बाल्टिमोर पूल असेही नाव होते. अमेरिकन वेळेनुसार पहाटे दीड वाजता ही दुर्घटना घडली.
या पुलाला एक मालवाहू जहाज जोरात आदळले. श्रीलंकेला जाणा-या या मालवाहू जहाजाची धडक एवढी जबरदस्त होती की त्यानंतर जहाजाला आग लागली आणि ते पाण्यात बुडले. सोबत बाल्टिमोर पूलाचेही दोन भाग झाले. त्यावरील गाड्याही पाण्यात पडल्या आहेत. पहाटेच्या वेळी झालेल्या या दुर्घटनेनं अवघी अमेरिका हादरली आहे. यात नदीच्या प्रवाहात किती गाड्या पडल्या आहेत, आणि किती जीवीत हानी झाली आहे, याचा अंदाज घेतला जात आहे. पूल केवळ व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर त्याला अमेरिकन राष्ट्रगीत द स्टार-स्पँगल्ड बॅनरशी जोडणारा इतिहासही त्याच्या सोबत आहे.
बॉल्टिमोर ब्रिज हा अमेरिकन इतिहासाचे (American history) प्रतीक मानण्यात येत होता. हा पूल केवळ बाल्टिमोर परिसरासाठीच नाही तर वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठीही महत्त्वाचा होता. त्यावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असत. हा पुलच पडल्यानं परिसरातील नागरिकांची मोठी कोंडी होणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं आणीबाणी घोषित केली आहे.
या पुलाचे बांधकाम 1972 मध्ये सुरू झाले आणि मार्च 1977 मध्ये हा बाल्टिमोर पूल पूर्ण झाला. पण याच्या नावापासूनचा इतिहास अमेरिकेबरोबर जोडला गेला आहे. 1977 मध्ये बांधलेल्या, बाल्टीमोर पुलाला अधिकृतपणे फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज असे म्हणतात. अमेरिकन राष्ट्रगीत ‘द स्टार-स्पॅन्ग्ल्ड बॅनर‘ वरुनच या पुलाला त्याचे नाव देण्यात आले आहे. मात्र हा पुल जिथे उभारला आहे, ती जागाही ऐतिहासिक आहे. या जागेजवळच फ्रान्सिस स्कॉट की यांनी 1814 मध्ये फोर्ट मॅकहेन्रीवर बॉम्बहल्ला केला होता. बाल्टिमोरची लढाई 1812 च्या युद्धाचा भाग होती. (American history)
अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात 18 जून 1812 आणि 17 फेब्रुवारी 1815 दरम्यान ही लढाई झाली होती. अमेरिकेच्या सागरी अधिकारांचे ब्रिटिशांनी उल्लंघन केल्याबद्दल या दोन देशांमध्ये हे युद्ध झाले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक करार झाला आणि युद्ध थांबले. त्याच जागेवरुन हा पुल बांधण्यात आला. हा पूल 8,636 फूट लांब होता आणि दरवर्षी अंदाजे 11.5 दशलक्ष वाहने त्यावरु जात असत. यावरुनच आता हा पूल नसल्याने स्थानिक वाहतुकीचा किती प्रमाणात खोळंबा झाला असेल याचा अंदाज येतो. बाल्टिमोर पूल हा वॉशिंग्टन मेट्रोपॉलिटन भागात एक महत्त्वाचा वाहतूक दुवा होता. वॉशिंग्टन डीसीच्या जॉर्जटाउन शेजारच्या अर्लिंग्टन, व्हर्जिनियाच्या रॉसलिन शेजारच्या परिसराला हा पूल जोडत असे. $60.3 दशलक्ष खर्चून बांधला गेलेला हा पूल अचानक पडल्यानं आता त्याचा जल वाहतुकीवरही परिणाम होणार आहे.
============
हे देखील वाचा : तयार होतोय सहावा महासागर
===========
अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील पॅटापस्को नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. पॅटापस्को नदीतून मोठ्याप्रमाणात जलवाहतूक होते. आंतरराष्ट्रीय जहाजे या नदीतून प्रवास करतात. त्यापैकीच श्रीलंकेच्या जहाजानं या पुलाला जोरदार धडक दिली. यामुळे पूल पूर्णपणे नदीत कोसळला. त्याच्यासोबत किमान 7 नागरिक आणि डझनभर गाड्या नदीत पडल्याचा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्षात किती गाड्या होत्या याबाबत अजून शोध घेण्यात येत आहे. यासाठी बाल्टिमोरचे महापौर ब्रँडन एम. स्कॉट यांनी आपत्कालीन पथकांचे नियोजन केले आहे. यातून 7 जणांना वाचवण्यात आले आहे. 948 फूट लांबीच्या जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. जहाजाची मालकी सिंगापूर येथील कंपनीकडे होती. या कंपनीनंही नदीपात्रात शोध मोहीम सुरु केली आहे. किमान सात गाड्या या पुलासोबत नदीपात्रात गेल्या आहेत. तसेच संपूर्ण जहाजही नदीपात्रात सामावून गेले आहे. याचा अधिक शोध घेण्यासाठी अनेक पाणबुड्या बोलवण्यात आल्या आहेत. मात्र अमेरिकेचा अभिमान असलेला बाल्टिमोर पूल आता इतिहासजमा झाल्यात जमा आहे.
सई बने